You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निशिगंधा वाड : 'LGBTQ व्यक्ती किंवा समूहाला दुखावण्याचा हेतू नाही, त्यांचा आदर करते'
'दिल के करीब' मुलाखतीत अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी समलैंगिक संबंधांसंदर्भात आपली भूमिका मांडली होती. त्या भूमिकेवर टीका करणारी पोस्ट समीर समुद्र यांनी फेसबुकवर लिहिली.
अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांचं वैयक्तिक युट्यूब चॅनेल आहे. त्यावर 'दिल के करीब' हा मुलाखतींचा कार्यक्रम त्या करतात. 19 डिसेंबर रोजी या चॅनेलवरून सुलेखा यांनी डॉ. निशिगंधा वाड यांची घेतलेली मुलाखत प्रसारित झाली.
या कार्यक्रमात डॉ. निशिगंधा यांनी त्यांच्या अभिनयातील प्रवासाच्या बरोबरीने शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल, सामाजिक क्षेत्रातील काम, कुटुंबीय यांच्याविषयी सांगितलं.
मराठी आणि हिंदी चित्रपट तसंच मालिका यामध्ये डॉ. निशिगंधा गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. नव्वदीच्या दशकातल्या प्रमुख मराठी अभिनेत्रींमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.
निशिगंधा दोन डॉक्टरेट पदवीप्राप्त असून तिसरीचं काम सुरू आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही त्या कार्यरत आहेत.
एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान डॉ. निशिगंधा वाड असं म्हणाल्या की, "निसर्गाच्या विरोधात जाणारा अनैसर्गिक प्रवास थोडा पचनी पडत नाही. समलिंगी संबंधाबाबत माझं वैयक्तिक मत थोडं वेगळं आहे. माझ्या मुलीला मी या विषयावर बोललेलं आवडत नाही. आताच्या पिढीला असं वाटतं की हाऊ कॅन यू कॉन्ट्रॅडिक्ट? (तुम्ही विरोधी मत कसं मांडू शकता) तुम्ही नॉर्मल नाहीयेत. प्रत्येकाला वैयक्तिक आवडनिवड, प्राधान्य आहे. पण देअर इज ऑल्सो चॉईस ऑफ ट्रिटमेंट ना? असं मला वाटतं.
मी असा विचार करते की, अशा लोकांनी (त्यांच्या मानवी हक्कांबाबत आपण बोलतो). सगळ्या गोष्टी मला कळतात असं नाही. माझ्या आकलनाप्रमाणे मला असं वाटतं की अशा कपलने एखादं मूल दत्तक घेतलं तर त्या मुलाच्या मानवी हक्कांचं काय? प्रश्न उभा राहतोच ना? त्या मुलांना नैसर्गिक आई आणि वडील यांची ओळख कशी करून द्यायची? त्यांना तुम्ही हे अधिकार देताय पण त्या मुलांच्या ह्यूमन राईट्सचं काय? त्या मुलांना ह्यूमन राईट्सचं कळेपर्यंत तो किंवा ती गोंधळलेली नसेल का? असेल की नाही?"
निशिगंधा वाड यांची मुलाखत पाहिल्यानंतर समीर समुद्र यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपले विचार मांडले आहेत.
ते म्हणतात, दिल के करीब कार्यक्रमातली तुमची मुलाखत पाहिली. एलजीबीटी कपल, मूल्यव्यवस्था, पालकत्व यासंदर्भात तुमचे विचार ऐकले. या विषयासंदर्भात तुमची मतं ऐकून मी आश्चर्यचकित झालो नाही कारण बहुतांश भारतीय माणसं अशा पारंपरिक पद्धतीनेच समलैंगिकतेकडे बघतात. म्हणूनच मी याविषयी लिहितो आहे.
मुलाखतीत तुम्ही उल्लेख केलात ते एलजीबीटीक्यू कपल आणि कुटुंबीय मी आणि माझे कुटुंबीय आहोत. मी अमितशी लग्न केलं असून, गेली 17 वर्ष आम्ही एकत्र राहत आहोत. आम्ही आमचं मूल जन्माला घातलेलं नाही मात्र ध्रुव आणि शारव या गोड पुतण्यांचे काका म्हणून असलेली जबाबदारी आम्हाला पालकत्वाचाच एक भाग वाटतो. आमचे फॅमिली फोटो नीट काळजीपूर्वक बघा. कारण मुलाखतीत अशा स्वरुपाच्या कुटुंबीयांवर तुम्ही शाब्दिक आक्रमण केलं आहे आणि त्यांचा अपमान केला आहे.
एलजीबीटीक्यू नातेसंबंध अनैसर्गिक असतात असं तुम्ही मुलाखतीदरम्यान म्हणालात. समलैगिंक संबंध किती नैसर्गिक आहेत तसंच नातेसंबंधाच्या स्वरुपाविषयी मी तुम्हाला स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही. होमोफोबियासाठी तुम्ही योग्य उपचार करून घ्यावेत. राज्यघटनेने आश्वस्त केलेलं स्वातंत्र्यमय असं आयुष्य मी जगतो आहे आणि तो माझा अधिकार आहे. मात्र समाजाचा भाग असलेला नागरिक म्हणून मला तुम्हाला असं सांगायचं आहे की एलजीबीटीक्यू समूहातील व्यक्ती किंवा कुटुंबीयांना त्रास होईल असे होमोफोबिक विचार तुम्ही मांडू नका.
सेलिब्रेटी म्हणून तुम्हाला एक व्यासपीठ मिळतं. चुकीची माहिती पसरवण्यासाठी तसंच तुमचे पूर्वग्रह मांडण्यासाठी या व्यासपीठाचा दुरुपयोग करू नका.
तुमच्या दोन पीएचडींचा योग्य उपयोग करा, सार्वजनिक कार्यक्रमात याविषयावर बोलण्याआधी पुरेसा अभ्यास करून मगच बोला.
एलजीबीटीक्यू कपलच्या पालकत्वाबद्दल तुम्हाला काळजी असल्याचं मला जाणवलं. आम्ही कुठली मूल्यं जपतो आणि पुढच्या पिढीला कोणत्या विचारांची मशाल देतो याविषयी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. सत्याची कास धरून जगण्यावर आमचा विश्वास आहे. हे कदाचित तुम्हाला समजणार नाही. निष्ठा, मेहनत, वेळेवर कर भरणं, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं, लोकांप्रती चांगलं वागणं, वर्तमानात जगणं ही मूल्यं आम्ही जपतो.
ज्या मुलांना असे प्रेमळ एलजीबीटीक्यू पालक लाभतील ती मुलं नशीबवान आहेत असं मी नक्कीच म्हणू शकतो.
एलजीबीटीक्यू व्यक्ती म्हणून, समाजात विशेषत: भारतात होमोफोबियाचा आम्ही अनेकदा अनुभव घेतला आहे. समाजातील आमची प्रतिष्ठा, आत्मविश्वास, आमचं मानसिक आरोग्य, करिअर, समाजातील स्थान, आमचं राहणीमान यावर अशा विचारांमुळे निश्चित परिणाम होतो. असे प्रतिकूल विचार असतानाही, एलजीबीटीक्यू व्यक्ती समाजाच्या विविध स्तरांमध्ये यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यांचा मला अभिमान वाटतो. आमच्याशी चांगली ओळख झाल्यानंतर तुम्हाला हे कळू शकेल. या विषयाचा अभ्यास करा, अन्य व्यक्तींच्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहा आणि चांगलं माणूस होण्याचा प्रयत्न करा.
होमोफोबिया आजारातून तुम्ही लवकरच बाहेर पडाल अशी मला आशा आहे. तुम्हाला कोणतीही मदत लागल्यास केव्हाही संपर्क करा.
'ट्रिटमेंट नव्हे काऊंसेलिंग शब्द हवा होता'
दरम्यान, निशिगंधा वाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली.
त्या म्हणाल्या, "एलजीबीटीक्यू व्यक्ती किंवा समूहातल्या कोणाच्याही भावना दुखावण्याचा जराही हेतू नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते".
त्या पुढे म्हणाल्या, "मी असं म्हटलं होतं की हा समाजातला एक स्पेक्ट्रम आहे. एलजीबीटीक्यू कपलने दत्तक घेतलेल्या मुलांचेही मानवी हक्क आहेत. त्या मुलांना मोठं झाल्यावर कोणताही त्रास होऊ नये, त्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी दत्तक घेतलेल्या मुलांना ट्रिटमेंटची आवश्यकता आहे असं मी म्हटलं होतं. कारण बाहेरच्या समाजात वावरताना त्यांना त्रास होऊ शकतो. ट्रिटमेंटच्या जागी मला काऊंसेलिंग हा शब्द अभिप्रेत होता. शब्दाची मांडणी करण्यात चूक झाली असू शकते. मी गे, लेस्बियन तसंच एलजीबीटीक्यू व्यक्ती तसंच समूहाला पूरक असं बोलले होते. त्यांना नाकारण्याचा, त्यांचा अनादर करण्याचा प्रश्नच नाही.
"मी स्वत: सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. तृतीयपंथी व्यक्तींबरोबर आमच्या संस्थेचं कामही चालतं. कोणावरही आरोप करण्याचा, टीका करण्याचा माझा हेतू नव्हता. गे असणं, लेस्बियन असणं हा अत्यंत वैयक्तिक निर्णय आहे. त्यासंदर्भात मी बोलूच शकत नाही. कारण मी सर्वज्ञानी नाही. होमोफोबिया अशी माझी मनोवृत्ती नाही. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या लैंगिक स्वातंत्र्याचा मी आदर करते", असं डॉ. निशिगंधा यांनी सांगितलं.
'समलैंगिकता आजार नाही'
समलैंगिकता हा आजार नाही. Indian Psychiatric Society त्याला आजार मानणार नाही असं मानसोपचार तज्ज्ञांच्या भारतातल्या सर्वोच्च संस्थेने स्पष्ट केलं होतं.
"गेल्या 30 ते 40 वर्षांत गोळा केलेल्या पुराव्यांवरून हेच सिद्ध होतं की समलैंगिकतेची आजार म्हणून गणना करण्यासाठी कोणताही शास्त्रीय आधार नाही." डॉ. भिडे सांगतात.
भिडे हे Indian Psychiatric Society चे अध्यक्ष आहेत. समलैंगिकता गुन्हा नाही हे स्पष्ट करताना (6 सप्टेंबर 2018) यासंदर्भातलं घटनेतलं कलम 377 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)