शेतकरी आंदोलनाला महिना पूर्ण, कसं चालू आहे हे आंदोलन?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, चिंकी सिन्हा
- Role, बीबीसी हिंदीसाठी
सुरुवातीला त्या ट्रॉल्यांमध्ये फक्त बल्ब लावलेले होते. बाहेर अंधार होता. बायका नि पुरुष चुलीभोवती बसून जेवण बनवायच्या प्रयत्नात होते. शेतकऱ्यांचं आंदोलन पाहायला जाताना ट्रॅक्टरांच्या मधून वाट काढत जावं लागतं, आणि जाताना पाण्याचा टप-टप आवाज येत राहतो.
ट्रॅक्टरांच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर आपल्याला जागोजागी लंगर लागलेले दिसतात. दर 100 मीटरांच्या अंतरावर जेवण शिजत होतं. थोड्या अंतरावर मानसाहून आलेले राज माखा तूंबा वाजवत उधम सिंह यांचं शौर्य आठवणारं गाणं म्हणत होते.
काही तरुण काठ्या घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी पुढे चालत जात होते. गावागावांतून शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या महिला पथकांमध्ये त्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या या प्रचंड गर्दीमध्ये त्यांनी गावांवरून आणलेले काही वॉटर टँकरही उभे असल्याचं दिसतं. बफर झोनपासून थोडं दूरवर, हद्दीपाशी एक मंचही केलेला होता. पोलिसांच्या बॅरिकेड्सचा वेढा पडलेला जमिनीचा तुकडा बफर झोनच झालेला आहे.
आंदोलनकर्त्यांना पुढे जाता येऊ नये यासाठी काटेरी तारा लावलेल्या आहेत. वाळूने भरलेले ट्रक उभे आहेत आणि हातात बंदुका घेतलेले गणवेशातील सैनिक गस्त घालत आहेत. त्यांच्या हातात अश्रूधुराचे गोळे आहेत. परंतु, टिकरी व सिंघू बॉर्डरच्या दुसऱ्या बाजूला शेतकरीदेखील निग्रहाने आपले झेंडे फडकावत आहेत.
प्रतिकाराचं गाव आणि आंदोलनाचं वर्तमानपत्र
कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या 'दिल्ली चलो' आंदोलनाचा आता दुसरा महिना सुरू झाला आहे. आता या आंदोलनात राजस्थान, इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातले शेतकरीही सहभागी झाले आहेत.

फोटो स्रोत, CHINKI SINHA/BBC
उत्तर प्रदेशातून आलेले व इथे रस्त्याशेजारी सलून चालवणारा एक माणूस आलेल्या ग्राहकांचे केस भादरण्यात व्यस्त होता. शेतकरी इथे आल्यानंतरच या व्यक्तीने इथे हे दुकान सुरू केलं. आठवड्याभरातच आणखीही काही लोकांनी इथे तात्पुरती दुकानं उघडली.
आणखी एक इसम शेतकऱ्यांना चपला व बूट विकत होता. आणखी थोड्या अंतरावर कोणी जॅकेट विकत होतं. अशा रितीने या निदर्शनस्थळाला आता अख्ख्या गावाचं रूप येऊ लागलं आहे. एका अर्थी ही प्रतिकाराची गावंच उभी राहिली आहेत.
इथे खुली व्यायमशाळा आहे. वाचनालय आणि कम्युनिटी सेंटर आहे. आता तर इथूनच 'ट्रॉली टाइम्स' नावाचं वर्तमानपत्रही प्रकाशित होऊ लागलंय. शेतकऱ्यांनी स्वतः सुरू केलेलं हे वर्तमानपत्र आहे आणि काही लोकांच्या म्हणण्यानुसार देशातील सर्वाधिक वेगाने वाचक वाढत असलेलं हे वर्तमानपत्र असावं.

फोटो स्रोत, Getty Images
प्रतिकारातून जन्मलेल्या या वर्तमानपत्रामध्ये इथे आलेल्या लोकांच्या कहाण्या आहेत. निदर्शनांबद्दलची माहिती आहे. शेतकऱ्यांनी किंवा अभियान चालवण्यासाठी आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी काढलेली चित्रं व त्यांनी लिहिलेल्या कविताही या वर्तमानपत्रात वाचायला मिळतात.
समर्थक व सहयोगी यांनी लिहिलेल्या कहाण्या त्यात आहेत. लिहू पाहणाऱ्या सर्वांना इथे जागा आहे.
18 डिसेंबरच्या पहिल्या अंकामध्ये जसविंदर यांनी लिहिलेली 'स्वेटर' ही कथा प्रकाशित झालेय. बीबी नावाच्या एका महिलेची ही गोष्ट होती. ती रोज स्वेटर विणत बसायची. कधीतरी हा स्वेटर विणून पूर्ण होईल आणि दुसरा हातात घेता येईल, अशी तिला आशा होती.
पण गावात दवंडी पिटण्यात आली की, गावातल्या कोणा बायकांना निदर्शनांमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आधी त्यांनी गुरुद्वाऱ्यामध्ये हजर राहावं. बीबीने स्वेटर विणायचं काम सोडलं आणि ती गुरुद्वाऱ्यात जाऊन पोचली. लोक तिला सांगत होते की, 'तुला दम्याचा त्रास आहे, त्यात बाहेर बरीच थंडी पडलेय.' पण ती काही ऐकायला तयार नव्हती.
तिच्या सुनेने तिची थट्टा केली, 'बीबी आता तुमचा स्वेटर अर्ध्यातच राहिला की.' यावर प्रत्युत्तर देताना सासू म्हणाली, 'मी तिकडे निदर्शनांना गेले नाही, तर आत्तापर्यंत विणलंय तेही सगळं उसवलं जाईल- त्यात माझ्या मुलाचं स्वप्न आणि तुझ्या बापाने जमवलेली जमीनसुद्धा असेल.'

आणखी एका गोष्टीचं शीर्षक आहे- 'शहीद गुरमेल कौर'. लेखिका- संगीत तूर. ऐंशी वर्षांच्या गुरमेल कौर यांची गोष्ट संगीतने लिहिलेय. संगरूर जिल्ह्यातील घरछाँव गावातील गुरमेल कौर यांनी छोट्याशा बागेत सामान भरलं आणि त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाल्या. 'आपल्या जमिनीसाठी प्राण द्यायला चाललेय,' असं त्या म्हणाल्या.
आंदोलनाच्या ठिकाणी दोन आठवडे निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यावर गुरमेल कौर कालाझार टोलनाक्यावरच्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या गटातले बाकीचे लोक गावी परत गेले होते. पण आठ डिसेंबरला राष्ट्रीय महामार्ग सातवरच्या टोलनाक्यापाशी हृदयविकाराचा झटका आल्याने त्या मरण पावल्या.
एक डेंटिस्ट, एक फिजिओथेरपिस्ट, एक चित्रपटांसाठी कथा लिहिणारा लेखक, एक व्हिडिओ दिग्दर्शक, दोन डॉक्युमेन्ट्री छायाचित्रकार आणि एक शेतकरी, यांनी मिळून 'ट्रॉली टाइम्स' प्रकाशित करायची कल्पना प्रत्यक्षात आणली. आता या वर्तमानपत्राच्या मास्टहेडखाली भगत सिंह यांचं एक अवतरण आहे: 'इन्कलाब की तलवार विचारों की सान पर तेज़ होती है.' (क्रांतीच्या तलवारीला विचारांच्या दगडावर घासून धार येते).
या आंदोलनाबद्दल मुख्यप्रवाही माध्यमांमधून एकतर्फी वार्तांकन होत असल्याबद्दल सुरुवातीच्या दिवसांमध्ये शेतकरी त्रस्त झाले होते. इथे वार्तांकनासाठी येणाऱ्या मुख्यप्रवाही माध्यमांच्या काही पत्रकारांचा त्यांनी निषेध केला. हातात फलक घेऊन शेतकरी या पत्रकारांविरोधात घोषणा देत होते. 'गोदीमीडिया वापस जाओ' असं या फलकांवर लिहिलं होतं.
अशा रितीने हे आंदोलन पुढे जाताना दिसतं आहे. या आंदोलनात प्राण गमवावे लागलेल्या लोकांची आणि त्यांच्या धाडसाची आठवण ठेवणारं वर्तमानपत्रही शेतकऱ्यांसोबत आहे.
शेतकऱ्यांना आवाज मिळवून देणारं हे ग्लोबल गाणं
या आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हा सिंघू बॉर्डर आणि टिकरी इथे शौचालयाची व्यवस्था नव्हती. शेतकऱ्यांना उघड्यावरच शौचाला जावं लागत होतं. हे बघितल्यावर स्थानिक लोकांनी आपल्या घराची शौचालयं त्यांच्यासाठी उघडून दिली.
थोड्याच दिवसांमध्ये इथे फिरती शौचालयं उपलब्ध झाली. हरियाणातील महानगरपालिकेने तिथे शौचालयांची सोय करून दिली. शिवाय, अनेक एनजीओंनी इथे फिरत्या शौचालयांची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली. शेतकऱ्यांसाठी तंबूही ठोकून दिले. आंदोलनादरम्यान गुरमेल कौर यांच्यासारख्या काही लोकांचं निधन झालं.
आंदोलनाच्या ठिकाणी चालणारे तरुण आणि वयस्क लोकांनी भरलेले ट्रॅक्टर दिसतात. त्यांनी झेंडे धरलेत आणि घोषणा दिल्या जातायंत. फळं नि भाज्यांचं वाटप करणारे लोक कंवर ग्रेवालसारख्या पंजाबी गायकांची गाणी मोठ्या आवाजात ऐकत आहेत.

फोटो स्रोत, CHINKI SINHA/BBC
ट्रॅक्टरवर खूप मोठ्या आवाजात स्पीकर लावल्याचं मला दिसतं. रस्त्यांवर विलक्षण ऊर्जा सळसळतेय. एक ट्रॅक्टर डीजेचाही आहे- शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांना उत्साह वाटावा यासाठी या ट्रॅक्टरमध्ये डिस्को लाइट लावलेले आहेत.
हरप्रीत सिंह यांच्या ट्रॅक्टरवर 'पेचा पै' हे गाणं सुरू आहे. हे गाणं हर्फ़ चीमा यांनी लिहिलंय. चीमा आणि ग्रेवाल यांनी एकत्र मिळून हे गाणं गायलंय. या गाणं यू-ट्यूबवर ३० लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय.
हरप्रीत सिंहला नुकतीच कुठे 20 वर्षं पूर्ण झालेली आहेत. भठिंडामधील रामपुरा गावचे हरप्रीत कबड्डी खेळतात. दिल्ली आणि पंजाब यांच्यातली ही विभागणी आहे. पंजाबच्या वाटेत केंद्र सरकारची वाईट धोरणं आलेली आहेत, असं ते म्हणतात. 'पेचा पै' गाण्यातली 'काल्या नीति कर दे लागू' ही ओळ म्हणून ते लोकांना या 'काळ्या धोरणां'चा विरोध करायला सांगतो.
प्रतिकाराची ही गाणी गेल्या दोन-तीन महिन्यांमध्येच प्रदर्शित झालेली आहेत. या गाण्यांच्या व्हिडिओंमध्ये महामार्गावर बंद करून ठेवलेल्या ट्रकांची आणि ट्रॅक्टरांची दृश्यं आहेत. कृषी कायद्यांविरोधात संपूर्ण पंजाबमध्ये ठिकठिकाणी होत असलेल्या निदर्शनांची दृश्यंही त्यात आहेत. 'दिल्ली चलो' आंदोलनामध्ये येऊन केलेलं चित्रीकरणही व्हिडिओंमध्ये वापरण्यात आलं आहे. हरप्रीत सिंह त्यांच्या तीन चुलतभावांसोबत आणि काकांसोबत टिकरी बॉर्डरवर निदर्शनं करायला आलेत.
ते म्हणतात, "ही गाणी आम्हाला प्रेरणा देतात, म्हणून आवडतात. ही गाणी म्हणणारीही शेतकऱ्यांचीच मुलं आहे. त्यांना हा प्रश्न कळतो."

फोटो स्रोत, Getty Images
शाहीन बाग आणि जगभरातल्या इतर आंदोलनांमध्ये म्हटली जाणारी गाणीही शेतकऱ्यांच्या प्रतिकाराला आवाज मिळवून देत आहेत. आपण एकटे नाही आहोत, असहमती नोंदवण्याच्या भावनेने आपण इथे आलोय, पण आपल्यासोबत इतरही लोक आहेत, ही जाणीव या प्रतिकाराच्या गाण्यांनी होते, असं हरजीत आणि त्यांचे दूरचे भाऊ अमनदीप म्हणतात.
स्पीकरवर लागलेल्या गाण्यांच्या चालीवर ठेका धरून नाचणारे वृद्ध शेतकरीही वाटेत दिसतात. एखाद्या प्रश्नाभोवती लोकांना संघटित करताना अशा प्रतिकाराच्या गाण्यांचं महत्त्व खूप प्रकर्षाने दिसतं. या गाण्यांच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक कामं होतात. ही गाणी लोकांमध्ये संबंधित मुद्द्यांबाबत जागृती निर्माण करतात, त्यांना प्रेरणाही देतात, त्यांना भावनिक व बौद्धिक आवाहन करतात. इतिहासातल्या नायक-नायिकांची आठवण ठेवून लोकांमधील ऐक्य जागृत करायचं काम ही गाणी करतात.
प्रतिकाराच्या आणि राजकीय स्वरूपाच्या आंदोलनांमध्ये संगीतकारांनी ऐतिहासिक व सामाजिक स्तरावर मोलाची भूमिका निभावली आहे. 'दिल्ली चलो' आंदोलनातही हे दिसतं आहे. इथे वाजत असलेली बहुतांश गाणी अतिशय परखड आहेत. त्यात लय आहे. या गाण्यांचा आशय वातावरणाशी अनुरूप आहे.
'फार्म लॉ वापस जाओ'
'बेला चाओ' या अतिशय प्रसिद्ध इटालियन प्रतिकार-गीताचे सूर आवाज शाहीन बाग आंदोलनामध्येही ऐकायला आले होते. फूट पाडू पाहणाऱ्या राजकारणाचा विरोध करण्यासाठी पत्रकार सुगत श्रीनिवास व त्यांच्या पत्नी रोझी डिसूजा यांनी त्या गाण्याचं कन्नडमध्ये भाषांतर केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
आता 'बेला चाओ'च्या धाटणीवर पंजाबीमध्ये लिहिलेलं 'फार्म लॉ वापस जाओ' हे गाणं केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचं मुख्य गाणं झालं आहे. इटालियन 'बेला चाओ' गाण्याचा अर्थ आहे 'गुडबाय ब्यूटीफुल'. हे गाणं मुळात इटलीच्या उत्तरेकडील मोदिना महिलांनी म्हटलं होतं.
धान्य पिकवणाऱ्या शेतांमध्ये अत्यंत कष्टप्रद परिस्थिती होती, त्याचा विरोध करणाऱ्या या महिला होत्या.
या गाण्याची पहिली आवृत्ती 1906 साली गायली गेली, त्यानंतर त्यात बदल होऊन 1943 ते 1945 या दरम्यान फॅसिस्टवादाचा विरोध करणाऱ्या राजकीय संघटनांनी या गाण्याला आपलंसं केलं. इटलीतील यादवीदरम्यान नाझी जर्मनीविरोधात इटालियन लोकांमध्ये जागृती करण्यासाठी हे गाणं गायलं गेलं. इटलीतील ज्या भागांमध्ये उजव्या विचारसरणीची सरकारं होती, तिथे 2015 साली या गाण्यावर बंदीही घालण्यात आली होती.
'बेला चाओ'च्या धाटणीवर पंजाबीमध्ये लिहिलेल्या गाण्यातले शब्द असे: 'त्वाडे इन काले, कातिल कानूनान, दा इकोई जवाब - वापस जाओ.' (तुझ्या काळ्या, क्रूर कायद्यांचं एकच उत्तर- मागे फिर).
हे गाणं पूजन साहिल यांनी लिहिलं असून त्यांनी गायलेलं आहे.
पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांमधला बंधुभाव
आता हरियाणातील वेगवेगळ्या ठिकाणच्या रागिणी गायकांची गाणीही समोर आली आहेत. हरियाणाच्या लोकनाट्य परंपरेचा भाग असलेली रागिणी गीतं संवादांच्या आधारे म्हटली जातात.
या गाण्यांसाठी अख्खा ऑर्केस्ट्रा लावला जातो. त्यात सारंगी, ढोलकी, नक्कारा, पेटी, क्लेरिनेट यांसारखी वाद्यं असतात. समकालीन प्रश्नांवरही रागिणी गीतं लिहिली जातात.

फोटो स्रोत, SAT SINGH/BBC
बँकांचे शेकडो करोड रुपये हडप केल्याचा आरोप असणारे विजय मल्ल्या व नीरव मोदी यांच्या प्रकरणांवर जहाल व्यंग्योक्ती करणारी रागिणी गीतं तयार झालेली आहेत. आता शेतकऱ्यांचे प्रश्न आणि केंद्र सरकारशी होत असलेला त्यांचा संघर्ष, या मुद्द्यांवरही रागिणी गीतं लिहिली जात आहेत.
टिकरी बॉर्डरवर एक बॅनर झळकतोय. त्यावर लिहिलंय- 'नोगमा खाप'. इथे रागिणी गायक भगत सिंह यांचं नाव घेऊन गाणी म्हणतायंत. आम्ही तिथे असताना लोकगायक संदीप यांनी माइक घेऊन शेतकऱ्यांसंबंधीचं रागिणी गीत म्हणायला सुरुवात केली.
आंदोलनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हे रागिणी गायक इथे नव्हते. पण आठवड्याभराने हरियाणातल्या खाप पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही गायकमंडळी इथे आली. त्यांच्यासाठी जागोजागी तंबू आणि मंच तयार केलेले आहेत.

फोटो स्रोत, Reuters
शिवाय, इथे शेतकऱ्यांनी त्यांचं स्वतःचं कलम 288 लागू केलेलं आहे. सरकारी कायद्यामधील कलम 144च्या दुप्पट संख्या दाखवणारं हे प्रतीकात्मक कलम शेतकऱ्यांनी तयार केलंय. आंदोलनाच्या ठिकाणी शेतकरी सोडून इतर कोणालाही प्रवेश करायला बंदी असल्याचं या कलमानुसार जाहीर केलेलं आहे.
चौधरी महेंद्र सिंह टिकैत 1988 साली दिल्लीत बोट क्लब इथे ठिय्या आंदोलन करायला बसले, तेव्हा कलम 288 चा वापर पहिल्यांदा भारत किसान यूनियनने केला होता. त्यानंतर बोट क्लबचा पूर्ण परिसर हुक्का, लंगर, गाणी आणि घोषणांनी दुमदुमून गेला. सगळीकडे गाणी लिहिलेल्या वह्या उघडल्या गेल्या. जागोजागी कवितावाचन झालं.
टिकरी बॉर्डरवर आम्ही एका वृद्ध व्यक्तीला भेटलो. ते स्वतः हौशी कवी होते. त्यांनी स्वतःचं नाव 'जख्मी' असं सांगितलं. निदर्शनं आणि शेतकऱ्यांच्या वेदनेमुळे आपल्याला कविता लिहिण्याची प्रेरणा झाल्याचं ते म्हणतात.

ते म्हणाले, "मी तुम्हाला एक कविता ऐकवतो." 'जख्मी' असं नाव धारण करणाऱ्या या 71 वर्षीय शेतकरी आजोबांचं नाव आहे गुरदीप सिंह.
ते संगरूरमधून इथे आले आणि गावाजवळ त्यांची पाच एक जमीन आहे, असं ते म्हणाले. "शेतकऱ्यांच्या अडचणी बघून माझ्या शरीराला आणि आत्म्याला जखमा होतात."
अनेक पंजाबी क्रांतिकारी कवींनी 'जख्मी' हे टोपणनाव धारण केलं होतं. गुरदीप सिंह यांनीही तेच स्वीकारलं. त्यानंतर वंत सिंह खेली यांच्याशी आमची गाठ पडली.
भठिंडाचे रहिवासी असलेल्या खेली यांनी डिझेलच्या वाढत्या किमती आणि शेतकऱ्यांची दुर्दशा यांवर एक गाणं म्हटलं. हे गाणं आपणच लिहिल्याचं ते म्हणाले. निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांशी एकजूट असल्याचं दाखवण्यासाठी त्यांनी हिरव्या रंगाची पगडी घातलेली आहे. ते म्हणतात, "मी स्वतःच्या जमिनीविषयी आणि अवघड जगण्याशी संघर्ष करणाऱ्या माझ्या लोकांविषयी गाणी म्हणतो."
जोश आणि होश या दोन्हींचा समन्वय
इथे 'साहित्य चौपाल'सुद्धा उभा करण्यात आला आहे. इथे स्वयंसेवक आसपासच्या झोपड्यांमधल्या मुलांना शिकवतायंत. पंजाबमधील स्वयंसेवक जागोजागी रुग्णवाहिका घेऊन उपस्थित आहेत. ठिकठिकाणी आरोग्यसेवा केंद्र चालवली जात आहेत.
इतकंच नव्हे तर, रक्तदानाची शिबिरंही घेतली जात आहेत. दर्शन सिंह सांगतात, "या आंदोलनाची पायाभूत व्यवस्था अतिशय गुंतागुंतीची आहे. त्यात एकात एक अनेक स्तर आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
मानसाहून आलेल्या दर्शन सिंह यांचा शुभ्र खादीचा कुर्ता नि पगडी उजळलेली दिसते. कुर्त्याला कडक इस्त्री केलेली आहे. गुरने कला गावात त्यांची पाच एकर जमीन आहे. त्यांच्या गावाहून आलेल्या 10 इतर वयस्कर लोकांसोबत ते इथे आलेत. टिकरी बॉर्डरवरील निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी गावाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी पाठवण्यात आलं आहे.
हे लोक 26 नोव्हेंबर रोजी इथे आले. गावच्या सरपंचांनी इथे जाण्यासाठी त्यांची निवड केली. प्रत्येक पथकामध्ये काही वयस्कर लोक पाठवलेले आहेत, जेणेकरून तरुणांवर ते लक्ष ठेवतील आणि मार्गदर्शनही करतील.
ते म्हणतात, "हे तरुण गरम रक्ताचे आहेत. ते भडकण्याची शक्यता असते. त्यांना समजवायचं आणि सगळं शांततेनेच पुढे जाईल याची खातरजमा करायची, हे आमचं काम आहे."
इथल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी एक व्यवस्था उभी केलेली आहे. ते आळीपाळीने इथे येऊन बसतात. ठराविक वेळेने काही लोक माघारी जातात आणि त्यांच्या जागी पर्यायी लोक येतात.

फोटो स्रोत, Getty Images
"आंदोलन सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत. आधीपासूनच दिल्लीत येऊन निदर्शनं करायची आपली इच्छा होती, पण गव्हाची पेरणी करायची होती, त्यामुळे ते काम आटपून आपण इथे आलो," असं दर्शन सांगतात.
दरम्यान, गावोगावी खाण्यापिण्याच्या आणि इतर वस्तू गोळा करण्यासाठी केंद्रं उघडली गेली होती. व्हॉट्स-अॅप ग्रुपवर मेसेज पाठवून आणि पत्रकं वाटून शेतकऱ्यांनी स्वतःला संघटित करायला सुरुवात केली होती.
दर्शन सिंह सांगतात, "आमच्यातल्या प्रत्येकाकडे काही स्मार्टफोन नाहीये, पण तरुण लोक आम्हाला बातम्या कळवत होते." चॅटग्रुपवर त्यांना आंदोलनाच्या तयारीविषयीची माहिती मिळत होती. यातूनच तिथल्या वृद्धांना या कृषी कायद्यांविषयी माहिती मिळाली आणि हे कायदे विध्वंसक असल्याचं त्यांचं म्हणणं पडलं.

फोटो स्रोत, Getty Images
आंदोलनासाठी बसवण्यात आलेल्या व्यवस्थेनुसार, प्रत्येक गावातून एक पथक पाठवायचं होतं. सरपंचांना या पथकातील सदस्यांची निवड करायची होती. प्रत्येक कुटुंबातून एक व्यक्ती पुढे आली. यानुसार, एक सदस्य आंदोलनाच्या ठिकाणावरून परत आला की दुसरा सदस्य तिकडे रवाना होतो.
असे आळीपाळीने येऊन लोक इथे आंदोलनात सहभागी होतच राहतील, कारण हे आंदोलन दीर्घ काळ चालत राहण्याची शक्यता आहे, असं आंदोलनकर्ते सांगतात. ठराविक कालावधीनंतर गावातून इथे खाण्यापिण्याच्या नि इतर वस्तू येतच राहतील, जेणेकरून 'दिल्ली चलो' आंदोलन स्वतःच्या बळावर सुरू राहावं.
दर्शन सिंह आणि त्यांच्या मित्राने त्यांच्या न्यू हॉलंड ट्रॅक्टरवर बसवून आम्हाला टिकरी बॉर्डर आणि रोहतक रोडजवळच्या काही किलोमीटरच्या परिसराचा फेरफटका मारून आणलं. या रस्त्यावर ट्रकांमध्ये अनेक महिला होत्या.
महिला या आंदोलनाचा अविभाज्य भाग आहेत आणि गावात रसद गोळा करण्यातही त्या मदत करत आहेत. ही रसद दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जाते आहे. गावात आपली जमीन व कुटुंब यांची देखभालही महिला करत आहेत.
प्रतिकाराचं सौंदर्य सगळीकडे उधळून पडलेलं दिसतं
सिंघू आणि टिकरी बॉर्डर परिसरामध्ये सगळीकडे प्रतिकाराचं सौंदर्य उधळून पडलेलं दिसतं. दृश्यकलेपासून लिखित शब्द आणि प्रत्यक्ष सादर करायच्या कलांचा मेळावाच इथे भरलेला आहे. प्रतिमा, प्रतीका, ग्राफिटी आणि कपडे- अशा सगळीकडे कला उगवून आली आहे. निरनिराळ्या प्रकारच्या घोषणा, रोजच्या बोलण्यातले शब्द, व्यंगोक्ती आणि इतर विविध प्रकारच्या कलांद्वारे प्रतिकार केला जातो आहे.
शेतकऱ्यांनी बाहेरच्या लोकांना या आंदोलनाशी जोडून घेण्यासाठी समाजमाध्यमांद्वारे एक पर्यायी अवकाश निर्माण केला आहे.
मुक्त चित्रपटदिग्दर्शक व छायाचित्रकार या आंदोलनाचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी समाजमाध्यमांवर छायाचित्रं प्रकाशित करत आहेत. मुख्यप्रवाही माध्यमांमध्ये आंदोलनाबाबत बनावट बातम्या पेरल्या जात असल्यामुळे त्याचा विरोध करण्यासाठी ही व्यूहरचना वापरली जाते आहे.
दिल्लीतील डॉक्युमेन्ट्री दिग्दर्शक प्रतीक शेखर या वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या या आंदोलनाचं चित्रीकरण करत आहेत. मुख्यप्रवाही माध्यमांमधून या आंदोलनाशी निगडीत सगळ्या गोष्टी समोर येत नसल्याचं त्यांना जाणवलं. त्यामुळे त्यांनी स्वतःच समाजमाध्यमांवर छायाचित्रं प्रकाशित करण्याची व त्यांचा प्रसार करण्याची जबाबदारी घेतली. हा आपल्यासाठी जबरदस्त अनुभव असल्याचं ते म्हणतात.

फोटो स्रोत, CHINKI SINHA/BBC
ते म्हणाले, "फिल्म तयार करताना ठिकठिकाणी चित्रीकरण केलं जातं आणि त्यात आपला असा दृष्टिकोन घालायचा प्रयत्न होत असतो, पण इथे मला असं करता आलं नाही. इथे हे एखादा काफिला निघाल्यासारखं होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा एक मोठा समुद्र इथे आहे."
आपण शेतकरी आंदोलनासोबत आहोत, हे दाखवण्यासाठी ते इथे आले आणि आता ते दररोज ठिकठिकाणी छायाचित्रं काढत आहेत.
समाजमाध्यमं आणि संदेशनाच्या इतर माध्यमांचा वापर करून लोकांनी असे उपक्रम सुरू केल्यामुळे या आंदोलनाला अधिकाधिक समर्थन मिळू लागलं आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि इतर समूहांमधील लोकही इथे येऊन शेतकऱ्यांशी एकजूट दाखवून देत आहेत.
चहा देण्याचं काम करणाऱ्या एका वयस्क शेतकऱ्याने सांगितलं की, शेतकऱ्यांना कोणत्याही गोष्टीची गरज अशी नाहीये. पण इथे आंदोलन करत असलेले लोक अस्सल शेतकरी आहेत आणि ते इथे शांततेने निदर्शनं करत आहेत, एवढं लोकांनी समजून घ्यावं. "आम्ही खलिस्तानी नाहीयोत," असं ते म्हणाले.
'आम्ही शेतकरी आहोत, खलिस्तानी नाही' असे फलक 8 डिसेंबरला बहुतांश ट्रॅक्टरांवर लावण्यात आले. मेट्रो रेल्वेच्या मोठ्या खांबांवर प्रतिकाराची गाणी लिहिण्यात आली. काही लोकांनी ग्राफिटीही तयार केल्या.
लोकांचा काफिला
एक मोठं आंदोलनस्थळ झालेली ही जागा रोज नवनव्या रूपात समोर येतेय. दररोज मोठ्या संख्येने लोक इथे येऊन शेतकऱ्यांसोबत उभे राहत आहेत.
इथे बराच काळ पुरेल इतकं धान्य राखून ठेवलेलं आहे. इथे येणारे अनेक लोक वाटेत आहेत. प्रत्येक ट्रॉलीत गाद्या, कांबळी आणि बल्ब आहेत. ट्रॉल्या ताडपत्रीने झाकलेल्या आहेत. गाद्या उबदार राहाव्यात यासाठी गवत खाली ठेवलं जातंय. जेवण बनवण्यासाठी स्टोव्ह आणि गॅस सिलेंडर आहेत.

चपाती बनवण्यासाठीचं यंत्रही इथे आणून ठेवलेलं आहे. शिड्या आणि सोबत पाण्याच्या टाक्या आहेत. टीव्हीदेखील आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ही एक व्यवस्था म्हणून उभी राहिलेय. आंदोलनाची एक पायाभूत रचना आहे, त्याचे काही नियम आहेत आणि या नियमांना लोक बांधील आहेत.
"हरियाणातले शेतकरी दूध, भाज्या आणि पाण्याने भरलेल्या टाक्या घेऊन इथे येतायंत. ते आमचे छोटे भाऊच आहेत," असं दर्शन सिंह म्हणतात.
शेतकऱ्यांशी सुरू झालेली सरकारची चर्चा अनेक दिवसांपासून ठप्प आहे. शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात पुढच्या फेरीतील बैठक होणार असल्याचं सांगितलं गेलं आहे.
परंतु, वाढती थंडी आणि इतर अनेक अडचणी असतानाही आंदोलनकर्त्यांचा निग्रह थंड होणारा नाही.
दर्शन सिंह रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बोट दाखवून सांगतात, "या आंदोलनादरम्यान मरण पावलेल्यांचा जीव वाया जाणार नाही."
रस्त्याची एक बाजू गाड्यांच्या येण्या-जाण्यासाठी मोकळी ठेवण्यात आली आहे.
एकाच महिन्यात आंदोलनकर्त्यांनी या परिसराला सांस्कृतिक अवकाशामध्ये रूपांतरित केलंय. इथल्या तात्पुरत्या वाचनालयांमध्ये पुस्तकं आणून ठेवलेली आहेत. गाणी म्हटली जात आहेत. लोक नाचत आहेत. आंदोलन पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीची तजवीज केलेली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








