You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जयकिशोर प्रधान: लेकीच्या प्रेमापोटी त्यांनी 64व्या वर्षी घेतला MBBSला प्रवेश
- Author, संदीप साहू
- Role, बीबीसी हिंदीसाठी, भुवनेश्वरहून
ओडिसामध्ये एका निवृत्त अधिकाऱ्याने यावर्षी NEET परीक्षा उत्तीर्ण होत एमबीबीएससाठी प्रवेश घेतला आहे. सेवानिवृत्त बँक अधिकारी जयकिशोर प्रधान यांनी वयाच्या 64 व्या वर्षी हा पराक्रम केला आहे.
मुलींची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. हा पराक्रम करताना त्यांनी केवळ वयाचा अडसर पार केलेला नाही तर एका अपघातात आलेल्या अपंगत्वावरही मात केली आहे. 2003 साली एका कार अपघातात त्यांचा पाय निकामी झाला होता.
लहानपणापासूनच त्यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. 1974-75 साली बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मेडिकल परीक्षा दिली होती. मात्र, त्यात त्यांना यश मिळालं नव्हतं.
त्यावेळी मेडिकल परीक्षेसाठी आणखी एक वर्ष घालवण्यापेक्षा बीएससीमध्ये प्रवेश घेणं त्यांना योग्य वाटलं. त्यांनी भौतिकशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतलं आणि पुढे ते बँकेत रुजू झाले.
1982 साली त्यांच्या वडिलांची प्रकृती बिघडली. तेव्हा त्यांनी वडिलेकीच्या प्रेमापोटी त्यांनी 64व्या वर्षी घेतला MBBSला प्रवेशलांना बुर्लामधल्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यांच्यावर दोन ऑपरेशन झाले. मात्र, फरक पडला नाही. तिथून त्यांनी वडिलांना वेल्लोरच्या क्रिश्चियन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथून ते बरे होऊन घरी परतले.
वैद्यकीय शिक्षण
वडिलांवर उपचारसाठी हॉस्पिटलमध्ये थांबले असताना प्रधान यांच्या मनातली डॉक्टर होण्याची सुप्त इच्छा पुन्हा एकदा जागी झाली. मात्र, तोवर त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठीची वयोमर्यादा ओलांडली होती.
प्रधान यांना डॉक्टर होता आलं नसलं तरी 30 सप्टेंबर 2016 रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या जुळ्या मुलींच्या माध्यमातून स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला. त्यांच्या मुलींनी वैद्यकीय प्रवेश घेतला आणि प्रवेश परीक्षांसाठी स्वतः प्रधान यांनी त्यांची तयारी करून घेतली. त्यांच्या मेहनतीला अखेर फळ मिळालं आणि त्यांच्या दोन्ही मुली बीडीएस झाल्या.
2019 साली NEET परीक्षेत वयोमर्यादेच्या बंधनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना वयोमर्यादा काढून टाकली. प्रधान यांनी ही संधी हेरली आणि त्याच वर्षी NEET परीक्षा दिली.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "खरं सांगायचं तर गेल्या वर्षी NEET परीक्षेसाठी मी विशेष कुठलीच तयारी केली नव्हती. मुलींनी हट्ट केला म्हणून मी परीक्षेला बसलो. त्यावेळी मी उत्तीर्ण झालो नाही. मात्र, एक फायदा झाला - परीक्षा कशी असते, याची कल्पना मला आली. त्यामुळे यावेळी मी तयारीनिशी परीक्षेला गेलो आणि उत्तीर्ण झालो."
मुलीचा मृत्यू
प्रधान यांनी सप्टेंबर महिन्यात NEET परीक्षा दिली आणि डिसेंबर महिन्यात त्याचा निकाल आला. मात्र, दरम्यानच्या काळात एक अशी घटना घडली ज्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंबच हादरलं. नोव्हेंबर महिन्यात एका अपघातात त्यांच्या जुळ्या मुलींपैकी मोठ्या मुलीचा मृत्यू झाला.
ते सांगतात, "एमबीबीएसच्या शिक्षणासाठी तिनेच मला सर्वाधिक प्रेरणा दिली होती. आज ती असती तर तिलाच सर्वात जास्त आनंद झाला असता."
गेल्या गुरुवारी प्रधान यांनी बुर्ला इथल्या 'वीर सुरेंद्र साय इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंसेस अँड रिसर्च' (विमसार) या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
सध्या वर्ग सुरू झालेले नाहीत आणि कॉलेजसुद्धा त्यांच्या घरापासून फक्त 15 किमी अंतरावर आहे. त्यांनी घरून अभ्यास करायचा की हॉस्टेलवर रहायचं, हे अजून ठरवलेलं नाही.
मी त्यांना विचारलं की त्यांना विमसार ऐवजी दूरच्या किंवा परराज्यातल्य मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला असता तरी त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण घेतलं असतं का? यावर प्रधान तात्काळ म्हणाले, "नक्कीच घेतलं असतं. कारण हे केवळ माझं स्वप्न नाही तर माझ्या दिवंगत मुलीचंही स्वप्न होतं."
डॉक्टरकीची प्रॅक्टिस करणार
आपल्या मुलांच्या वयाच्या तरुणांसोबत शिक्षण घेणं आणि आपल्याहून कमी वयाचे शिक्षक, हे जरा विचित्र वाटलं नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रधान म्हणाले, "माझ्या सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला त्यांचा क्लासमेट मानावं आणि मला तशीच वागणूक द्यावी, यासाठी मी प्रयत्न करेन. शिक्षकांचं म्हणाल तर वयाने लहान असले तरी ते माझे गुरूच असणार आहेत."
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इतरांप्रमाणेच तेसुद्धा प्रॅक्टिस करणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, "हाच व्यवसाय करावा, या उद्देशाने मी परीक्षा दिली नाही. बँकेच्या नोकरीसोबतच माझी व्यावसायिक कारकीर्द संपली आहे. डॉक्टरकीतून रोजी-रोटी चालवण्याचा माझा इरादा नाही. माझ्या निवृत्ती वेतनात माझं भागतं. माझ्या परिसरातल्या ज्यांच्याजवळ उपचारासाठी पैसे नाहीत अशा गरिबांची मदत करता यावी, याच हेतूने मी डॉक्टर होण्याचं स्वप्न बघितलं. मला हे करता आलं तर मी स्वतःला भाग्यवान समजेन."
कुठलाही विक्रम करण्याच्या हेतूने प्रधान यांनी एमबीबीएसचं शिक्षण सुरू केलं नसलं तरी या वयात त्यांना वैद्यकीय पदवी मिळाली तर त्यांचंही नाव एखाद्या रेकॉर्ड बुकमध्ये येऊ शकतं.
एक मात्र नक्की एखादं लक्ष्य ठरवून ते पूर्ण करण्यासाठी झोकून देऊन मेहनत केली तर यश नक्की मिळतं, याचं प्रधान मूर्तीमंत उदाहरण आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)