अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार, जानेवारीत करणार आंदोलन, #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. अण्णा हजारे शेतकरी आंदोलन सहभागी होणार

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन करण्यासाठी अण्णा हजारे यांनी परवानगी मागितली असून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते आंदोलन करणार आहेत. टीव्ही मराठीने हे वृत्त दिले आहे.

अण्णांचे आंदोलन दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ असणार आहे. अण्णा हजारे यांनी आपले शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल असंही म्हटलं होतं.

कृषी कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू असताना अण्णा हजारे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

अण्णा हजारे यांनी आंदोलनात सहभागी होऊ नये यासाठी भाजपचे नेते हरिभाऊ बागडे, गिरीश महाजन यांनी अण्णांची भेटही घेतली होती.

2. 'भाजपची जिरवत नाही,तोपर्यंत आम्ही एकत्र' - विजय वडेट्टीवार

"महाविकास आघाडीतील तीन पक्ष समान किमान कार्यक्रमाच्या आधारावर एकत्र आले असून जोपर्यंत भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्र आहोत," असे वक्तव्य मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे.

अहमदनगर येथे सुरू असलेल्या ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. यूपीएचे नेतृत्त्व करण्यासाठी सोनिया गांधी सक्षम असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

ते म्हणाले, "विरोधकांमध्येही जो सर्वात मोठा पक्ष असतो तो नेतृत्त्व करत असतो. आम्ही अनेक राज्यांत निवडणुका जिंकलो पण भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे सरकार स्थापन करू शकलो नाही. लोकशाही पायदळी तुडवून गुलाम बनवण्याची आणि हुकूमशाहीकडे नेण्याची ही प्रवृत्ती आहे."

3. मुकेश अंबानी जगातील 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर

रिलायन्सचे शेअर्स घसरल्यामुळे समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी जगातील आघाडीच्या दहा श्रीमंतांच्या यादीतून अल्पावधीतच बाहेर पडले आहेत. ते आता अकराव्या स्थानावर आहेत. सकाळने हे वृत्त दिले आहे.

ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 76.5 बिलियन डॉलर म्हणजेच 5.63 लाख कोटी रुपये आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि फान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे.

भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मात्र मुकेश अंबानी पहिल्या स्थानावार आहेत. अंबानींनंतर विप्रोचे प्रमुख अजीम प्रेमजी यांचा नंबर लागतो.

4. 'संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरावा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी शरद पवार यांचे नेतृत्व सर्वांनी स्वीकारावे असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यासंदर्भात बोलताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांना मुख्यमंत्री केले तर महाराष्ट्राची प्रगती वेगाने होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. टिव्ही 9 ने हे वृत्त दिले आहे.

संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरावा असंही मुनगंटीवर म्हणाले. ते चंद्रपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षण उपसमितीवरून काँग्रेसचे नेते अशोक चव्हण यांना हटवा, अशीही मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची मदत सरकार का घेत नाही? मदत घेण्यात काय वावगे आहे? असाही प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

5. विमा कंपन्यांनी हजारो शेतकऱ्यांचा विमा नाकारला

अतिवृष्टीमुळे राज्यात ठिकठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरूनही त्यांना वेळेवर मदत मिळाली नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वीम्याची रक्कम दिली नसल्याचेही समोर येत आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

काही शेतकऱ्यांना मिळालेली विम्याची रक्कम तुटपुंजी असून शासनाला ती रक्कम परत करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी हजारो तक्रारी दाखल केल्यात आहेत.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले पण केवळ अठराशे रुपयांची मदत हिंगोलीत एका शेतकऱ्याला देण्यात आलेली आहे.

अतिवृष्टीनंतर 72 तासांत जिओ टॅगद्वारे तक्रार नोंदवली नाही म्हणून हजारो शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांनी नाकारल्याचा दावा आहे. यामध्ये परभणीतीली 22,413 शेतकरी, नांदेडचे 15,000 शेतकरी, उस्मानाबादचे 12 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)