अटल बिहारी वाजपेयी: सर्वसमावेशक नेता की धूर्त राजकारणी?

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्रात सध्या तीन पक्षाचं सरकार आहे म्हणून भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारला येता जाता तीन चाकी रिक्षा असं म्हणतात.

त्यांना उत्तर देताना नुकताच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे म्हणाले होते जर उद्धव ठाकरे तीन चाकी सरकार चालवत असतील तर भाजपच्या लोकांनी हे विसरू नये अटल बिहारी वाजपेयींनी 32 पक्ष असलेला NDA चा ट्रक चालवला आहे, मग ठाकरे सरकार का नाही चालणार.

सुरुवातीला केवळ 13 दिवस, नंतर 13 महिने पंतप्रधानपदाचा अनुभव वाजपेयींच्या गाठीशी होता. पण बहुमत नसलेलं कोणतंच सरकार टिकत नाही मग यावेळी तरी असा चमत्कार कसा होईल अशीच सर्वांची धारणा होती. आज ना उद्या हे सरकार पडणारच आहे असंच विरोधक म्हणायचे पण वाजपेयींनी तो चमत्कार घडवून दाखवला.

अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांना 'टॉवरिंग फिगर' म्हटलं होतं. देशातील एकही राष्ट्रीय नेता नसेल ज्याने वाजपेयींसोबतची आपली आठवण सांगितली नसेल. सर्व पक्षांसोबत त्यांचे जसे संबंध होते त्याकडे पाहिलं की त्यांची सर्वसमावेशकता लक्षात येते.

पण त्याच वेळी 'द हिंदू'ने त्यांचा उल्लेख धूर्त राजकारणी असा केला. वाजपेयी यांचं निधन झाल्यावर द हिंदूने त्यांच्या संपादकीयमध्ये म्हटलं होतं वाजपेयी हे धूर्त राजकारणी होते जे आपल्या तीक्ष्ण बुद्धीने विरोधकाला नामोहरम करत असत.

त्यांच्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीमध्ये असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा असं वाटलं होतं की वाजपेयी संपले आहेत, पण दरवेळी ते उठून उभे राहताना दिसले.

पक्षातील वेगवेगळे गट आणि इतर सहकारी पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी स्मित हास्य, सर्वसमावेशकता आणि मधुर संभाषण यांचा उपयोग होऊ शकतो पण अटल बिहारी वाजपेयी असे नेते होते ज्यांनी वेळप्रसंगी आपल्या विरोधकांचा वापरही स्वतःचे कार्य पुढे नेण्यासाठी केला आहे. या गोष्टीची दाद त्यांचे विरोधकही देतात.

हे करण्यासाठी मात्र धूर्तपणा त्यांच्यात नव्हता असं कुणीही म्हणू शकणार नाही.

जेव्हा कम्युनिस्टांच्या मदतीने वाजपेयींनी मारले होते एका दगडात दोन पक्षी

ही गोष्ट आहे 2003 सालची. अटल बिहारी वाजपेयी तेव्हा भारताचे पंतप्रधान होते. भारताने पोखरण येथे अणुचाचणी केल्यावर अमेरिकेची नाराजी ओढावून घेतली होती. त्यामुळे अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले. यातून बाहेर सुटण्यासाठी त्यांनी एक पर्याय भारतासमोर ठेवला होता.

भारताने अमेरिकेच्या बाजूने लढण्यासाठी इराकमध्ये आपलं सैन्य पाठवावं. पुन्हा अमेरिकेची नाराजी ओढावून घ्यायची आणि संबंध आणखी बिकट करायची त्यांची इच्छा नव्हती.

अटल बिहारी वाजपेयी यांनी कम्युनिस्ट नेते हरकिशनसिंग सुरजीत आणि ए. बी. वर्धन यांना चहासाठी आपल्या निवासस्थानी बोलवलं. ते दोघांसोबत शिळोप्याच्या गप्पा मारत होते.

हरकिशनसिंग सुरजीत यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती पण त्यांनाही थेट विचारावं वाटत नव्हतं. शेवटी वाजपेयीच त्यांना म्हणाले की अमेरिकेचा खूप दबाव आहे.

आपल्याला आपलं सैन्य इराकला पाठवावं लागेल. त्यावर हरकिशन सिंग सुरजीत चिडले आणि म्हणाले एका चहाच्या कपाच्या मोबदल्यात तुम्ही आमच्याकडून हे काम करून घेत आहात का. हे कदापीही शक्य होणार नाही. भारताचं सैन्य पाठवण्याला आमचा विरोध कायम राहील.

तेव्हा वाजपेयी त्यांना म्हणाले मग हा विरोध फक्त आपसांतच का दाखवत आहात. हा विरोध रस्त्यावर पण दिसला पाहिजे, पार्लमेंटमध्ये पण दिसला पाहिजे आणि त्याचा आवाज अमेरिकेपर्यंत पोहोचला पाहिजे.

त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन सुरू केलं. संसदेतही गदारोळ केला. वाजपेयींनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांना कळवलं की आम्ही तर सैन्य पाठवू शकत नाही कारण भारतात खूप विरोध होत आहे.

हरकिशन सिंग सुरजीत यांनीच हा किस्सा पत्रकारांना सांगितला होता.

वाजपेयी यांची उठबठ सर्व प्रकारच्या राजकारणी लोकांमध्ये होती पण याचा अर्थ असा नाही की त्यांना कधीच कुणाचा विरोध सहन करावा लागला नाही. जनसंघात असल्यापासून ते नंतरही जनसंघाचे ज्येष्ठ नेते बलराज मधोक आणि वाजपेयी यांच्यातला संघर्ष लपून राहिलेला नव्हता. याबाबत तुम्ही बीबीसी हिंदीने प्रसिद्ध केलेल्या या लेखात सविस्तर पणे वाचू शकता.

बलराज मधोक आणि वाजपेयी संघर्ष

बलराज मधोक हे जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबरोबर पक्षाच्या स्थापनेपासूनच होते. ते वाजपेयींना चार वर्षं ज्येष्ठ होते. त्याचबरोबर ते एक चांगले संसदपटू देखील होते. त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व होतं तर वाजपेयी हे उत्तम प्रचारक होते.

हिंदीभाषक राज्यांमध्ये त्यांचा विशेष प्रभाव होता. त्यांच्या वकृत्व आणि व्यक्तिमत्त्वामुळे तरुणांचा गराडा त्यांच्या भोवती नेहमी असे. तर मधोक हे तापट स्वभावाचे म्हणून ओळखले जात.

दोघांच्या स्वभावात आणि कार्यशैलीत फरक तर होताच पण जसा वेळ गेला तशी त्यांची मनं दुरावत गेली. त्यांच्यातला संघर्ष इतका विकोपाला गेला की मधोक यांनी वाजपेयी यांच्या खासगी आयुष्यात काय चालतं हे जाऊन तत्कालीन सरसंघचालक मा. स. गोळवलकर (गुरुजी) यांच्याकडे केली.

गोळवलकरांनी वाजपेयींना याबद्दल काही म्हटले नाही पण ही गोष्ट वाजपेयींपर्यंत गेली. त्यांनी योग्य संधीची वाट पाहिली.

1973 मध्ये जनसंघाने पक्षाबाबत एक रिपोर्ट तयार करण्याची जबाबदारी मधोक यांच्याकडे दिली होती. हा रिपोर्ट मधोक यांनी जनसंघाकडे सुपूर्द करण्याआधी प्रेसकडे दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

हीच ती संधी आहे असं पाहून वाजपेयींना त्यांना जनसंघातून बाहेर काढण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर त्यांना जनसंघातून बाहेर काढण्यात आलं होतं. बलराज मधोक यांचे निधन 2016 मध्ये झाले पण आयुष्याच्या शेवटची चार दशकं त्यांना राजकारण करता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

'पक्षातील अनेक नेत्यांना बाजूला सारले'

वाजपेयी यांच्यासोबत नानाजी देशमुख, दत्तोपंत ठेंगडी, सुब्रमण्यम स्वामी आणि गोविंदाचार्य असे अनेक मोठे नेते होते. वाजपेयींनी कुणाला प्रभावहीन केलं तर कधी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

त्यांच्याबाबत कुणी खासगीतही काही बोललेलं त्यांच्या कानावर आलं तर जनसंघातला आपला अधिकार वापरून ते त्या व्यक्तीवर कारवाई करत. याचं एक उदाहरण म्हणजे गोविंदाचार्य.

गोविंदाचार्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. नंतर ते भाजपचे महासचिव झाले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि जनसंघात समन्वय ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. एकदा ब्रिटीश हायकमिशनमध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये ते म्हणाले वाजपेयी हे जनसंघाचा 'मुखवटा' (मास्क) आहेत.

ही गोष्ट वाजपेयींच्या कानावर पडली. त्यांनी गोविंदाचार्यांना पत्र लिहून कारण विचारले. गोविंदाचार्यांचं म्हणणं होतं की त्यांनी वाजपेयींना पक्षाचा चेहरा (फेस) म्हटलं होतं पण सांगणाऱ्याने ते अयोग्य पद्धतीने सांगितलं. त्यांचे हे स्पष्टीकरण वाजपेयींना पटले नाही आणि शेवटी त्यांना आपला राजीनामा द्यावा लागला.

'इतर नेत्यांना दाबून ठेवत असत'

फक्त तेच नाही तर सुब्रमण्यम स्वामी, नानाजी देशमुख आणि दत्तोपंत ठेंगडी यांना वाजपेयींनी भारतीय जनता पक्षातच स्थान मिळू दिलं नाही असं सुब्रमण्यम स्वामींच्या पत्नी रोक्शना स्वामींनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.

1980 ला जनता पक्षाचं सरकार पडलं. जनता पार्टी म्हणजे आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या विरोधात तयार झालेली समविचारी पक्षांची पार्टी. 1980 ला झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या केवळ 31 जागा आल्या.

जर पुन्हा उभं राहायचं असेल तर जनसंघाला सर्वसमावेशक बनवावे लागेल असा प्रस्ताव वाजपेयींनी तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्याकडे मांडला. त्यातूनच 6 एप्रिल 1980 ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली.

रोक्शना सांगतात "वाजपेयी हे ईर्ष्याळू होते. आपल्यापेक्षा कुणी पुढे होतं ही भावना त्यांना पटत नव्हती. फक्त स्वामीच नाही तर अनेकांवर त्यांनी दाबून ठेवलं होतं."

दत्तोपंत ठेंगडी हे भारतीय मजदूर संघाचे प्रमुख होते. संघटनेचे प्रमुखपद सोडून वाजपेयी यांच्या हाताखाली काम करणं त्यांना अयोग्य वाटलं.

नानाजी देशमुख हे वाजपेयींना ज्येष्ठ होते. देशमुख हे जनसंघाचे कोषाध्यक्ष होते. पक्ष संघटना मजबूत करण्यात आणि अनेक देणगीदारांना जनसंघाबरोबर आणण्याचं काम त्यांनी केलं होतं. पण नव्या पक्षात आपल्याला आदराचं स्थान नसेल असं ओळखून ते चित्रकूटला निघून गेले आणि त्यांनी समाजसेवेचं काम हाती घेतलं.

'भाजपमध्ये एक तर मी राहील किंवा सुब्रमण्यम स्वामी राहतील' इतक्या स्पष्ट शब्दांत त्यांनी बाळासाहेब देवरसांना सांगितलं होतं त्यामुळे सुब्रमण्यम स्वामी त्यावेळी भाजपमध्ये येऊ शकले नाही.

'जमीन समतल करावी लागेल'

1992 मध्ये आडवाणी आणि विश्व हिंदू परिषदेनी सुरू केलेली राम मंदिराची मोहीम तीव्र झाली. 5 डिसेंबर 1992 रोजी अटल बिहारी वाजपेयींना लखनौमध्ये भव्य जनसमुदायासमोर भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेतला.

सुप्रीम कोर्टाच्या सूचनेचा अर्थ तुम्हाला मी स्पष्ट करून सांगतो असं ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाने कारसेवा थांबवा असे कुठेही म्हटलेलं नाही. सुप्रीम कोर्टाने भजन आणि कीर्तन करण्याची परवानगी दिली आहे. भजन एकट्यात तर होत नाही आणि कीर्तनाला तर अधिक लोक असतात. उभ्या उभ्या तर कीर्तन होऊ शकत नाही किती वेळ उभं राहणार. पण त्या जागेवर टोकदार दगडं आहेत. त्यामुळे जमीन समतल करावी लागेल.

दुसऱ्या दिवशी कारसेवकांकडून बाबरी मशीद पाडण्यात आली. अटल बिहारी वाजपेयी 5 डिसेंबरला लखनौहून दिल्लीला परतले. तुमच्या भाषणाचा रोख हा मशीद पाडण्याकडे होता का अशी त्यांना विचारणा झाल्यावर त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले की "माझे भाषण हे खेळीमेळीच्या भाषेतले होते. माझ्या म्हणण्याचा असा कुठलाही अर्थ नव्हता. आम्हाला मंदिर बांधायचं आहे पण ते नैतिक बळाच्या आधारावर बांधायचं आहे."

नेल्ली दंगलीच्या आधी प्रक्षोभक भाषण

1983 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी नेल्लीच्या दंगली आधी प्रक्षोभक भाषण केलं होतं. आसाममध्ये झालेल्या दंगलीमध्ये अंदाजे 2000 हून अधिक लोक ठार झाले होते. बहुतांश पीडित हे बंगाली मुस्लीम होते.

वाजपेयी यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की परदेशी लोक इथे येतात आणि सरकार काहीच करत नाही. समजा ते पंजाबमध्ये असते तर काय झालं असतं. लोकांनी त्यांचे तुकडे करून त्यांना फेकून दिलं असतं.

सीपीआय नेते इंद्रजीत गुप्ता यांनी 1996 मध्ये वाजपेयींनी हे म्हटलं होतं असं लोकसभेत सांगितलं होतं. या वक्तव्यावर कुणीही हरकत घेतली नाही आणि संसदेच्या कामकाजात त्याची नोंद झाली.

'वाजपेयींची कट्टर फासीवादी विचारधारा समोर आली'

धार्मिक तेढ वाढवण्याचा वाजपेयींच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग नव्हता. अटल बिहारी वाजपेयी यांचे अज्ञात पैलू पुस्तक लिहिणारे पत्रकार उल्लेख एन. पी. यांनी बीबीसी हिंदीसाठी लेख लिहिला होता.

त्यात त्यांनी म्हटलं आहे की 1970 मध्ये भिवंडीत दंगल उसळली होती. त्यावेळी वाजपेयी लोकसभेत म्हणाले होते की मुस्लीम लोक हे दिवसेंदिवस सांप्रदायिक होत चालले आहेत. याचा परिणाम असा होतोय की त्यांच्या या आक्रमक वागणुकीला हिंदू देखील तसंच उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी वाजपेयी यांच्या या वक्तव्याचा विरोध केला. त्या म्हणाल्या जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे जातीय तेढाला खतपाणी मिळत आहे आणि ध्रुवीकरण होत आहे.

पुढे इंदिरा गांधींनी संसदीय कामकाज अधिकाऱ्यांना विनंती केली की वाजपेयी यांचं वक्तव्य कामकाजातून वगळू नये कारण या वक्तव्यामुळे त्यांची कट्टर फासीवादी विचारधारा समोर आली आहे. पुढे त्या हे देखील म्हणाल्या की मला या गोष्टीचा आनंद आहे की वाजपेयी यांचे राजकीय वास्तव समोर आले आहे.

'राजधर्माचे पालन व्हायला हवं' ते 'आग कोणी लावली'

फेब्रुवारी 2002मध्ये गोध्रा येथे झालेल्या जळीतकांडानंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी पत्रकारांनी विचारलं होतं की तुमचा राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना काय संदेश आहे तेव्हा ते म्हणाले होते, "राजधर्माचे पालन व्हायला हवे. राजासाठी त्याची प्रजा समान असायला हवी. जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर भेदभावाला जागा नसली पाहिजे."

त्यांच्या या संदेशाची त्यावेळी खूप चर्चा झाली. असं म्हटलं जातं की वाजपेयींची इच्छा होती की नरेंद्र मोदींना पदावरून हटवण्यात यावं तर अडवाणी आणि इतर अनेक नेत्यांची इच्छा होती की मोदी हे पदावर असावेत. मोदी असतील तर भाजपला गुजरातमध्ये स्पष्ट बहुमत मिळेल असं भाजप नेत्यांचं म्हणणं होतं.

तसेच त्यावेळी शिवसेना ही भाजपसोबत होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देखील म्हटलं होतं की मोदी गया तो गुजरात गया. शेवटी सर्वांचे म्हणणे त्यांना ऐकावे लागले. एप्रिल 2002 मध्ये गोवा येथे भाजपची परिषद झाली होती. त्या परिषदेत वाजपेयींनी स्पष्ट केलं की मोदी हेच गुजरातचे मुख्यमंत्री राहतील.

वाजपेयींनी त्या परिषदेत भाषण केलं ते म्हणाले, "आपण हे विसरता कामा नये की गुजरातची घटना कशी घडली. त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्या निंदनीय आहेत पण आग कोणी लावली. ती आग कशी पसरली?"

वाजपेयींच्या 'राजधर्मा'च्या वक्तव्याबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी 'द क्विंट'साठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे की "वाजपेयींनी राजधर्माचे पालन व्हायला हवे असं वक्तव्य केलं होतं पण जेव्हा गुजरात जळत होतं तेव्हा ते काय करत होते असा प्रश्न त्यांना कुणीच विचारला नाही."

तडजोडीची कला

अटल बिहारी वाजपेयी हे नेमके कसे होते हे सांगायचं झालं तर त्यांच्याकडे तडजोडीची कला होती असं 'द हिंदू'ने त्यांच्या निधनानंतर म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेस, तेलुगू देसम अशा पक्षांचा पाठिंबा मिळवतानाच त्यांनी द्रमुकचा पाठिंबा देखील मिळवला.

वाजपेयींमुळे तेव्हाची भाजप सौम्य झाली की भाजपमुळे वाजपेयी कठोर झाले हे सांगता येणं कठीण आहे. पण या दोन्ही गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात आहेत.

लालकृष्ण आडवानी हे आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा होते तर अटल बिहारी वाजपेयी हे सर्वसमावेशक, सेक्युलर चेहरा होते. एकेकाळी केवळ दोन खासदार असलेल्या पक्षाला अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी या दोघांनी काँग्रेसचा पर्याय बनवलं, असं बीबीसी हिंदीचे तत्कालीन रेडिओ एडिटर राजेश जोशी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

(अधिक वाचनासाठी संदर्भ - जुगलबंदी - लेखक विनय सतपती, वाजपेयींचे अज्ञात पैलू - लेखक उल्लेख एन. पी, द सॅफ्रन टाइड - लेखक किंगशुक नाग)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)