31 डिसेंबरचे नियम : यंदाचा थर्टीफर्स्ट 11च्या आत आटोपा - BMC आयुक्त इकबाल सिंह चहल

कोरोना
    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी

यंदाचा थर्टीफर्स्ट नेहमीसारखा नाही, त्यामुळे लोकांनी सहकार्य करावं, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केलं आहे.

इकबाल सिंह चहल बीबीसी मराठीला नव्या नियमांबाबत सविस्तर मुलाखत दिली.

चहल म्हणाले, "थर्टीफर्स्टला हॉटेल, पब, रिसॉर्टमध्ये ज्या कुठल्या पार्टी करायच्या असतील, त्यांना रात्री 11 पर्यंतच परवानगी आहे. लोकांना लग्न, पार्टी, इतर कार्यक्रम रात्री 11च्या आधी करावे लागतील."

"दिवसभर लोकांवर नजर ठेवण्यासाठी आमच्याकडे टास्क फोर्स आहे. पण ते 24 तास करणं शक्य नाही म्हणून नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे," असं चहल म्हणाले.

कोरोना

यावेळी चहल यांनी कोरोनावरील लशीबाबत बोलताना म्हणाले, "लशीबाबत आम्हाला आलेल्या केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आम्ही तयारी केली आहे. पण लस कधी उपलब्ध होणार हे तेच सांगू शकतील."

त्याचप्रमाणे, लोकल ट्रेनचा विषय हा राज्य सरकारचा आहे आणि तेच याबाबत निर्णय घेतील, असं चहल यांनी स्पष्ट केलं.

"कोरोनाचा नवीन प्रकार अद्याप भारतात आला असल्याचं वाटत नाही. पण आम्ही खबरदारी म्हणून मागच्या 15 दिवस ट्रॅव्हल करत असलेल्या लोकांनी त्यांची हिस्ट्री द्यावी हे आवाहन केले आहे," असंही इकबाल सिंह चहल म्हणाले.

BMC आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मुलाखतीतले महत्त्वाचे मुद्दे :

  • कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोना टळला असा काहींना गैरसमज झाला आहे. मुंबईत आता स्थिती बरी असली, तरी हे संपलेलं नाही.
  • रेस्टॉरंट, पब, क्लब इत्यादी ठिकाणी शेकडो लोक जमा होतात, मास्क घालत नाहीत. असं होऊ नये म्हणून नाईट कर्फ्यू लावण्यात आलाय.
  • आता लग्नाचा मोसम आहे. रात्री 11 पर्यंत कार्यक्रम होऊ शकतात. पण 11 वाजल्यानंतर कार्यक्रम बंद करावे लागतील. 5 जानेवारीनंतर हे सर्व पुन्हा सुरळीत करू.
  • लोकांनी थर्टीफर्स्टसाठी बाहेर जावं, पण रात्री 11 वाजेपर्यंत घरी परतलं पाहिजेत.
  • रिसॉर्ट, मॅरेज क्लब असो किंवा काहीही असलं तरी सर्वांना हे नियम लागू असतील.
  • कोरोनापासून आपण लवकरात लवकर मुक्त व्हावं, यासाठीही हे सर्व लागू केलंय.
  • आता लावण्यात आलेले नियम 10-12 दिवस नीट पाळले, तर पुढे लॉकडाऊनची वेळ येणार नाही.
  • मुंबई महापालिकेची भक्कम तयारी आहे. कुठल्याही नव्या कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत.
  • लोकल ट्रेनचा विषय हा राज्य सरकारच्या अखत्यारित येतो. राज्य सरकार जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)