कोरोना व्हायरसची नवी प्रजात किती भयंकर? यावर लस परिणामकारक ठरणार का?

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

युरोपात कोरोना व्हायरसची नवी प्रजाती सापडल्यामुळे वेगवेगळ्या देशांतील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. इतकंच काय तर इतर देशांनी यूकेमधून येणाऱ्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे.

तेव्हा प्रश्न असा पडतो की, ज्याचं कुठे अस्तित्वही नव्हतं त्या प्रजातीनं आता इंग्लंडमध्ये खळबळ का माजवली आहे?

सरकारचं म्हणणं आहे की कोरोनाची ही प्रजाती अधिक वेगानं पसरत आहे.

सरकार या प्रजातीविषयी अधिक माहिती मिळवत आहे. पण, सध्यातरी अनिश्चितता आणि अनेक अनुत्तरित प्रश्न सगळ्यांसमोर आहेत.

विषाणू हे नेहमीच म्यूटेट (रूप बदलत) होत असतात. त्यामुळे विषाणू जर रुप बदलत असेल तर त्यावर लक्ष केंद्रीत करणं महत्त्वाचं असतं.

या प्रजातीची चिंता का?

तीन गोष्टींमुळे या प्रजातीनं सगळ्यांचं ध्यान आकर्षित केलं आहे.

  • ही प्रजात प्रचंड वेगानं आपली रुपं बदलत आहे आणि विषाणूच्या दुसऱ्या प्रकारची जागा घेत आहे.
  • असंही असू शकतं की विषाणूच्या त्या भागात बदल होत आहेत जे महत्त्वपूर्ण आहेत.
  • यापैकी काही म्यूटेशनवर लॅबमध्ये पाहणी करण्यात आली. त्यात असं दिसून आलं की ही प्रजाती मानवी पेशींवर अधिक परिणाम करत आहे.

या सगळ्या गोष्टींमुळे नवीन प्रजातीचा प्रसार होत आहे. असं असलं तरी या प्रजातीविषयी निश्चित अशी माहिती नाहीये.

योग्य वेळी योग्य ठिकाणी ही प्रजाती पोहोचली तर तिचा प्रसार अधिक वाढू शकतो. याचं लंडन हे उदाहरणं आहे, जिथं आतापर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले नव्हते.

"सध्या यासंदर्भात प्रयोगशाळेत प्रयोग करणं गरजेचं आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता या प्रयोगांचा निकाल येण्यासाठी आणि प्रजातीचा प्रसार थांबवण्याची कार्यवाही करण्यासाठी आपण काही महिने थांबू शकतो असं मला वाटत नाही," असं Covid-19 Genomics UK Consortiumचे प्राध्यापक निक लोमन व्यक्त करतात.

कोरोना

फोटो स्रोत, PA Media

किती वेगानं प्रसार?

सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा या प्रजातीविषयी माहिती मिळाली. नोव्हेंबरमध्ये कोरोनाच्या एक-चतुर्थांश रुग्णांमध्ये ही प्रजाती आढळून आली. डिसेंबरमध्ये एकूण कोरोना रुग्णांच्या दोन-तृतीयांश रुग्णांमध्ये ही प्रजाती आढळली.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय की, विषाणूच्या नव्या प्रजातीविषयी ठोस अशी माहिती नाहीये. पण, यामुळे कोरोनाची लागण होते आणि पहिल्यापेक्षा 70 टक्के अधिक वेगानं त्याचा प्रसार होतो.

यावरून कोरोना व्हायरसची ही नवी प्रजाती किती वेगानं पसरतेय याचा तुम्हाला अंदाज येईल.

शुक्रवारी इम्पिरिअल कॉलेज लंडन येथील डॉ. एरिक व्होल्झ यांनी सादर केलेल्या सादरीकरणात ही 70% संख्या दिसून आली.

चर्चेदरम्यान ते म्हणाले, "हे सांगणं खरोखरच घाईचं होईल. पण, आतापर्यंत आपण जे पाहत आहोत त्यावरून ही प्रजाती वेगान पसरत आहे. यापूर्वी कधीही पसरली नाही त्या वेगानं पसरत आहे. त्यामुळे यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे."

ही प्रजाती किती संसर्गजन्य असू शकते, याचा निश्चित असा आकडा नाही.

पण, हा प्रसार 70 टक्क्यांपेक्षा अधिक किंवा 70 टक्क्यांहून कमीसुद्धा असू शकतो, असं मला याविषयावर काम करणाऱ्या काही तज्ज्ञांनी सांगितलं.

पण, ही प्रजाती अधिक संसर्गजन्य आहे की नाही, हा प्रश्न कायम राहतो.

नॉटिंग्हम विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ प्रो. जोनाथन बॉल म्हणाले, "सार्वजनिक क्षेत्रातील पुराव्यांचं प्रमाण पुरेसं नाहीये. त्यामुळे व्हायरसचा संसर्ग खरोखरच वाढला आहे का याविषयीचं ठामपणे आताच सांगता येणार नाही."

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

नवी प्रजाती किती दूर पसरलीय?

असं म्हटलं जात आहे की. ही प्रजाती एकतर यूकेमधील एखाद्या रूग्णात सापडली किंवा मग कोरोना व्हायरसच्या म्यूटेशनवर नियंत्रण ठेवण्याची सुविधा नसलेल्या देशातून इंग्लंडमध्ये पोहोचली.

ही नवीन प्रजाती इंग्लंडमध्ये सगळीकडे आढळून आली आहे. पण, लंडनमध्ये अधिकाधिक रुग्णांमध्ये ती आढळलीय.

जगभरातील विषाणूच्या अनुवांशिक नमुन्यांवर नजर ठेवणाऱ्या Nextstrainची आकडेवारी सांगते की, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियामध्ये ही प्रजाती आढळून आली आहे आणि तिथं ब्रिटनमधून आलेल्या रुग्णांमुळेच तो आढळला आहे. नेदरलँडमध्येही काही प्रकरणं समोर आली आहेत.

दक्षिण आफ्रिकेत या प्रजातीप्रमाणेच एक प्रजात आढळली आहे, पण या दोन्ही प्रजातींमध्ये काही संबंध नसल्याचं समोर आलं आहे.

यापूर्वीही असं घडलं होतं का?

हो.

चीनच्या वुहानमध्ये सगळ्यांत पहिल्यांदा जो विषाणू सापडला तो सध्या जगभरात आढळणाऱ्या विषाणूंपेक्षा वेगळा आहे.

D614G प्रकारचा विषाणू फेब्रुवारी महिन्यात युरोपमध्ये सापडला आणि आता जगभरात सर्वाधिक हाच प्रकार आढळत आहे.

A222V नावाचा एक विषाणू युरोपमध्ये पसरला होता आणि स्पेनमध्ये सुट्टीकरता गेलेल्या लोकांमधून तो पसरला होता.

कोरोना

फोटो स्रोत, REUTERS/HANNAH MCKAY

नवीन प्रकार कुठून आला?

ब्रिटनमध्ये आता विषाणूचा जो प्रकार सापडला आहे त्यात बरेच बदल झाले आहेत.

याचं कारण हे असू शकतं की, रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे विषाणूला मारू न शकलेल्या रुग्णाच्या शरीरात हा विषाणू सापडला असावा.

आणि मग अशाप्रकारच्या रुग्णांमध्येच या विषाणूनं प्रबळ होत स्वत:चं रुप बदललं असावं.

यामुळे संसर्ग वाढेल का?

सध्या तरी याविषयी काही पुरावे नाहीत. पण यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

पण या विषाणूमुळे कोरोनाचं संक्रमणं वाढलं तर आधीच रुग्णांची संख्या प्रचंड असलेल्या दवाखान्यांवरचा दबाव वाढेल.

विषाणूच्या नव्या प्रकारावर लशीचा काय परिणाम होईल?

या नव्या प्रकाराच्या विषाणूचा कोरोनाच्या लशीवर परिणाम होणार हे निश्चित आहे, सध्या तरी असंच दिसत आहे.

ब्रिटनमध्ये सध्या ज्या तीन लशी आहेत त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते.

यामुळे विषाणूचं रुप बदललं तरी प्रतिकारक शक्ती त्यावर हल्ला करून त्याला अकार्यक्षम करू शकतील.

पण, या विषाणूला म्यूटेट होऊ दिलं तर ती चिंतेची बाब ठरू शकते, असं केंब्रिज यूनिवर्सिटीचे प्राध्यापक रवी गुप्ता सांगतात.

रवि गुप्ता सांगतात, "विषाणू लशीपासून वाचण्याच्या पावलावर आहे. या दिशेनं तो काही पावलं पुढे गेला आहे."

कोरोना

फोटो स्रोत, EPA/NEIL HALL

खरंतर लशीपासून बचाव करण्यासाठी विषाणू आपलं रुप बदलतो, यामुळे मग लस पूर्णपणे परिणामकारक ठरू शकत नाही. यामुळे विषाणू अधिक लोकांना संक्रमित करतो.

सध्या जे काही घडत आहे त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

ब्रिटनमधल्या ग्लास्गो यूनिवर्सिटीचे प्राध्यापक डेव्हिड रॉबर्टसन यांनी गेल्या शुक्रवारी म्हटलं होतं, "कदाचित हा विषाणू असा म्यूटेंट बनवेल ज्यामुळे लशीपासून बचाव होऊ शकतो, असंही होऊ शकतं."

आणि असं झालं तर मग परिस्थिती फ्लूसारखी होईल. जिथं लशीला नियमितपणे अपडेट करावं लागेल.

सध्या चांगली गोष्ट ही आहे की, आता ज्या लशी उपलब्ध आहेत, त्यामध्ये बदल करणं सोपं काम आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)