कोरोना व्हायरसच्या नव्या प्रजातीमुळे युरोपमध्ये खळबळ

फोटो स्रोत, Getty Images
युकेमध्ये कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन (प्रजात) सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युके सरकारसोबत याविषयी सखोल चर्चा केली.
कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत आहे. पण ही प्रजात जास्त जीवघेणी नाही. युकेसह नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही नवी प्रजात सापडल्याचं WHO ने बीबीसीला सांगितलं.
सध्या कोरोना व्हायरसवरच्या लशी बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या या नव्या प्रजातीतील फरकामुळे त्याच्यावर लशीचा प्रभाव पडेल की नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
पण कोरोनाच्या नव्या प्रजातीवर लस कशा पद्धतीने परिणाम करते, हे अद्याप स्पष्ट नाही.
युकेमध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडसह लंडनमध्ये सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. हे लॉकडाऊन कठोर स्वरूपाचं आहे. वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी हे लॉकडाऊन करण्यात आल्याचं सरकारने म्हटलं आहे.
कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे युरोपात मात्र खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
रविवारी (20 डिसेंबर) नेदरलँड्सने युकेमधून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली. ही बंदी 1 जानेवारीपर्यंत लागू असेल.
युकेमध्ये नव्या प्रजातीचा व्हायरस निर्माण झाल्याचं समजताच नेदरलँड्सने हा निर्णय घेतला आहे. नव्या विषाणूचा धोका किती प्रमाणात आहे याचा अभ्यास करण्यात येईल, हा धोका कमी कसा करता येईल, याचे प्रयत्न करण्यात येतील, असं नेदरलँड़्स सरकारने म्हटलं.
युकेमधून युरोपात दाखल होऊ शकणाऱ्या या व्हायरससंदर्भात युरोपियन महासंघातील सदस्य देशांसोबत चर्चा करणार असल्याचंही नेदरलँड्सने म्हटलं.
या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसीने WHO च्या साथरोगतज्ज्ञ मारीया व्हॅन केरखोव्ह यांच्याशी चर्चा केली.
"कोरोना साथ सुरू झाल्यापासूनच या विषाणूने आपल्या स्वरुपात बदल केल्याचं जगभरात आढळून आलं आहे," असं केरखोव्ह यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
नव्या प्रजातीबाबत कोणती माहिती उपलब्ध?
व्हायरसच्या नव्या प्रजातीबाबत आपण युके सरकारसोबत संपर्कात आहे, या विषाणूबाबत सखोल चर्चा केली जात आहे, असं WHO ने म्हटलं आहे.
व्हायरसच्या म्यूटेशनबाबत युके सरकारने माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटना इतर देशांना याबाबत माहिती देत राहील. या व्हायरसचा अभ्यास सुरू आहे.
दुसरीकडे, युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या विधानामुळे खळबळ माजली आहे. नवी प्रजात ही जुन्या प्रजातीपेक्षा 70 टक्के जास्त संसर्गजन्य आहे, असं जॉन्सन म्हणाले.
पण अधिकाऱ्यांच्या मते, याबाबत अद्याप सखोल पुरावे उपलब्ध नाहीत. नव्या प्रजातीच्या संसर्गाने मृत्यूदर जास्त असल्याचा किंवा नवी प्रजात लशीला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत असल्याचंही अद्याप स्पष्ट नाही, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
इंग्लंडचे मुख्य आरोग्य अधिकारी याबाबत सांगतात, "सध्याची परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाच्या नव्या म्यूटंटबाबत कोणतेही अंदाज आपण सध्यातरी लावू शकत नाही."
विषाणूंच्या स्वरुपात बदल होणं ही गोष्ट नवी नाही. पण ही बदललेली प्रजात कशा पद्धतीने वागते, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे यामध्ये जास्त महत्त्वाचं असल्याचं डॉ. केरखोव्ह सांगतात.
जगभरात काय घडतंय?
युकेमध्ये ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये ही शिथिलता देण्याचा निर्णय सध्यातरी बाजूला पडला आहे. ख्रिसमस काळात या भागात कोव्हिड प्रतिबंधक नियम लागू असतील.
इटलीमध्ये ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केलं आहे. संपूर्ण देशात रेड झोनचे निर्बंध लागू असतील. या काळात केवळ अत्यावश्यक दुकानेच उघडी असतील. इतर दुकाने उघडण्यास सरकारने बंदी घातली आहे. तसंच लोकांच्या प्रवासावरही अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.
नेदरलँड आणि जर्मनीमध्ये जानेवारीपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. जर्मनीत ख्रिसमसच्या दिवशी थोडी शिथीलता मिळेल. एका घरात चार जणांना आमंत्रित करण्याची यादिवशी परवानगी आहे.
ऑस्ट्रियामध्ये तिसरं लॉकडाऊन ख्रिसमसच्या दिवशीच लागू होईल. 26 डिसेंबरपासून फक्त अत्यावश्यक दुकाने उघडी राहती. लोकांनी बाहेर पडण्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Reuters
स्वीडनने गर्दीच्या वेळी सार्वजनिक वाहनांचा उपयोग करणाऱ्या नागरिकांनी मास्क घालण्याची सूचना केली आहे. आधीही स्वीडनने अशाच प्रकारची नियमावली आणली होती.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन गेल्या आठवड्यात कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. सध्या त्यांना खोकला, थकवा आदी त्रास जाणवत असला तरी त्यांनी काम करणं सोडलेलं नाही.
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान ईगोर मॅटोव्हिक गेल्या आठवड्यात युरोपियन महासंघाच्या बैठकीत उपस्थित राहिले होते. तिथून परतल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मॅटेव्हिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं कळल्यानंतर युरोपियन महासंघातील इतर अनेक नेत्यांनी सेल्फ-आयसोलट होणं पसंत केलं आहे.
ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य न्यू साऊथ वेल्सने नागरिकांवर नवे निर्बंध लागू केले आहेत. सिडनी शहर आणि परिसरात लोकांच्या एकत्र येण्यावर, सार्वजनिक कार्यक्रमांवर सध्या बंदी आहे. लोकांनी घरातच थांबावं अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
अमेरिकेत कोरोना लशीच्या वितरणाची जबाबदारी जनरल गुस्ताव पेर्ना यांच्याकडे देण्यात आली होती. अपेक्षित क्षमतेने लस-वितरणात आपण काहीअंशी अपयशी ठरल्याचं पेर्ना म्हणाले. यामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








