शेती : 'पावसामुळे 2 महिन्याआधी झालेलं नुकसान केंद्राच्या पथकाला आता कसं दिसणार?'

फोटो स्रोत, @airnews_arngbad
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झालं आहे.
21 ते 26 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांचा दौरा केंद्रीय पथक करणार आहे. ऑक्टोबर महिन्यातल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची हे पथक पाहणी करणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे खरिप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 नोव्हेंबरला जनतेला संबोधताना याविषयी माहिती देताना म्हटलं होतं की, "अतिवृष्टीमुळे राज्यातील 41 लाख हेक्टरवरील क्षेत्राचं नुकसान झालं आहे."
तर 23 ऑक्टोबरला त्यांनी म्हटलं, "आम्ही केंद्र सरकारकडे तीन वेळेस विनंती करून अद्यापही केंद्राचं पथक नुकसानीची पाहणी करायला आलं नाही."
आज (सोमवार) केंद्र सरकारचं पथक औरंगाबाद विभागातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहे. केंद्र सरकारच्या पथकानं नुकसान पाहणी करण्यासाठी यायला उशीर केला, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील तरुण शेतकरी गौतम गायकवाड सांगतात, "आता केंद्राच्या पथकानं पाहणी करून काहीच फायदा नाही. दोन महिन्यांपूर्वी जो कापूस खराब झाला होता, तो आता भूईसपाट झाला आहे. बाजरीचं म्हणसाल तर लोकांनी बाजरी काढून आता गहू पेरलाय. त्यामुळे या पथकाला आता ते नुकसान कसं दिसणार, उलट त्यांना काहीच नुकसान दिसणार नाही."

फोटो स्रोत, GORAKSHNATH BHANGE
केंद्राचं पथक मंगळवारी (22 डिसेंबर) सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहे.
सोलापूरमधील शेतकरी गोरक्षनाथ भांगे यांच्या बहिणीच्या शेतातील 5 एकर पेरूची बाग अवकाळी पावसामुळे जागेवर आडवी झाली होती.
बीबीसी मराठीला त्यांनी केंद्रीय पथकाच्या पाहणीविषयी सांगितलं, "केंद्राच्या पथकाला यायला प्रचंड उशीर झालाय. पथकाला एवढ्या उशीरा काय दिसणार आहे? जिथं माती वाहून गेली तो भाग तेवढा त्यांना दिसेल. पण, जे पिकांचं नुकसान झालंय ते मात्र आता दिसणार नाही."
मदतीच्या प्रतीक्षेत
उद्धव ठाकरे सरकारनं अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 10 हजार कोटींची मदत जाहीर केली होती.
त्यांनी म्हटलं होतं, शेतीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकार 10 हजार कोटी रुपये जाहीर करत आहोत. दिवाळीपर्यंत ही मदत पोहोचवण्यात येईल.
पण, अद्याप ही मदत आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याची तक्रार शेतकरी गौतम गायकवाड करतात.
शेतकरी नेत्यांची टीका
केंद्रीय पथकानं उशीर केला असं म्हणत शेतकरी नेत्यांनी टीका केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलंय, "2 महिने 6 दिवसांनी अतिवृष्टीचे झालेले नुकसान पाहण्यास केंद्रीय पथक आले आहे. आता शिवारात जाऊन काय बघणार? शेतकऱ्यांनी खासगी सावकराकडून पैसे घेऊन जमिनीची साफसफाई करून हरभरा, ज्वारीची पेरणी केली आहे. या पिकाकडे बघून पथक म्हणेल 'फसल तो बहुत अच्छी है' इनको मदत करने कि जरूरत नही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








