शेतकरी आंदोलनाला बराक ओबामांनी खरंच पाठिंबा दर्शवला का? - फॅक्ट चेक

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रिअॅलिटी चेक
- Role, बीबीसी न्यूज
कृषी कायद्यांविरुद्ध सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन संपण्याची चिन्हं दिसत नाहीत.
शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेतून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
हजारोंच्या संख्येत शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धरणे आंदोलनास बसलेले आहेत. सरकारने कायद्यात दुरुस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर शेतकरी संघटनांचं आंदोलन अधिक आक्रमक बनलं आहे.
शेतकरी आणि सरकारमधील या वादाचं राजकारणही होताना दिसत आहे. दोन्ही बाजूंनी सोशल मीडियात आपापलं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यादरम्यान, सोशली माडियावर विविध प्रकारचे दावेही केले जात आहेत. यामध्ये अनेक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वांच्या नावांचा उल्लेखही करण्यात येत आहे. याच दाव्यांची पडताळणी करण्याचा प्रयत्न बीबीसीने केला आहे.
मोदींना भेटणं लज्जास्पद होतं, असं ओबामा यांनी म्हटलं का?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात अनेकवेळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. बराक ओबामा यांनी 2014 साली व्हाईट हाऊसमध्ये मोदी यांना भेटल्यानंतर पश्चाताप व्यक्त केल्याचं या पोस्टमध्ये सांगितलं जातं.
या पोस्टमध्ये शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणारे हॅशटॅगही वापरलेले आहेत. हा फोटो तर खरा आहे. बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये भेटले तेव्हाचाच हा फोटो आहे.

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA
पण यासोबत लिहिलेली वाक्य, ही ट्वीटर पोस्ट चुकीची आहे.
ही पोस्ट लिहिताना वापरलेली भाषाही अशुद्ध आणि चुकीची आहे. ही फोटो एडिटिंगची कमाल आहे. ओबामा यांच्या ट्वीटर प्रोफाईलचं मिक्सिंग फोटोमध्ये करून चुकीचं कॅप्शन देण्यात आलं आहे.
ओबामा यांच्या ट्विटर टाईमलाईनवर अशा प्रकारची कोणतीच पोस्ट दिसत नाही.
जस्टीन ट्रुडो यांचा पाठिंबा?
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हेसुद्धा शेतकरी आंदोलनाच्या वादात ओढले गेले आहेत. शेतकरी आंदोलनात भारत सरकारच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
भारत सरकारने यावर सार्वजनिकरित्या नाराजी दर्शवली होती.
दरम्यान, काही लोकांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत जस्टीन ट्रुडो शीख समाजातील काही लोकांसोबत बसलेले दिसत आहेत.
कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या, विशेषतः शीख समाजातील लोकांची संख्या जास्त आहे. पण हा फोटो दिशाभूल करणारा आहे. कारण हा फोटो पाच वर्षे जुना आहे.
पंतप्रधान ट्रुडो यांच्या कार्यालयासोबत बीबीसीने बातचीत केली. त्यांनीही याचं स्पष्टीकरण दिलं.

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA
सध्या ट्रुटो दाढी ठेवतात. सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असलेल्या फोटोत त्यांची दाढी नाही, हा फोटो जुना आहे, असं त्यांनी सांगितलं.
2015 मध्ये जस्टीन ट्रुडो ओटावा शहरात एका गुरुद्वारेत गेले होते. त्यावेळचा हा फोटो आहे. या दौऱ्याची बातमी अनेक स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये छापून आली होती.
ट्रुडो यांचे शेतकरी आंदोलनाबाबत कोणतेही विचार असतील, पण त्यांचा हा फोटो चुकीच्या कॅप्शनसह शेअर केला जात आहे.
राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली?
सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ शेअर केला जात आहे. या व्हीडिओ भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना दिसतात.
राजनाथ सिंह या व्हीडिओमध्ये म्हणतात, "जर मला आधीच या आंदोलनाबाबत माहिती असतं, तर मी त्याच दिवशी इथं येऊन माझा पाठिंबा दर्शवला असता."
हा व्हीडिओ अनेकांनी शेअर केला. या आंदोलनामुळे भाजपमध्ये मोठी फूट पडल्याचं त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, SOCAIL MEDIA
पण हा व्हीडिओ 2013 चा आहे, त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि भाजप विरोधात होता. त्यावेळी झालेल्या एका शेतकरी आंदोलनाला राजनाथ सिंह यांनी पाठिंबा दिला होता.
राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळवून देण्याची मागणी केली होती. हे भाषण बहुतांश ठिकाणी उपलब्ध आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांविरुद्ध आहेत?
सोशल मीडियावर शेअर केल्या जात असलेल्या एका फोटोत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि उद्योगपती मुकेश अंबानी हे सोबत दिसत आहेत. या फोटोत दोघेही एकमेकांशी हात मिळवताना दिसत आहेत. हा फोटो आंदोलनाच्या एक दिवस आधीचा असल्याचा दावा केला जात आहे.
या पोस्टमध्ये लिहिलंय, "एका बाजूला काँग्रेस शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहे आणि दुसऱ्या बाजूला अंबानी यांची भेट घेते, हे कसलं राजकारण?"

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA
या पोस्टचा अर्थ, अमरिंदर सिंग यांच्या पक्षाने सार्वजनिकरित्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला असला तरी ते स्वतः उद्योगपतींच्या हितासाठी काम करत आहेत.
मात्र हे खरं नाही. हा फोटो ऑक्टोबर 2017 चा आहे. त्यावेळी अमरिंदर सिंग मुकेश अंबानी यांना पंजाबमध्ये गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करण्यासाठी भेटले होते.
अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव मान्य केला, असा दावाही चुकीचा आहे. अमरिंदर सिंग कृषी कायदे पूर्णपणे मागे घेण्याची मागणी करत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








