You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या या फोटोचं सत्य काय?
- Author, गीता पांडेय
- Role, बीबीसी न्यूज
शेतकऱ्यांच्या या आंदोलनातील एक व्हायरल फोटो, सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर धडक दिलीये. शेतकऱ्यांवर पोलीस लाठीमार करतायत. तर, अश्रुधुराच्या मदतीने जमावाला पांगवण्याचा प्रयत्न होतोय.
पीटीआयचे फोटोग्राफर रवी चौधरी यांनी काढलेल्या या फोटोत, निमलष्करी दलाच्या पोलीस जवानाने एका वयोवृद्ध शेतकऱ्यावर 'काठी' उगाल्याचं दिसून येतंय. आपल्या न्याय-हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेला हा शेतकरी पंजाबमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा चेहरा बनला आहे.
या फोटोवरून दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. विरोधक या फोटोचा वापर, मोदी सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण करत असल्याचं दाखवण्यासाठी करत आहेत. तसंच भारतीय जनता पक्षाकडून शेतकऱ्यांना मारहाण झाली नसल्याचं खोटं सांगितलं जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
रस्त्यावर उतरलेल्या हजारो शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला वेढा घातलाय. दिल्लीकडे येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे त्यांच्या विरोधात आहेत. तर, दुसरीकडे खुल्या बाजारात माल विकल्याने शेतकऱ्यांना काहीच अडचण होणार नाही, असा मोदी सरकारचा दावा आहे.
सरकारने केलेला दावा न पटल्याने हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांना राजधानीत शिरण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखलं आहे.
शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखून धरण्यासाठी हजारोंच्या संख्येने पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये ठिकठिकाणी संघर्ष होत असल्याचं दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना परत पाठवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुर आणि पाण्याचा मारा केला.
शेतकरी आंदोलनाचा चेहरा बनलेल्या या शेतकऱ्याचा फोटो गेल्या शुक्रवारी उत्तर-पश्चिम दिल्लीच्या सिंघू सीमेवर घेण्यात आला. पोलिसांची तटबंदी तोडून शेतकरी दिल्लीत शिरण्यात यशस्वी झाले.
फॅक्टचेक करणारी वेबसाइट बूमलाइव्हशी बोलताना, या शेतकऱ्याचा फोटो घेणारे, फोटोग्राफर रवी चौधरी सांगतात, "आंदोलनकर्ते आणि पोलीस एकमेकांना भिडले. दगडफेक झाली, बॅरिकेड तोडण्यात आले, बसची तोडफोडही करण्यात आली."
ते पुढे म्हणतात, "पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या वृद्ध शेतकऱ्यालाही मारहाण झाली होती."
हा फोटो काही क्षणातच व्हायरल झाल्यानंतर हजारो लोकांनी फेसबूक, इंन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला.
अनेकांसोबत फोटोग्राफरनेही 'जय जवान-जय किसान' ही घोषणा लिहून हा फोटो टॅग केला.
भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धा दरम्यान ही घोषणा दिली होती. जवान आणि शेतकरी देशाच्या भविष्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, हे सांगण्यासाठी ही घोषणा देण्यात आली होती.
कॉंग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधी यांनी फोटो ट्विट करत म्हटलं, "हा फोटो पाहून खूप दु:ख होतंय. 'जय जवान-जय किसान' ही आपली घोषणा होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकाराने, जवानाला शेतकऱ्याविरोधात उभं केलं."
भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालविय यांनी राहुल गांधी यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांनी तीन सेकंदाची एक व्हीडिओ क्लिप शेअर करत, शेतकऱ्याला मारहाण झाली नसल्याचा दावा केला आहे.
त्यानंतर, मायविया यांचं ट्विट ट्विटरने प्रोपगंडा मीडिया म्हणून, लेबल केल्याचं अनेकांनी निदर्शनास आणून दिलं.
भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालविया यांचा दावा चुकीचा असल्याचं बूमलाइव्हला मिळालेल्या व्हीडिओवरून स्पष्ट होतं. ज्या शेतकऱ्याचा फोटो छापण्यात आला होता, ते सुखदेव सिंह यांना शोधून त्यांचा इंटरव्हू करण्यात आला आहे.
या "शेतकऱ्याला एक नाही तर दोन पोलिसांनी टार्गेट केल्याची" बातमी समोर आली होती. हरियाणा-दिल्ली सीमेवर आंदोलन करणारे सुखदेव सिंह म्हणाले, "मला हात, पाठ आणि पोटऱ्यांवर जखम झाली आहे."
कडाक्याच्या थंडीत आंदोलन करणाऱ्या पंजाब-हरियाणाच्या वयोवृद्ध शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा केल्याची दृश्य भारतभर पसरली आहेत. या फोटोंमुळे भारतात शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे.
सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारत सरकारने ही परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली, त्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. "शांततापूर्ण मार्गाने आंदोलनाचा सर्वांना अधिकार" असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
भारत सरकारतर्फे त्यांचं वक्तव्य "अर्धवट माहितीवर आधारीत" आणि "गरजेचं नाही" अशी प्रतिक्रिया दिली होती.
सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलंय. पहिल्या टप्प्यातील चर्चा निष्फळ ठरलीय. दुसऱ्या टप्प्यातील चर्चा गुरूवारी होणार आहे.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर अनेक ठिकाणी मोठे कॅम्प उभारले आहेत. सरकारने कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी त्यांची मागणी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)