शेतकरी आंदोलन : MSP म्हणजे काय? मोदी सरकार शेतकऱ्यांची मागणी का मान्य करत नाहीये?

शेतकरी

फोटो स्रोत, RAWPIXE

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एकीकडे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सरकारला नवीन कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात 'हो' किंवा 'नाही' असे उत्तर मागितलं आहे. नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. यात कोणतीही तडजोड करण्यास ते तयार नाहीत.

दुसरीकडे केंद्र सरकारचे मंत्री शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (MSP) लेखी आश्वासन देऊन इतर अनेक मागण्या मान्य करण्यास तयार असल्याचं म्हणत आहेत. पण केंद्र सरकार अजूनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मनःस्थितीत आहे असं दिसत नाही.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीनुसार त्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांपैकी एक आहे, "सरकारने किमान आधारभूत किंमतीपेक्षा (Minimum Support Price - MSP) कमी भावात माल खरेदी करणं हा अपराध घोषित करावा आणि सरकारी खरेदी ही हमीभावानेच करण्यात यावी."

हमीभावाच्या या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं होतं, "मी यापूर्वीही म्हटलं होतं आणि आता पुन्हा एकदा सांगतो, MSPची पद्धत सुरू राहील, सरकारी खरेदी सुरू राहील. आम्ही इथे आमच्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. अन्नदात्याची मदत करण्याचे सगळे प्रयत्न आम्ही करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना चांगलं आयुष्य मिळेल, याची खात्री करू."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

20 सप्टेंबर 2020ला त्यांनी हे ट्वीट केलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

पण ही गोष्ट विधेयकात लेखी द्यायला सरकार तयार नाही. याआधीच्या कायद्यांमध्येही ही गोष्ट लिखित स्वरूपात नव्हती, म्हणूनच नवीन विधेयकातही याचा समावेश करण्यात आला नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

पण खरंच सांगण्यात येतेय, तितकी ही गोष्ट सोपी आहे का?

हमीभावानुसार सरकारी खरेदी सुरू ठेवणं आणि हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विकत घेण्याला अपराध जाहीर करणं हे शेतकरी संघटनांना वाटतं तितकं सोपं नाही.

असं करणं सरकारसाठी कठीण का आहे?

हे समजून घेण्यासाठी आधी पाहूयात की MSP म्हणजे काय आणि हा हमीभाव कसा ठरवला जातो.

शेतकरी

फोटो स्रोत, Getty Images

MSP - किमान आधारभूत किंमत म्हणजे काय?

शेतकऱ्याच्या हितासाठी देशामध्ये किमान आधारभूत किंमत (MSP) ची प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. बाजारात जरी शेतमालाच्या किंमतीत घसरण झाली, तर तेव्हाही केंद्र सरकार ठरवलेल्या हमीभावानेच शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करतं. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान टळतं.

एखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला हमीभाव एकसमान असतो. कमिशन फॉर ॲग्रीकल्चर कॉस्ट अँड प्रायझेस - CACP च्या आकडेवारीवरून भारत सरकारचं कृषी मंत्रालय हमीभाव ठरवतं. यानुसार सध्या 23 शेतमालांची खरेदी सध्या सरकार करतं. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांचा यात समावेश आहे.

देशातल्या फक्त 6 टक्के शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो आणि यामध्ये पंजाब - हरियाणाच्या शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त असल्याचा अंदाज आहे. याच कारणामुळे या नवीन विधेयकाला या भागांतूनच जास्त विरोध होतोय.

कृषी विधेयकांमुळे काय बदललं?

हमीभावाबद्दल शेतकऱ्यांना काळजी वाटण्यामागे काही कारणं असल्याचं भारत सरकारचे माजी कृषी सचिव सिराज हुसैन सांगतात.

"शेतमालाची सरकारी खरेदी सुरू राहील अशी कोणतीही ऑर्डर सरकारने अद्याप लिखित स्वरूपात काढलेली नाही. आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी या फक्त तोंडी आहेत. आणि कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्यामागचं हे एक कारण आहे," हुसैन सांगतात.

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES/GETTY IMAGES

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी खरेदी सुरू राहण्यासाठीची ऑर्डर कृषी मंत्रालय काढणार नसून मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग म्हणजेच अन्न प्रक्रिया मंत्रालय ही ऑर्डर काढत असतं.

दुसरं कारण म्हणजे राज्य सरकारांना अद्याप रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड देण्यात आलेला नाही. दर वर्षी केंद्र सरकार तीन टक्क्यांनी हा निधी राज्य सरकारांना देत असतं. पण यावर्षी केंद्र सरकारने हा निधी द्यायला नकार दिलाय. या निधाचा वापर ग्रामीण भागांतल्या पायाभूत सुविधांसाठी केला जातो. यामध्ये शेती विषयक सुविधांचाही समावेश केला जातो.

नवीन कृषी विधेयकांनंतर झालेले हे दोन महत्त्वाचे बदल शेतकऱ्यांना दिसतायत.

पहिलं कारण: शेतमालाचा दर्जा कसा ठरणार?

हमीभावाने खरेदीची तरतूद जरी सरकारने या विधेयकात घातली तरी शेवटी या नियमाचं पालन कसं होणार, असं सिराज हुसैन म्हणतात.

"हमीभाव हा कायम 'फेअर ॲव्हरेज क्वालिटी' साठी दिला जातो. म्हणजेच शेतमाल ठराविक दर्जाचा असल्यास त्याला किमान आधारभूत किंमत दिली जाईल."

"पण शेतमाल या योग्य दर्जाचा आहे वा नाही हे कसं ठरवणार? जो शेतमाल या मानकांच्या दर्जानुसार असणार नाही, त्याचं काय होणार? अशा परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांची ही मागणी विधेयकात समाविष्ट केली तरी ती अंमलात आणणं कठीण असेल," हुसैन सांगतात.

दुसरं कारण: भविष्यामध्ये सरकारकडून कमी खरेदी होण्याची शक्यता

सरकारने गहू आणि तांदळाची खरेदी कमी करायला हवी असा सल्ला सरकारच्या अनेक समित्यांनी दिलेला असल्याचं सिराज हुसैन सांगतात. याविषयीच्या शांता कुमार समितीपासून ते नीती आयोगाच्या पाहणीपर्यंतचे अहवाल सरकारकडे आहेत.

शेतकरी

फोटो स्रोत, AFP

याच उद्देशाने सरकार कामही करत आहे. येत्या काही दिवसांमध्ये खरेदीचं हे प्रमाण कमी होणार आहे. आणि हीच चिंता शेतकऱ्यांना सतावतेय.

सरकार शेतमाल विकत घेणार की नाही, घेणार असल्यास किती घेणार आणि कधी घेणार? जर हेच ठरलं नसेल तर मग हमीभावाबद्दल लिखित स्वरूपात कायद्यामध्ये कसं देणार?

आर. एस. घुमन हे चंदीगढच्या सेंटर फॉर रिसर्च इन रूरल अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये प्राध्यापक आहेत. कृषी आणि अर्थशास्त्राचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. सरकार हमीभावाविषयीची मागणी का मान्य करत नाही याबद्दलची इतर अनेक कारणं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितली.

कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर

फोटो स्रोत, AJAY AGGARWAL/HINDUSTAN TIMES VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर

तिसरं कारण - खासगी कंपन्या MSPने शेतमाल खरेदीला तयार होणार नाहीत.

आर. एस. घुमन यांच्या म्हणण्यानुसार, "भविष्यात सरकार शेतमाल कमी घेणार असेल तर शेतकरी आपला माल खासगी कंपन्यांना विकतील हे उघड आहे. आपला नफा जास्त रहावा यासाठी MSP पेक्षा कमी भावाने माल विकत घेण्याची खासगी कंपन्यांची इच्छा असेल. म्हणूनच सरकारला खासगी कंपन्यांवर ही अट लादायची नाही. यामध्ये सरकारचेही काही हेतू आहेत आणि खासगी कंपन्यांनाही याने अडचण होणार आहे."

पण कॉर्पोरेट दबावामुळे सरकार असं करत नसल्याचं म्हणणं सिराज हुसैन यांना पटत नाही. केंद्र सरकारचे कृषी सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे.

चौथं कारण - शेतकरीही येऊ शकतात अडचणीत

MSPच्या मुद्द्याबाबत सरकारने भूमिका न घेणं अजून एका पद्धतीने समजून घेता येऊ शकतं, असं आर. एस. घुमन सांगतात. यासाठी दोन शब्दांचे अर्थ समजून घेणं गरजेचं आहे.

पहिला शब्द - मोनॉपली (Monopoly)

म्हणजे विकणारा एकच आहे आणि तो त्याला हवं ते करू शकतो. त्याच्या मनाला येईल ती किंमत तो वसूल करू शकतो.

दुसरा शब्द - मोनॉप्सनी (Monopsony)

म्हणजे खरेदी करणारा एकच आहे आणि त्याचंच म्हणणं ऐकलं जातं. म्हणजे तो त्याला हव्या त्या किंमतीला सामान विकत घेऊ शकतो.

"सरकारने मंजूर केलेल्या नवीन विधेयकांमुळे येणाऱ्या दिवसांत कृषी क्षेत्रात 'मोनॉप्सनी' तयार होईल," असं आर. एस. घुमन यांना वाटतं. शेती क्षेत्रात काही ठराविक कंपन्या आपला गट (कार्टेल - Cartel) तयार करतील. आणि मग या कंपन्या ठरवतील त्या किंमतीला शेतकऱ्यांना माल विकावा लागेल.

जर कायद्यामध्ये हमीभावाची तरतूद जोडण्यात आली तर त्याने शेतकऱ्यांवरचं खासगी कंपन्यांचं वर्चस्व संपुष्टात येईल. याचा परिणाम म्हणून या कंपन्या शेतमाल कमी विकत घेण्याची शक्यता आहे.

सरकार शेतकऱ्यांकडून कमी शेतमाल विकत घेण्याचा विचार एकीकडे करत असताना दुसरीकडे हमीभावाने संपूर्ण शेतमाल विकत घ्यावा लागेल यासाठी खासगी कंपन्यांना बांधिल करण्याचा सरकारकडे कोणताही मार्ग नाही.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी वाढू शकतात. ते आपला माल कोणाला विकणार. हमीभाव तर राहिलाच कदाचित त्यांनी पीक लावण्यासाठी केलेला खर्चही निघू शकणार नाही.

पाचवं कारण : हमीभाव ठरवणं सरकारला टाळायचंय

आर. एस. घुमन सांगतात, "MSPमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचा भाव ठरवण्यासाठी एक किमान पातळी मिळते, एक रेफरन्स पॉईंट मिळतो. म्हणजे पिकाची किंमत त्यापेक्षा कमी होऊ शकत नाही. MSP त्यांना एक सोशल सिक्युरिटीही देतं."

पण खासगी कंपन्या वस्तूंच्या किंमती मागणी आणि पुरवठा यावरून ठरवतात, असा त्यांचा अंदाज आहे.

शेतकरी आंदोलन

खरेदी करणाऱ्याकडून जास्त किंमत वसूल करण्यासाठी 'मोनॉपली' वा एकाधिकारशाहीने कृत्रिम रित्या काही प्रमाणात धान्याचा तुटवडा निर्माण केला जाऊ शकतो. तर 'मोनॉप्सनी' ने खरेदी कमी करत मागणी कमी करून शेतकऱ्याला माल कमी किंमतीत विकायला भाग पाडता येऊ शकतं.

म्हणूनच सरकारला दोन्ही बाजूंच्या वादामध्ये पडायचं नाही.

ही गोष्ट या सरकारला या दोन्ही बाजूंपुरतीच ठेवायची आहे. जर कायद्यामध्ये हमीभावाची तरतूद आणली तर मग याविषयीच्या प्रत्येक खटल्यात तीन पक्ष असतील. सरकार, शेतकरी आणि खासगी कंपनी.

यावर तोडगा काय?

एका अंदाजनुसार भारतामधल्या 85% शेतकऱ्यांकडे शेतीसाठी पाच एकरांपेक्षा कमी जमीन आहे. म्हणजेच हे शेतकरी अल्पभूधारक आहेत.

हमीभावापेक्षा कमी किंमतीने खरेदी करण्याला अपराध जाहीर करूनही हा वाद संपणार नसल्याचं आर. एस. घुमन सांगतात. तीनही विधेयकं मागे घेणं हा एकच पर्याय असल्याचं ते सांगतात.

पण सध्या तरी सरकार विधेयकं मागे घेण्यास तयार दिसत नाही.

माजी कृषी सचिव सिराज हुसैन सांगतात, "यावर एकच पर्याय म्हणजे सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दयावी जसं 'किसान सम्मान निधी'द्वारे केलं जातंय."

दुसरा पर्याय म्हणजे शेतकऱ्यांनी इतर अशीही पिकं घ्यावीत ज्यांना बाजारपेठेत मागणी आहे. सध्या शेतकरी गहू - तांदळाच्या शेतीवर जास्त भर देतात आणि तेल बियाणं वा डाळींवर कमी भर दिला जातो. दुसरी पिकं घेतल्याने बाजारपेठेतली गतीशीलता कायम राहील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)