जीडीपी : महागाई का वाढत आहे? तुमच्या बजेटवर त्याचा नेमका कसा परिणाम होतोय?

फोटो स्रोत, NurPhoto/ Contributor
- Author, निधी राय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"प्रत्येक वस्तूची किंमत दुप्पट झालीय. फळं-भाज्या किंवा वाणसामान घेतलं तरी 1500 रुपयांचं बिल होतं."
गृहिणी असणाऱ्या 44 वर्षांच्या कार्तिका नायक महागाईविषयी बीबीसीला सांगतात.
मुंबईतल्या मीरारोडमध्ये राहणाऱ्या कार्तिका नायक यांच्या कुटुंबात आठजण आहेत.
त्या सांगतात, "मी सासरच्यांसोबत राहते. आमच्या कुटुंबात लहान मुलं आहेत आणि ज्येष्ठ व्यक्तीही. म्हणूनच खर्च फार कमी करणं शक्य नाही. आम्ही चांगला आहार घेणं, फळं - भाज्या खाणं गरजेचं आहे. फक्त कोरोना व्हायरसमुळे बाहेर जाणं होत नसल्याने तिथे पैशांची बचत होतेय. त्या पैशांचा वापर महागाईला तोंड द्यायला होतोय."
35 वर्षांच्या हंसिनी कार्तिक एका प्रसिद्ध वर्तमानपत्राच्या रिपोर्टर आहेत आणि त्यांना एक मूलही आहे. डाळी, फळं आणि भाज्यांच्या वाढलेल्या किंमती चिंताजनक असल्याचं त्या सांगतात.
हंसिनी कार्तिक म्हणतात, "मी दिवाळीत माझ्या बिल्डिंगमध्ये मिठाई वाटायचे, लोकांना पार्टीसाठी बोलवायचे. पण यावर्षी आम्ही असं काहीच केलं नाही. कोव्हिड-19मुळे माझ्या पगारात 10 टक्के कपात झालीय आणि गोष्टी महागलेल्याही आहेत. म्हणूनच आम्ही खरेदी बंद करत खर्च कमी करायचा प्रयत्न केला."
पुण्यात आय.टी. कंपनीत काम करणारे 30 वर्षांचे लक्षित भटनागर असाच अनुभव सांगतात.
ते म्हणतात, "खरंतर मला कार घ्यायची होती. पण पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती पाहून मी थांबलो. शिवाय डीलर्सही फारशा चांगल्या ऑफर्स देत नाहीयेत. म्हणून मी सध्यातरी पैसे वाचवायचं ठरवलंय."
लक्षित भटनागर भाड्याच्या घरात राहतात आणि त्यांच्यावर उत्तर प्रदेशात राहणाऱ्या आई-वडिलांची जबाबदारीही आहे.
ग्राहकांच्या विश्वासामध्ये अशाच प्रकारची मोठी घसरण झाल्याचं रिझर्व्ह बँकेने केलेल्या कंझ्युमर सर्व्हेमध्ये आढळून आलंय.

या कंझ्युमर सर्व्हेचा निर्देशांक सप्टेंबरमध्ये 49.9वर होता. जुलैमध्ये हाच निर्देशांक 53.8वर होता.
महागाईच्या बाबतीत भारत G20 देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं आनंद राठी ब्रोकरेजने म्हटलंय.
का वाढतेय महागाई?
भारतातला महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात 7.6%वर पोहोचला. ही गेल्या साडेसहा वर्षांतली सर्वोच्च पातळी आहे.
खाद्यपदार्थ विषयक महागाईचा दर दोन आकडी झालाय. अंडी, मांस-मासळी, तेल, भाज्या आणि डाळींच्या किंमती वाढल्याने खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 11.07% झालाय.
बटाट्याच्या किंमतींमध्ये गेल्या महिन्याच्या 102 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत 104.56 टक्के वाढ झालीय.

फोटो स्रोत, Getty Images
चार कारणांमुळे महागाई वाढत असल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे.
बार्कलेजचे भारतातले प्रमुख अर्थतज्ज्ञ राहुल बजोरिया यांच्या मते, "सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा टॅक्स वाढवलाय आणि घरीच थांबणं आणि वर्क फ्रॉम होम करण्यामुळे रोज लागणाऱ्या वस्तूंसाठीची मागणी वाढलेली आहे."
केअर रेटिंगचे प्रमुख अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "अनेक कंपन्यांनी कॉस्मेटिक्स किंवा साफसफाईचं सामान आणि मनोरंजनासाठीच्या वस्तूंच्या किंमतीही वाढवलेल्या आहेत. या सगळ्यामुळे महागाई वाढलेली आहे."
पुढे काय?
जीडीपीचे आकडे जाहीर झालेले आहेत आणि सलग दुसऱ्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा दर नकारात्मक असल्याने अर्थव्यवस्था तांत्रिकदृष्ट्या मंदीत आहे.
जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या काळात जीडीपी उणे (-)7.5 टक्के होता.
महागाईची समस्या जितकी दिसतेय त्यापेक्षा अधिक मोठी असल्याचं तज्ज्ञ सांगतात. ही महागाई लॉकडाऊनच्या काळात पुरवठा थांबल्याने निर्माण झालेली नाही.
आयसीआय सिक्युरिटीजच्या अर्थतज्ज्ञ अनघा देवधर यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं, "लॉकडाऊनमध्ये सूट देऊन आणि दळणवळण वाढवूनही जर खाद्यपदार्थांतली महागाई कायम राहिली तर याचा अर्थ ही समस्या जास्त गंभीर आहे आणि भविष्यातही कायम राहील."

फोटो स्रोत, SOPA Images/ Contributor
मोतीलाल ओस्वाल ब्रोकरेज कंपनीने म्हटलंय, "जानेवारी 2021मध्ये महागाईचा दर 6 टक्के असू शकतो आणि मार्चमध्ये हा दर 6.5टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. सप्टेंबर 2021मध्ये हा दर पुन्हा 6 टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे."
याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात झालेल्या अनियमित पावसामुळे कांद्याच्या पिकाला उशीर झालाय आणि त्यामुळेही कांद्याचे भाव वाढलेले आहेत.
शेंगदाणा, मोहरी, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफूल यापासून तयार करण्यात येणाऱ्या खाद्यतेलांच्या किंमतीही 30 टक्क्यांपर्यंत महागलेल्या आहेत आणि हे देखील चिंतेचं एक कारण आहे.
भारतामध्ये मलेशिया, अर्जेंटिना, इंडोनेशिया आणि युक्रेन या देशांमधून 70टक्के खाद्यतेल आयात केलं जातं.
भाज्या महागल्याने अनेकांनी अंडी खाण्याचं प्रमाण वाढवलंय. यामुळे अंड्याच्या किंमतीही वाढलेल्या आहेत. अंड्यांच्या उत्पादनाला कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनचाही मोठा फटका बसला होता.
कुक्कुटपाल क्षेत्रातली कंपनी आनंद अॅग्रोचे अध्यक्ष उद्धव अहिर यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं, "गरिबांना भाज्यांच्या तुलनेत अंडी स्वस्त वाटतायत."
शिवाय सरकारी खर्चामुळेही महागाई वाढतेय. सरकार 30 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. हे प्रमाण जीडीपीच्या 15% आहे.
आर्थिक विकासावर परिणाम?
वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि पगार कपात झाल्याने लोकांच्या खर्च करायच्या क्षमतेवर परिणाम होतोय. सध्यातरी सणासुदीचा काळ असल्याने अर्थव्यस्थेतली वस्तूंची मागणी वाढलेली आहे. पण ही तेजी जानेवारी - फेब्रुवारीपर्यंत संपेल आणि त्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल.
मदन सबनवीस सांगतात, "महागाईचा सध्या अर्थव्यवस्थेच्या विकासावर थेट परिणाम होतोय, असं म्हणू शकत नाही. यामागे अनेक कारणं आहेत. पण जेव्हा खर्च करायची पाळी येते तेव्हा महागाई महत्त्वाचा मुद्दा ठरतो. जर महागाई पुढच्या काही तिमाहींपर्यंत वाढलेलीच राहिली तर त्याचा अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होईल."
क्रिसील रेटिंग एजन्सीनुसार, "महागाई वाढणं याचा अर्थ प्रत्यक्षात व्याज दर अजूनही कमी होणं. सध्या लोक पैसे वाचवण्याचा, बचत करण्याचा प्रयत्न करतायत. आणि पैसे बँकेत ठेवतायत. पण जर त्यांच्या व्याजात कपात झाली तर त्यांचं नुकसान होईल. आणि ज्यांच्याकडे बँकेतून मिळणाऱ्या व्याजाखेरीज मिळकतीचे इतर पर्याय नाहीत अशा वयोवृद्धांचं आणि पेन्शनर्सचं अशावेळी काय होईल?"
म्हणूनच तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीमध्ये वाढलेली महागाई आटोक्यात आणणं गरजेचं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थाही रुळावर आणता येऊ शकेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








