कोरोना लस : भारताची स्वदेशी लस कधी तयार होईल?

फोटो स्रोत, REUTERS/Altaf Hussain
- Author, देविना गुप्ता
- Role, बीबीसी प्रतिनिधी
देशामध्ये लस विकसित करणाऱ्या तीन ठिकाणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (28 नोव्हेंबर) भेट देत आहेत. ते अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या शहरांचा दौरा करतील.
अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपन्यांमध्ये लशीचं उत्पादन करण्यात येत आहे.
लस निर्माणाच्या कामाची प्रगती आणि मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन करण्याबाबतच्या तयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेतील.
जगभरातील इतर देशांप्रमाणेच भारतातही कोरोना लशीची प्रतीक्षा आहे. पण जगात लशींचं सर्वाधिक उत्पादन करणारा भारत देश कोरोना लशीच्या बाबतीत किती पुढे आहे, हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. भारत कोरोनाची स्वदेशी लस कधी बनवेल, हा प्रश्नही उपस्थित होतो.
स्वदेशी लशीची अपेक्षा
भारत बायोटेक इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉ. कृष्णा ईला यांनाही स्वदेशी लस बनवण्याची अपेक्षा आहे.
भारत बायोटेक इंटरनॅशनल कोव्हॅक्सिन नावाने स्वदेशी लस विकसित करत आहेत. या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष उमेद वाढवणारे आहेत.
हैदराबादमध्ये असणाऱ्या डॉ. कृष्णा ईला यांनी बीबीसीशी फोनवरून बोलताना सांगितलं, "भारतात वैद्यकीय चाचणी करणं हे अतिशय अवघड काम आहे. मी स्वयंसेवकांना शुभेच्छा देतो. भारतात प्रभावी चाचणी करणारी आमची एकमेव कंपनी आहे. या कामात वेळ लागेल पण आम्ही जागतिक मानकांचं पालन करत आहोत."
कोणत्याही लशीसाठी प्रभावी चाचणीचा अर्थ म्हणजे ज्या समूहाला ही लस देण्यात आली त्यांच्यात आजाराचं प्रमाण कमी आढळून येणं.
तज्ज्ञांच्या मते, अनुवंशिक आणि जातीय पार्श्वभूमीनुसारे हे प्रमाण वेगवेगळं असू शकतं. यामुळे मोठ्या औषध उत्पादक कंपन्या वेगवेगळ्या देशांमध्ये एकाचवेळी चाचण्या करतायत.

फोटो स्रोत, SOPA IMAGES
यामुळेच डॉ. रेड्डी यांच्या प्रयोगशाळेत रशियाच्या स्पुटनिक-5 लशीचीसुद्धा चाचणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे युकेच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पथकाने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत चाचणीसाठी करार केला आहे.
नोझल स्प्रे व्हॅक्सीन
भारतासमोरचं दुसरं सर्वात मोठं आव्हान म्हणजे कमकुवत वाहतूक व्यवस्था आणि कोल्ड स्टोरेज - म्हणजे ठराविक थंड तापमानामध्ये लस साठवून ठेवण्यासाठीची सोय.
पण डॉ. कृष्णा ईला यांच्या मते, त्यांचं पथक या प्रश्नाचं उत्तर स्थानिक पातळीवर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
ते सांगतात, "आम्ही इंजेक्शनसारख्या अवघड गोष्टींवर काम करत आहोत. त्यामुळे सोबतच दुसरा एक पर्याय शोधण्याचाही आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच नाकावाटे घेता येऊ शकणारी लस बनवण्याचा आमचा विचार आहे. याचा केवळ एकच डोस द्यावा लागेल. ही लस अंगणवाडी कार्यकर्त्यांकडे देता येऊ शकेल. आणि ते ही लस लोकांपर्यंत सहजपणे पोहोचवू शकतील."
चीनसुद्धा नाकातून घेता येऊ शकणारी लस तयार करण्याबाबत काम करत असल्याचं सांगितलं जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे संशोधक यावर काम करत आहेत. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठीचा बोजा कमी होऊ शकतो.
लशींच्या किंमतीतील फरक
पण, भारताची स्वदेशी लस परदेशातील लशींच्या तुलनेत महाग असेल की स्वस्त?
याबाबत बोलताना डॉ. कृष्णा ईला यांचा दावा आहे, "भारतात उत्पादनाचा खर्च अतिशय कमी आहे. त्याचा फायदा आपण ग्राहकांना देऊ शकतो. उदाहरणार्थ- आपण रोटा व्हायरसच्या लशींचे जगातील सर्वात मोठे उत्पादक आहोत. जागतिक पातळीवर आपण याचा उत्पादन खर्च 65 डॉलरवरून एका डॉलरवर आणला आहे. उत्पादन वाढवल्याने याची किंमत कमी होईल."
पंतप्रधान मोदी अहमदाबाद येथील झायडस कॅडिला या औषध कंपनीचाही दौरा करणार आहेत. ही कंपनीही कोरोना व्हायरसची लस बनवत आहे.
कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल यांनी सांगितलं, "आम्ही याबाबत आशावादी आहोत. चाचणी सुरू आहे. आम्ही सातत्याने याकडे लक्ष ठेवून आहोत. सध्या तरी याबाबत जास्त माहिती देता येणार नाही."
सध्यातरी, कोणतीही कंपनी लस तयार होण्याची नेमकी वेळ सांगताना दिसत नाही. पण पुढील वर्षात जून महिन्यापर्यंत लस जगभरात सर्वत्र उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








