You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अण्णा हजारे म्हणतात, 'सरकार पाडणारी शक्ती तयार करा' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. सरकार पाडणारी शक्ती तयार करा - अण्णा हजारे
"कोणतंही सरकार फक्त आंदोलनाला घाबरत नाही. मात्र ते पडण्याला घाबरतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची असेल तर सरकारला झुकवणारी शक्ती उभी करा," असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नागरिकांना केलं आहे.
संविधान दिनाचे औचित्य साधून अण्णा हजारे यांनी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अण्णांनी वरील वक्तव्य केलं. पण या वक्तव्याचा उद्देश नेमका काय, अण्णा हजारेंचा रोख नेमका कुणाकडे, हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
आंदोलानांच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार केल्यास त्याला घाबरून सरकार जनतेच्या मागण्या मान्य करते. म्हणून आता लोकपालप्रमाणे ग्रामसभेला जादा अधिकार देणारा कायदा करून घेण्यासाठी देशातील जनतेने अशी देशव्यापी शक्ती निर्माण करावी, असं मत हजारे यांनी मांडलं.
देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं झाली तरी लोकशाही राज्य प्रस्थापित झालं नाही. पक्ष पद्धतीमुळं राज्यकर्त्यांनी जनतेला खरी लोकशाही मिळू दिली नाही. ब्रिटिशांच्या राजवटीविरूद्ध जनशक्तीचा दबावच यशस्वी झाला होता. त्याच पद्धतीनं आता लोकांनी पुन्हा संघटित होण्याची गरज आहे. आपल्या मागण्यांसाठी सरकारवर अहिंसेच्या माध्यमातून दबाव आणावा लागेल,' असं अण्णा हजारे म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
2. नितीन राऊतांनी सवलतीच्या घोषणेची घाई केली - अशोक चव्हाण
वाढीव वीजबिलात सवलती देण्याची घोषणा करण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. त्याआधी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत थोडी चर्चा करायला हवी होती, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वीज बिल माफीच्या मागणीसाठी गुरुवारी (27 नोव्हेंबर) राज्यभर आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण बोलत होते.
"ऊर्जामंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करताना जरा घाईच केली. त्यांनी घोषणा करण्याआधी पक्षात आणि सरकारशी चर्चा करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. ही आमच्याकडून चूक झाली. त्यामुळे समस्या झाली. आधीच राज्यात आर्थिक स्थिती बिकट, त्यात वीजबिल माफी बोजा सोपा नाही. म्हणूनच सरकारनं अद्याप वीज ग्राहकांना दिलासा दिला नाही," असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.
3. मुंबईत सुरू होणार स्वदेशी कोव्हॅक्सिन लशीची चाचणी
मुंबई महापालिकेच्या सायन आणि राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयात कोव्हॅक्सिन या स्वदेशी लशीची वैद्यकीय चाचणी येत्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. या चाचणीला नैतिक समितीकडून (Ethic committee) परवानगी मिळाली आहे.
त्यामुळे कोव्हॅक्सिन लशीच्या चाचणीला हिरवा कंदील मिळाला आहे. या लशीची चाचणी इतरांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे.
भारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्सिन ही लस बनवली आहे. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात कंपनीने नैतिक समितीकडे या लशीच्या चाचणीसाठी प्रस्ताव पाठवला होता. आता त्याची परवानगी देण्यात आली आहे.
लवकरच ही लस स्वयंसेवकांना देण्यात येईल. यासाठीची सर्व तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.
4. 'आंब्याच्या झाडाखाली पाच वर्ष आंबे खाणाऱ्यांवर आता बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ'
आंब्याच्या झाडाखाली पाच वर्षं बसून आंबे खाल्ले, त्यांच्यावर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर टीका केली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात सत्तार बोलत होते.
यावेळी सत्तार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत मिळून स्थापन केलेल्या सरकारवरही निशाणा साधला.
दोन दिवस सरकार टिकवू शकले नाहीत, ते दोन महिन्यांत सरकार पाडण्याची भाषा करत आहेत. राज्यातील जनतेच्या विश्वासामुळे पुढील दोनशे महिने तरी हे सरकार पडणार नाही, असंही सत्तार यांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
5. गृहमंत्र्यांनी देश चालवायला हवा, अमित शाह छोट्या-छोट्या निवडणुका मॅनेज करण्यात व्यस्त - ममता बॅनर्जी
अमित शाह यांच्यासारखा गृहमंत्री मी पूर्वी कधीच पाहिला नाही. गृहमंत्र्यांनी देश चालवायचा असतो. पण अमित शाह छोट्या-छोट्या निवडणुका मॅनेज करण्यात व्यस्त आहेत. ते फक्त लोकांच्या घरी जेवण करायला जातात आणि फोटो काढतात.
सध्याची देशाची परिस्थिती, सीमारेषा आणि अर्थव्यवस्था कुठे गेली? अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसे राजकीय टोलेबाजीला उधाण आलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं सध्या चित्र आहे.
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींसोबत कोरोना लशीबाबत झालेल्या एका बैठकीत सहभाग नोंदवला होता. पण यानंतर त्यांनी त्यांच्यावर टीका केली. लस कधी येणार हे कुणालाच माहीत नाही, पंतप्रधान फक्त भाषण देण्यात व्यस्त आहेत, अशी टीका बॅनर्जी यांनी केली. ही बातमी लोकमतने दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)