You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात दिल्ली, राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध
दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RTPCR टेस्टचे रिपोर्ट आता जवळ ठेवावे लागणार आहेत.
राज्य सरकारने यासंदर्भातली नवी नियामावली जाहीर केली आहे. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांचे RTPCR टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह असणं अपेक्षित आहे. तसंच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे.
विमान, रेल्वे आणि रस्त्यामार्गे राज्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी वेगवेगळी नियमावली जारी करण्यात आली आहे.
विमान प्रवासाची नियमावली
विमानतळावर विमान पकडण्यापूर्वी आणि उतरल्यानंतर या रिपोर्टची प्रत दाखवणं प्रवाशांना बंधनकारक आहे. ही टेस्ट प्रवास सुरू करण्याच्या 72 तासांत केलेली असावी. एअरपोर्ट ऑथॅरिटी ऑफ इंडियाद्वारे प्रवाशांच्या रिपोर्टची पाहणी करण्यात येईल, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.
ज्या प्रवाशांनी RTPCR टेस्ट केली नसेल त्यांना विमानतळावर स्वखर्चाने ही टेस्ट करून घ्यावी लागेल. त्यासाठी एअरपोर्टवर टेस्टिंग सेंटर असतील.
टेस्ट केल्यानंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी असेल. प्रवाशांना आपला फोन क्रमांक, जिथे जाणार आहोत त्या घराचा पत्ता द्यावा लागेल. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास ट्रेसिंग करण्यासाठी म्हणून हा तपशील प्रवाशांकडून टेस्टिंगवेळी घेण्यात येईल.
ज्या प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांच्याशी संपर्क साधण्यात येईल आणि प्रोटोकॉलप्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल.
विमानतळ ज्या भागात आहे त्या क्षेत्रातील म्युनिसिपल कमिशनर नोडल ऑफिसर म्हणून काम पाहतील. वर उल्लेख करण्यात आलेले नियम पाळले जात आहेत हे पाहणं त्यांची जबाबदारी असेल.
रेल्वे प्रवासाची नियमावली
दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या राज्यातून महाराष्ट्रात रेल्वेने दाखल होणाऱ्या प्रवाशांनाही RTPCR टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट बाळगावा लागेल. राज्यात दाखल होण्याच्या 96 तास आधी RTPCR टेस्ट केलेली असणं बंधनकारक आहे.
ज्या प्रवाशांकडे RTPCR टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट नाही, त्यांना कोरोना लक्षणं जाणवत आहेत का याची पाहणी करण्यात येईल. त्यांच्या शरीराच्या तापमानाची नोंद केली जाईल. लक्षणं नसलेल्या प्रवाशांना गंतव्यस्थळी उतरल्यानंतर घरी जाण्याची परवानगी असेल.
ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळतील त्यांना अँटिजेन टेस्ट करावी लागेल. अँटिजेन टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी मिळेल.
कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्या प्रवाशांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये पुढील उपचारांसाठी पाठवण्यात येईल. कोव्हिड केअर सेंटरमधील उपचारांचा खर्च प्रवाशांना स्वत:ला करावा लागेल.
रेल्वे स्टेशन ज्या परिसरात आहे तिथले म्युनिसिपल कमिशनर, जिल्हाधिकारी नोडल ऑफिसर असतील. नियमांचं पालन केलं जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
रस्त्या मार्गे प्रवासाची नियमावली
दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या राज्यातून महाराष्ट्रात रस्त्या मार्गे येणाऱ्या प्रवाशांची सीमेवर कोरोना लक्षणांची पाहणी करण्यात येईल. त्यांच्या शरीराच्या तापमानाची नोंद करण्यात येईल.
लक्षणं नसणाऱ्या प्रवाशांना पुढे प्रवास करण्याची अनुमती देण्यात येईल. लक्षणं आढळणाऱ्या प्रवाशांना पुन्हा मूळ राज्यात जाता येईल. लक्षणं असलेल्या प्रवाशांना वेगळं काढलं जाईल आणि त्यांना अँटिजेन टेस्टला सामोरं जावं लागेल. अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर महाराष्ट्रात पुढे प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. जे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळतील त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात येतील, त्याचा खर्च प्रवाशांना स्वत: करावा लागेल.
आरोग्य मंत्र्यांनी आधीच दिले होते संकेत
कोरोनाचं संकट कमी झालेलं नाही. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. दिल्ली तसंच गुजरातमध्ये जे झालं आहे तसं होऊ द्यायचं नसेल तर राज्यात कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दुपारी म्हटलं होतं.
बिनधास्त फिरण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने पुन्हा निर्बंध लागू होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. "आपल्याला घराबाहेर पडताना मास्क परिधान करावाच लागेल. घराबाहेर असताना सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागेल. दिल्लीत मास्क परिधान न करणाऱ्यांना २००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. राज्यातल्या लोकांनी सहकार्य केलं तर असा जबर दंड आकारावा लागणार नाही. लॉकडाऊन लागू केला नसला तरी निर्बंध लागू करण्यात येतील. मुख्यमंत्र्यांचीही तशी भूमिका आहे," असं टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.
यासंदर्भात दोन दिवसात मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल, असं टोपे यांनी सांगितलं. लग्न समारंभांकरता दोनशे लोकांच्या उपस्थितीली असलेली परवानगी कमी करण्यात येणार असल्याचे संकेतही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
गर्दी करणं टाळायला हवं. गर्दीच्या वेळा टाळायला हव्या. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर निर्बंध सिथील केले होते, पण पुन्हा आकडे वाढत असतील तर निर्बंध पुन्हा कठोर करावे लागतील, असं त्यांनी सांगितलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)