कोरोना व्हायरस : ‘छातीत दुखणे घरगुती उपाय’चा गुगलवर सर्च का वाढतोय?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

'जरा, छातीत दुखतंय' असं आपण अनेकवेळा म्हणतो. मग, नक्की काय झालं असेल? अॅसिडीटी असेल का आणखी काय? हे शोधण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतो.

डॉक्टरांकडे न जाता, थांब जरा… असं म्हणत पहिला प्रश्न विचारतो, 'डॉ. गुगल' ला.

बरोबर?

आपल्यापैकी प्रत्येकाने विविध कारणांसाठी 'डॉ. गुगल' ची मदत घेतलीय. अहो, 'डॉ. गुगल' म्हणजे आपलं गुगल सर्च. आजकाल कोणत्याही प्रश्नाचं उत्तर 'गुगल' कडे मिळतं.

हे खरं असलं तरी, 'गुगल' वर वैद्यकीय माहिती घेऊन औषधं घेणं अजिबात योग्य नाही. स्वत:च स्वत:चे डॉक्टर बनणं चुकीचं आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णालयात जाणं धोक्याचं आहे, असा विचार अनेकांच्या मनात येत असल्याने, लोक आपल्याला काय झालंय? हे शोधण्यासाठी गुगलवर सर्च करण्याचं प्रमाण वाढलं आहे.

गुगलवर 'चेस्ट पेन'चा सर्च वाढला

कोरोना संसर्गाच्या काळात 'गुगल' वर 'चेस्ट पेन' हा सर्च अचानक वाढला आहे. मोठ्या संख्येने लोक 'चेस्ट पेन' नावाने गुगलवर सर्च करत आहेत. अमेरिकेतील 'मायो क्लिनिक' मधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात, कोव्हिड-19 काळात गुगलवर 'चेस्ट पेन' नावाचा सर्च 34 टक्क्यांनी वाढल्याचं समोर आलं आहे. हे संशोधन 'सायन्स डेली' या जर्नलमध्ये छापण्यात आलं आहे.

कोव्हिडच्या सुरुवातीला लोक कफ, ताप याबद्दल सर्च करत होते. पण, त्यानंतर 'चेस्ट पेन'चा सर्च वाढल्याचं पाहायला मिळालं.

भीतीपोटी केलं सर्च

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कोरोना संसर्गाच्या काळात बदलेली लाईफस्टाईल. वर्क फ्रॉम होम, तासनतास कंप्युटरसमोर काम, खाण्यापिण्याच्या वेळेत झालेला बदल. शरीराची हालचाल कमी होणं, यामुळे अनेकांना छातीत कळ येत असल्याचं वाटतंय. लोक घाबरून पहिल्यांदा काय झालंय हे जाणून घेण्यासाठी गुगलला प्रश्न विचारत आहेत.

पुण्यात रहाणाऱ्या 37 वर्षांच्या रूपेश सिंह (नाव बदललेलं आहे) यांना काही दिवसांपूर्वी अचानक छातीत दुखल्यासारखं वाटलं. IT मध्ये कार्यरत असल्याने वर्क फ्रॉम होम, तासंनतास कंप्युटरसमोर बसणं आलंच.

ते म्हणतात "काम करत असताना अचानक छातीत कळ आली. याआधी असं झालं नव्हतं. कळायला मार्ग नव्हता नक्की काय झालंय? कोरोनाचा काळ असल्याने डॉक्टरकडे जायचं का? हा प्रश्न होता. म्हणून लक्षणं 'गुगल' करून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉक्टरांना फोन करून माहिती दिली."

खरंतर, झालं काहीच नव्हतं. पण, डॉक्टर, हॉस्पिटल यांच्यापेक्षा पहिलं गुगल करून पहावं असा विचार करून गुगल सर्च केल्याचं ते सांगतात.

डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा लोक 'डॉ. गुगल' ला का विचारत आहेत? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

फोर्टिंस रुग्णालयाचे जनरल फिजीशिअन डॉ. संजय शहा यांच्या माहितीनुसार, रुग्णालयात येणारे 30 टक्क्यांच्या आसपास रुग्ण, गुगलवर 'चेस्ट पेन' 'हार्ट अटॅक' सर्च करून आल्याचं पाहायला मिळतं.

रुग्णालयात जाण्याची भीती

कोरोना संसर्गाच्या काळात रुपेश रुग्णालयात जाण्यासाठी घाबरत होते. रूपेश यांच्यासारखीच परिस्थिती सामान्य लोकांची असल्याचं हिरानंदानी रुग्णालयाच्या डॉ. सुजाता चक्रवर्ती सांगतात.

"गुगल सद्य स्थितीत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं सोप साधन झालंय. त्यामुळे छातीत जरा-जरी दुखलं तर लोक गुगलला प्रश्न विचारून मोकळे होतात. 'गुगल' डॉक्टर नाही हे लोकांना कळत नाहीये. कोव्हिड-19 काळात डॉक्टरकडे किंवा रुग्णालयात जाण्यास सामान्य घाबरत असल्याने, गूगलवर सर्च करून माहिती मिळवण्याचा किंवा काही वेळा औषध घेण्याचा प्रयत्न लोक करतात," असं त्या पुढे सांगतात.

सर्वांत वाईट म्हणजे डॉक्टरपेक्षा 'डॉ. गुगल' वर लोकांचा विश्वास वाढलेला आहे. त्यामुळे काहीवेळा आजार फार जास्त किंवा अगदी किरकोळ असल्याची चुकीची माहिती मिळू शकते, असं हृदयरोगतज्ज्ञ डॉ. केतन मेहता म्हणतात.

सर्वांत जास्त प्रश्न 'IT' मध्ये काम करणाऱ्यांचे

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे 'वर्क फ्रॉम होम' वाढलं. लोक कंप्युटरवर तासनतास काम करू लागले. राज्यात हळूहळू अनलॉक सुरू झालं असलं तरी IT (Information Technology) मध्ये काम करणारे अजूनही घरूनच काम करत आहेत.

पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रिया पालिमकर यांच्या म्हणण्याप्रमाणे, "IT मध्ये काम करणारे सद्य स्थिती घरून काम करत आहेत. काहीवेळा त्यांना कामासाठी तासनतास बसावं लागतं."

"माझ्याकडे येणाऱ्यांमध्ये 50 टक्के लोक गुगलवर 'चेस्ट पेन' सर्च करून येतात. किंवा ऑनलाईन सर्च केल्याबद्दल माहिती देतात. यातील बहुसंख्य IT मध्ये काम करणारे आहेत," असं त्या पुढे सांगतात.

हृदयरोग, मधूमेह असणाऱ्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आधीपासून आजार असलेल्यांमध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे मृत्यूचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलंय.

यावर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहता सांगतात, " "मला कोव्हिड-19चा संसर्ग असू शकतो का? मला हार्ट अटॅक आलाय का? असे प्रश्न लोक गुगलला विचारतात. हे प्रश्न विचारणारे सर्वांत जास्त तरूण आहेत. यात IT मध्ये काम करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे."

'चेस्ट पेन' नाही. तसंच छातीत दुखण्याची कोणतीही लक्षणं नाहीत. तरीही निव्वळ भीतीपोटी लोक गुगलवर सर्च करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं ते म्हणतात.

लोकांना वाढती 'चिंता'

कोरोनाच्या काळात देशाचं अर्थचक्र अचानक थांबलं. काही कारखाने ठप्प झाले. काही ठिकाणी कर्मचारी कपात झाली. यामुळे नोकरदारांमध्ये मनासिक ताणतणाव वाढल्याचंही डॉक्टराचं मत आहे.

"कोरोनाच्या काळात लोकांमध्ये Anxiety (चिंता) वाढलीये. काही लोकांनी नोकऱ्या गमावल्या. काहींना यापुढे त्यांची नोकरी राहील का नाही? याची चिंता सतावतेय. त्यामुळे काहीही झालं नसताना लोक गुगलवर सर्च करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं," डॉ. प्रिया पुढे सांगतात.

तर, डॉ. केतन मेहता यांच्या माहितीनुसार, "भीतीपोटी लोकांना रात्री शांत झोप येत नाहीये." त्यामुळेदेखील छातीत दुखतंय अशी तक्रार घेऊन लोक रुग्णालयात येत आहेत.

छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक?

छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असं आपण समजतो. त्यामुळे घाबरून जातो आणि काय झालंय हे शोधण्याच्या प्रयत्नात गोंधळून जातो.

मुंबईतील हृदयरोग तज्ज्ञ, डॉ. केतन मेहता सांगतात, "लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे, की प्रत्येक वेळी छातीत दुखणं म्हणजे 'हार्ट अटॅक' नाही."

श्वास घेण्यास त्रास झाल्याने सुद्धा काहीवेळा छातीत दुखु शकतं, असं ते सांगतात.

"छातीत दुखणं म्हणजे नक्की काय हे लोकांना कळून नयेत नाही. सतत ऑनलाईन विविध माहिती वाचल्याने लोकांच्या डोक्यात असे विचार येत असतात," असं डॉ. चक्रवर्ती सांगतात.

डॉ. शहा सांगतात, "फुफ्फुसांजवळ दुखत असेल तरी, छातीत दुखत असल्यासारखच वाटतं. पोट आणि हृदय यांच्यात पेन होण्याची लक्षणं सारखीच आहेत. काहीवेळा पोटात गॅस झाल्यानेही छातीत दुखल्यासारखं वाटतं."

छातीत दुखतंय? डॉक्टरांचा सल्ला घ्या!

डॉ. शहा यांच्या म्हणण्यानुसार, "कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मेंदू, हृदय आणि फुफ्फुसात गाठ तयार होऊ शकते. गाठ हृदयात असेल तर छातीत दुखू शकतं. त्यामुळे छातीच्या डाव्याबाजूस दुखत असेल तर तात्काळ डॉक्टरांना दाखवा."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)