अर्णव गोस्वामी: टोकाचं प्रेम आणि तिरस्कार वाट्याला आलेले न्यूज अँकर

    • Author, योगिता लिमये
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अलीकडेच रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक व वृत्त-निवेदक अर्णव गोस्वामी स्वतःच बातमीचा विषय झाले. एका आत्महत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आलं होतं.

त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि आता त्यांना जामीनही मिळाला आहे, पण या प्रकरणानिमित्ताने 'धृवीकरण साधणारं व्यक्तिमत्व' या त्यांच्या प्रतिमेला बळकटी मिळाली.

एप्रिल महिन्यात 'रिपब्लिक भारत' वाहिनीवरील आपल्या 'प्राइम टाइम' कार्यक्रमात अर्णव यांनी म्हटलं होतं की, "हिंदूंची 80 टक्के लोकसंख्या असलेल्या देशामध्ये हिंदू असणं हाच गुन्हा ठरलेला आहे."

"आज एखाद्या मौलवीची किंवा पाद्रीची हत्या झाली असती, तरीही लोक गप्प बसले असते का?"

दोन हिंदू साधूंना व त्यांच्या ड्रायव्हरला मारहाण करून जमावाने त्यांची हत्या केली, या घटनेच्या संदर्भात अर्णव बोलत होते.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गाडीतून जाणारी माणसं लहान मुलांचं अपहरण करणारी आहेत, अशी समजूत लोकांनी करून घेतल्याने ही घटना घडली. हल्ला करणारे व मृत्युमुखी पडलेले सर्व हिंदूच होते. परंतु, या मृतांचं हिंदू असणंच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं, असा दावा एक आठवडाभर रिपब्लिक नेटवर्कच्या वाहिन्यांवरून प्रसारित झालेल्या कार्यक्रमांमध्ये केला गेला.

अर्णव यांच्या फटकळ, आक्रस्ताळ्या व पक्षपाती वार्तांकनाचा हा सर्वांत मोठा धोका आहे, असं टीकाकार म्हणतात. सत्ताधारी भाजपला लाभ व्हावा, यासाठी या वाहिनीच्या प्रेक्षकांना चुकीची माहिती दिली जाते, गैरप्रचार केला जातो आणि भेदभाव वाढवणारे व चिथावणीखोर विचार पुरवले जातात.

अर्णव आणि रिपब्लिक टीव्ही यांनी बीबीसीच्या मुलाखतीच्या विनंतीला उत्तर दिलं नाही. चिथावणीखोर व बनावट बातम्या आणि भाजपच्या बाजूने पक्षपात, या प्रश्नांवरही कंपनीच्या बाजूने काही उत्तर देण्यात आलं नाही.

वादग्रस्त शैली

वार्तांकनाची अशी शैली वापरणारे अर्णव हे काही पहिले पत्रकार नव्हेत, पण त्यांनी आधीपासून रूढ शैलीमध्ये आणखी आक्रस्ताळेपणा व आक्रमकता यांची भर घातली.

त्यांची बोलण्याची पद्धतही धृवीकरण वाढवणारी असते आणि भारतातील धार्मिक भेदभावाचा लाभ घेण्याचा काम त्यातून साधलं जातं.

तबलीगी जमात ही मुस्लीम संघटना टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन करते आहे, असा आरोप अर्णव यांनी एप्रिल महिन्यात केला, आणि या संघटनेच्या नेत्यांना तुरुंगात डांबावं, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांना केलं.

महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिल्लीत या संघटनेचे लोक एकत्र आले होते आणि मग देशभरातील हजारो ठिकाणी त्यांनी कोव्हिड पोचवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. इथला कार्यक्रम टाळेबंदीच्या आधीपासूनच सुरू होता, असं आयोजकांनी वारंवार सांगितलं. त्यांचा हा दावा खरा असल्याचं देशभरातील अनेक न्यायालयांनीही स्पष्ट केलं आहे.

परंतु, रिपब्लिक व इतर काही वाहिन्यांच्या चुकीच्या वार्तांकनामुळे समाजमाध्यमांवर इस्लामविरोधी प्रतिक्रिया दिल्या गेल्या.

अर्णव त्यांच्या कार्यक्रमात म्हणाले, "सध्या देश ज्या वाईट परिस्थितीतून जातोय, त्याला तबलीगी जमात जबाबदार आहे, हे तुम्हाला आवडलं किंवा नाही आवडलं तरी खरं आहे."

जुलै महिन्यात या वाहिनीच्या वार्तांकनाचा सर्व भर बॉलिवूडमधील अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूवर होता.

सुशांतचा मृत्यू आत्महत्येने झाल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं, पण सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिनेच त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत सुशांतच्या कुटुंबांनी एफआयआर दाखल केला.

रियाने हे आरोप फेटाळून लावले, परंतु या आरोपांच्या निमित्ताने स्त्रीद्वेष्ट्या व कडवट वार्तांकनाची सुरुवात झाली. रिपब्लिकने तर रियाच्या अटकेसाठी मोहीमच चालवली.

'न्यूज-लॉन्ड्री' या संकेतस्थळाच्या कार्यकारी संपादक मनिषा पांडे म्हणतात, "भारतातील लोक रिपब्लिकची तुलना अमेरिकेतल्या फॉक्स न्यूजशी करतात, पण हे योग्य नाही असं मला वाटतं. फॉक्स न्यूज पक्षपाती व ट्रम्प समर्थक वाहिनी असल्याचं दिसतं, पण रिपब्लिक टीव्ही पूर्णतः गैरप्रचार करतं आणि केंद्र सरकारचा लाभ व्हावा यासाठी अनेकदा चुकीची माहिती या वाहिनीवरून दिली जाते."

"रिपब्लिक वाहिनी लोकांना- त्यातही लढण्याची ताकद नसलेल्या लोकांना- कार्यकर्त्यांना, तरुण विद्यार्थ्यांना, अल्पसंख्याकांना हैवान असल्याप्रमाणे सादर करते."

प्रशंसक व टीकाकार- दोन्ही आहेत

सध्या भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्तवाहिनी आपलीच आहे, असा रिपब्लिकचा दावा आहे. या दाव्यावर बऱ्याच लोकांचा विश्वास आहे, कारण टीआरपीची आकडेवारीही हेच सांगते. पण ही आकडेवारीही वादग्रस्त ठरली आहे.

अर्णव आणि त्यांच्या वाहिनीने या आकडेवारीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप झाला असून त्या संदर्भात तपास सुरू आहे. परंतु वाहिनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

पण अर्णव यांचा बराच मोठा प्रशंसकवर्गदेखील आहेच.

वित्तीय व्यवहारांचे सल्लागार असलेले गिरीधर पसुपुलेटी म्हणाले, "मी रात्री घरी जातो, तेव्हा पहिल्यांदा रिपब्लिक वाहिनी सुरू करतो. अर्णव गोस्वामी खूप शूर आहे आणि जनतेला सत्य सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो."

बनावट बातम्या पसरवल्याचा आरोप रिपब्लिकवर होतो, त्याने आपल्याला काही फरक पडतो का, असं विचारलं असता पसुपुलेटी म्हणाले, "माझा यावर विश्वास नाही. सगळा तपास करूनच ते आपल्याला सत्य सांगतात."

अकाउन्टट म्हणून काम करणारे लक्ष्मण अदनानी सांगतात, "ही थोडी संतप्त पत्रकारिता आहे, पण योग्य संदेश पोचवणं हेच त्यांचं काम आहे. यात थोडा शो बिझनेससुद्धा असतो. त्यातला संताप बाजूला करून माहिती बघायला हवी. इतर वाहिन्यांपेक्षा या वाहिनीवर बरीच वेगळी माहिती दिली जाते."

अशा प्रकारचा प्रभाव भयंकर असल्याचं मत लेखिका शोभा डे नोंदवतात. त्या म्हणतात, "आपण जास्त सजग असायला हवं, जास्त चेक अँड बॅलन्सही असायला हवेत. शोधपत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या या धमकावणीच्या व खोटी माहिती देणाऱ्या पत्रकारितेची गरज नाही."

याची सुरुवात कुठून झाली?

अर्णव यांचा जन्म ईशान्य भारतातील आसाममध्ये झाला. एका सैन्याधिकाऱ्याचा मुलगा असलेल्या अर्णव यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादन केली.

त्यांनी पत्रकारितेची सुरुवात कोलकात्यातील 'टेलिग्राफ' या वर्तमानपत्रापासून केली, त्यानंतर ते एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीमध्ये रुजू झाले. अर्णव समतोल निवेदक होते आणि टीव्हीवर त्यांनी अर्थपूर्ण चर्चा केलेली आहे, अशी आठवण त्यांचे जुने सहकारी सांगतात.

परंतु, 2006 साली 'टाइम्स नाऊ' ही वृत्तवाहिनी सुरू झाली आणि अर्णव या वाहिनीचा मुख्य चेहरा झाले, तेव्हापासून त्यांचं पडद्यावरील व्यक्तिमत्व हळूहळू बदलू लागलं आणि आज त्यांचं हे रूप सर्वांसमोर आहे. मुंबईत 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी काँग्रेसवर नाराज झालेल्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी भडकलेल्या भारतीय मध्यम वर्गाची नस अर्णव यांना सापडली. हळूहळू त्यांचं नाव घरोघरी पोचलं.

त्यांनी 2018 साली रिपब्लिक वाहिनीची स्थापना केली आणि त्यानंतर ते अधिक पक्षपाती व कठोर व्हायला लागले. 2019 साली त्यांनी रिपब्लिक समूहाच्या हिंदी वृत्तवाहिनीचीही सुरुवात केली.

शोभा डे पूर्वी अर्णव यांच्या कार्यक्रमात सहभागी होत असत.

त्या म्हणाल्या, "पत्रकार म्हणून त्यांची काहीएक विश्वासार्हता होती, तेव्हा मी त्यांच्या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी सहभागी होत असे. पण त्यांनी निःपक्षपाती पत्रकाराचं काम सोडून दिलं, तेव्हा माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर संपून गेला. त्यांनी अनेक वेळा सीमा ओलांडली आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणावरही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत."

एका वास्तुरचनाकाराच्या मृत्युप्रकरणी काही दिवसांपूर्वी अर्णव यांना अटक करण्यात आलं. याच वास्तुरचनाकाराने रिपब्लिक वाहिनीच्या स्टुडिओच्या अंतर्गत सजावटीचं काम केलं होतं. आपण या वास्तुरचनाकाराला काही पैसे देणं लागत होतो, हा दावा अर्णव यांनी व त्यांच्या वाहिनीने नाकारला आहे.

अर्णव यांनी महाराष्ट्र सरकारवर कठोर टीका केल्यामुळे त्यांना लक्ष्य केलं जातं आहे, असंही काही लोकांना वाटतं.

अर्णव यांना अटक झाल्यावर भाजपचे अनेक मंत्री त्यांचं समर्थन करायला पुढे आले आणि त्यांना झालेली अटक म्हणजे माध्यमस्वातंत्र्यावरील हल्ला आहे, असंही बोललं गेलं. यावरून अर्णव गोस्वामींच्या राजकीय ताकदीचा अंदाज येतो.

वास्तविक, हा माध्यमस्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचा दावा आश्चर्यकारकच होता, कारण गेल्या काही वर्षांमध्ये भाजपशासित राज्यांमध्ये अनेक पत्रकारांना अटक झालेली आहे. अनेकांवर राष्ट्रद्रोहाचे व दहशतवादाचे आरोपही करण्यात आले. परंतु, भाजपच्या कोणत्याही नेत्याने वा मंत्र्याने या विरोधात आवाज उठवलेला नाही.

'रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स'च्या माध्यमस्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 180 देशांच्या यादीत भारत 142 व्या स्थानावर आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भारताचं स्थान सहा क्रमांकांनी खाली आलं आहे.

अर्णव गोस्वामी यांची एक मुलाखत 2018 साली 'गल्फ न्यूज'ने घेतली होती. ते भाजपच्या बाजूने पक्षपाती आहेत, या संदर्भातही त्यांना त्या वेळी प्रश्न विचारण्यात आला.

यावर ते म्हणाले, "हा खोटा दावा आहे. आम्ही टीकेची गरज असते तिथे भाजपवर कठोर टीका करतो."

गेल्या आठवड्यात अर्णव गोस्वामी सात दिवसांच्या कोठडीवासातून बाहेर आले. ते न्यूजरूममध्ये परतले, त्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं.

त्यांच्या सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. त्या वेळी भाषण देताना अर्णव म्हणाले, "आपल्या पत्रकारितेमुळे ते आपल्याला लक्ष्य करत आहेत. आपल्या पत्रकारितेची सीमा कोणती असेल, याचा निर्णय मी करेन."

मनिषा पांडे म्हणतात, "रिपब्लिकवर जे काही सुरू असतं त्याला पत्रकारिता म्हणता येणार नाही. त्याला 'रिअॅलिटी शो' म्हणता येईल. पण लोकांच्या मतांवर त्यांचा प्रभाव पडतो आहे आणि लोकशाहीसाठी हीच चिंताजनक बाब आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)