You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाः महाराष्ट्रात शाळा नक्की कधी सुरू होणार?
शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडण्यात आल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं होतं.
आता मुंबई - पुण्यातल्या शाळा बंद राहणार असल्याचं महापालिका प्रशासनाने जाहीर केलंय. तर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून (23 नोव्हेंबर) शाळा सुरू होणार आहेत. तर पूर्वतयारीमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये अनेक शिक्षक कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले आहेत.
मुंबई - पुण्यातल्या शाळा बंद
दिवाळीनंतर परिस्थितीपाहून राज्यात नववी ते बारावीसाठीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं. शाळा सुरू करण्याचा निर्णय केंद्राने राज्य सरकारवर सोपवला आहे.
आणि राज्य सरकारने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडलाय. त्यानुसार मुंबईतल्या शाळा वर्षअखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने जाहीर केला.
याविषयी बोलताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं, "शाळा सुरू करण्याचा निर्णय मी स्थानिक प्रशासनावर सोडला होता. त्यानुसार मनपा आयुक्तांनी सकाळी माझ्याशी चर्चा केली. चर्चेनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी तयारी झाली त्या ठिकाणी शाळा 23 नोव्हेंबरला सुरू करू, इतर ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णय घेऊ."
मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहतील. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यातल्या शाळाही 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जाहीर केलंय. तर नवी मुंबई आणि पनवेल महापालिका क्षेत्रांतल्या शाळाही 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं या दोन्ही महानगरपालिकांनी जाहीर केलंय.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या शाळाही बंद राहणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केलंय.
कोरोनाच्या परिस्थितीचा 13 डिसेंबरला आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं मोहोळ यांनी म्हटलंय.
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्याची तयारी करण्यात येतेय. 7 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या माध्यमिक शिक्षकांची कोव्हिड चाचणी करण्यात येणार आहे. सोबतच इतर पूर्व तयारी करून टप्प्याटप्याने 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
स्थानिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने शाळांची स्वच्छता करण्यात येईल. शासनाच्या नियमांनुसार पूर्वतयारी करणाऱ्या शाळाच 7 डिसेंबरपासून सुरू करता येणार आहेत. या शाळेतल्या सर्व शिक्षकांची कोव्हिड चाचणी व्हावी लागेल. शिवाय मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचं लेखी संमती पत्र शाळेत द्यावं लागेल.
रायगड
रायगड जिल्ह्यातल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधले 9वी ते 12वीचे वर्गही 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. पण त्याआधी शासनाच्या नियमानुसार शिक्षकांनी कोव्हिड चाचणी करून घेणं अत्यावश्यक असल्याचं जिल्हा प्रशासनाने म्हटलंय.
अमरावती
अमरावती जिल्ह्यामध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांच्या मदतीने पुरेशी काळजी घेत 23 तारखेपासून शाळा सुरू होणार असल्याचं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जाहीर केलंय.
मोठ्या शाळांना 9वी ते 12वीचे वर्ग आळीपाळीने घेण्याचा पर्याय देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. शाळांमधली हजेरी सुरुवातीच्या काळात सक्तीची असणार नाही, ज्यावेळी पालकांची सहमती असेल, तेव्हाच त्यांनी मुलांना शाळेत पाठवायला सुरुवात करावी असं नवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
ते म्हणाले, "शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यात येत आहेत. याबाबत शाळा व्यवस्थापन समित्या, शिक्षक व पालक वर्ग यांची मते जाणून घेऊनच व सुरक्षेबाबत संपूर्ण काळजी घेऊनच शाळा सुरु करण्यात येत आहेत.
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. शाळेतील सुविधा व परिसरातील येण्या-जाण्याचे मार्ग, गर्दीची ठिकाणे आदी लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या विचार विनिमयानंतरच शाळा चालू करण्यात याव्यात अशी सुचना शाळांना देण्यात आल्या आहे"
नागपूर
दिवाळीच्या पूर्वी कोरोना रुग्ण संख्येत होणारी घट लक्षात घेता शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून स्थानिक प्रशासनाच्या संमतीने सुरू करता येतील असा आदेश काढला होता.
त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्यासंदर्भात मनपाने तयारी केली होती. मात्र दिवाळीनंतर कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता 23 नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या शाळा सध्या सुरू न करता 13 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्यात येतील, असा आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी जारी केला आहे.
हा आदेश केवळ महानगरपालिकेच्याच शाळा नव्हे तर नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांसाठी लागू असेल.
नागपूर जिल्ह्यामधल्या 12,031 शिक्षकांपैकी 6823 शिक्षकांची कोव्हिड चाचणी करण्यात आली असून यापैकी नागपूर ग्रामीण भागात 25 तर शहरात 16 असे एकूण 41 शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती शिक्षणाधिकारी चिंतामणी वंजारी यांनी दिलीय.
नाशिक आणि अकोल्यात संभ्रम
नाशिक मध्ये शाळांनी तयारी केलीय पण पालक द्विधा मनःस्थितीत आहेत. पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत, जर इतर इयत्तेत असलेल्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास होतोय तर मग आमची मुलं शाळेत का पाठवायची, असं पालकांचं म्हणणं आहे.
याविषयी उद्या (22 नोव्हेंबर) पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची बैठक होणार आहे, त्यात याविषयीचा निर्णय होणं अपेक्षित आहे.
तर परिस्थिती पाहून अकोला जिल्ह्यातल्या शाळांची सुरुवात लांबणीवर टाकण्याविषयीचा निर्णय घेणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलंय.
ते म्हणाले, "हा निर्णय घेतला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आणि आता प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे सरकारने हा पुनर्विचार केला पाहिजे. याबाबती आम्ही वर्षाताई गायकवाड आणि मुख्यमंत्र्यांसोबत बोलू. अकोल्याचा पालकमंत्री म्हणून, जिल्हा प्रशासनाची कारवाई म्हणून आम्ही सुद्धा या निर्णायाचा पुनर्विचार करून शाळेची सुरुवात लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न एकंदरीत वातावरण पाहून करण्याचा निर्णय घेणार आहोत."
शाळा उघडण्याबद्दल पालक म्हणतात...
मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाचं नेशन वाईड पॅरेंट्स असोसिएशनने स्वागत केलंय. संघटनेच्या प्रमुख अनुभा सहाय यांनी सांगितले, "मुंबई,पुणेसारख्या शहरांमध्ये परिस्थिती आजही नियंत्रणात नाही. दिवाळीनंतर दुसरी लाट येऊ शकते यामुळे पालकांच्या मनात भीती आहे. उर्वरित भागातही विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे आम्हाला वाटते. सरकारने घाईघाईत निर्णय घेऊ नये. यामुळे पालकांमध्ये अधिक गोंधळ निर्माण होतो आणि संभ्रम वाढतो." दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने ठोस पर्यायी व्यवस्था तयार करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
राज्यात जिथे शाळा सुरू होणार आहेत, तिथे मुलांना शाळेत पाठवताना पालकांना लेखी परवानगी देणार पत्र शाळेला द्यावं लागेल. आणि पालकांमध्ये याविषयी नाराजी आहे. अनेक पालक आपल्या मुलांना धोका पत्करून शाळेत पाठवायला तयार नाहीत.
अनेक ठिकाणी पूर्वतयारीमध्ये करण्यात आलेल्या कोव्हिड चाचणीत शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्यानेही पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
कोल्हापूरमध्ये 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यासाठीची तयारी करण्यात येतेय. राजेंद्र नगर परिसरात राहणाऱ्या सुप्रिया साबळे यांनी लेखी परवानगी द्यायला नकार दर्शवला. "आपल्या मुलीला शाळेत पाठवताना ती जबाबदारी शाळेची नसून आमची असणार आहे त्यामुळे ही जबाबदारी आम्ही कशी घेणार असा प्रश्न आहे", असं त्या सांगतात. "सध्या तरी आपण मुलीला शाळेत पाठवणार नाही. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी शाळेत पाठवण्याबाबत विचार करू", असंही साबळे यांनी म्हटलंय.
तर व्यवसायाने शिक्षक असणाऱ्या शिवाजी पाटील यांनी आपण आपल्या मुलीला शाळेत पाठवण्यास तयार असल्याचं सांगितलं. पालक म्हणून विचलित असलो तरीही मुलीला शाळेत पाठवणार असून शाळेने सोशल डिस्टंन्सिंग आणि सॅनिटाईझ करणं या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पाटील यांची मुलगी नववीत आहे तर शिवाजी पाटील हे स्वतः एक शिक्षक आहेत.
शिक्षक म्हणतात...
महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना सांगितलं, "मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्यावतीने सतत ही मागणी करण्यात येत होती, मात्र मुख्याध्यापक व शाळा यांचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत सरकार नव्हते. आता आम्ही जो प्रस्ताव ठेवला होता तोच सरकार मान्य केला. मात्र या आठवड्यात मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागला. त्यात पालकांचे सहकार्य मिळत नव्हते व शाळा जरी उघडल्या असत्या तरी 10 ते 15 टक्के विद्यार्थी येण्याची अपेक्षा होती. मुळात हा निर्णय अगोदर घेणे आवश्यक होते."
महापालिकेच्या आणि अनुदानित शाळा सॅनिटाईझ करण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी विना-अनुदानित शाळांच्या सॅनिटायझेशनचं काय, असा सवाल केला जातोय.
राज्यातल्या सगळ्या शाळांबद्दल शासनाने एकच निर्णय घ्यावा असं शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी म्हटलंय.
ते म्हणाले, "राज्यात 23पासून सर्व शाळा उघडत आहेत. मुंबई-ठाण्याच्या मात्र 1 डिसेंबरला. हा निर्णयच योग्य नाही. मुंबई-ठाण्यातले विद्यार्थी, विद्यार्थी आणि इकडले विद्यार्थी, विद्यार्थी नाहीत का? शासनाने राज्यभर एकच निर्णय द्यायला पाहिजे. आता शिक्षकांच्या कोरोना टेस्ट सुरू आहेत. झुंबड उडालीय कोव्हिड सेंटरवर. अमरावतीला 22-23 शिक्षक पॉझिटिव्ह सापडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शासनाने पुनर्विचार करण्याची गरज आहे. राज्यात एकाचवेळी शाळा उघडा. घाई करू नका, अशी माझी शासनाला विनंती आहे."
याविषयी बोलताना नागपूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे संघटन सचिव राम बांते म्हणाले, "आम्ही पालकांना व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सूचना दिल्या आहेत. पण ही व्यवस्था सगळ्या विद्यार्थ्यांकडे नाही. त्यामुळे सगळ्यांपर्यंत ग्रामीण भागामध्ये ही माहिती पोहोचू शकलेली नाही. परंतु एकाही पालकाने आम्हाला अजून शाळा खरंच सुरू होणार आहे का, शाळेत मुलांना पाठवू की नाही, म्हणून फोनही केलेला नाही.
पालकांना हे माहितेय की जोपर्यंत कोरोनाची लस येणार नाही, आमच्या मुलांना लस लावली जाणार नाही, तोपर्यंत आमची मुलं सुरक्षितरित्या शाळेमध्ये अभ्यास करण्यासाठी तयार होऊ शकत नाहीत, अशी त्यांची मानसिकता झालेली आहे."
शाळा सुरू करण्याचा निर्णय मुलांच्या दृष्टीनेही योग्य नसल्याचं बांते म्हणतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "एकीकडे सांगितलं जातं कोरोनाची दुसरी लाट येणार. आणि त्याबरोबरच विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये येतील तेव्हा विद्यार्थ्यांसाठी ज्या काही भौतिक सुविधा पाहिजेत, स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचा विषय आहे. रोज सॅनिटाईझ करण्यासाठी लागणारा आर्थिक भुर्दंड फार मोठा आहे. त्याची व्यवस्था कशी करायची याबाबत शासनाने कुठल्याही प्रकारचं नियोजन केलेलं नाही.
पालक आणि विद्यार्थी अस्वस्थ आहेत. अशा भीतीदायक वातावरणात आपण शिक्षणाची प्रक्रिया सुरू केली, तर ती प्रभावशाली असू शकणार नाही. आनंददायी शिक्षण जर द्यायचं असेल तर मनातून जोपर्यंत कोरोनाची भीती जात नाही, तोपर्यंत शासनाने शाळा सुरू करण्याचा अट्टाहास करू नये असं मला वाटतं.
शाळांचं रोजच्या रोज सॅनिटायझेशन, त्यासाठी लागणारी सामुग्री आणि निधी कुठून मिळणार याविषयीची अस्पष्टता शाळांचे मुख्याध्यापक बोलून दाखवतायत. एकाच ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक शाळा असतील तर या दैनंदिन स्वच्छतेसाठीचा वेगळा भार आपण सहन करू शकत नसल्याचं पंचातींनी सांगितल्याने मुख्याध्यापकांवर याचा भार येणार असल्याचं नागपूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे संघटन सचिव राम बांते यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
विरोधकांची टीका
मोठ्या वर्गांसाठी शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करायच्या की नाहीत याचा निर्णय स्थानिक यंत्रणांवर सोडण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केलीय.
"स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असली तरी शासन म्हणून काही करणार आहात की नाही?" असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे केलाय.
ज्या भागांमध्ये शाळा सुरू होणार आहेत, तिथे प्रत्यक्ष वर्गांसोबतच ऑनलाईन शिक्षणही सुरू राहणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)