संजय राऊत: सेक्युलरची भाषा करणारे सर्वात जास्त धर्मांध असतात

संजय राऊत, शिवसेना, कुणाल कामरा

फोटो स्रोत, Screen grab

फोटो कॅप्शन, शिवसेना खासदार संजय राऊत

सेक्युलरची भाषा करणारे सर्वात जास्त धर्मांध असतात. सेक्युलर म्हणजे शिवी झाली आहे असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कुणाल कामरा यांच्या शट अप या कुणाल कार्यक्रमात ते बोलत होते.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर सुरू झालेल्या ठाकरे सरकार विरुद्ध कंगना रनौत या वादानंतर कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती.

कंगना रनौतच्या घरी अतिक्रमण विरोधी कारवाईनंतर सामनाने "उखाड दिया" अशी बातमी केली होती. त्यामुळे या मुलाखतीचं आकर्षण होता..बुलडोझर..

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बुलडोजर हातात घेऊनच राऊत अवतरले आणि म्हणाले, हा जिथे जायचं तिथं पोहोचतो..यात पत्ता फीड करण्यात आलाय. सर्वांच्या पापाचा घडा भरणार..असं म्हणत संजय राऊत यांनी राजकीय टोलेबाजीला सुरूवात केली. बदललेली शिवसेना, सेक्युलरिझम, कोरोना, सुशांत आणि अर्णब अशा अनेक मुद्यांवर राऊत यांनी या मुलाखतीत उत्तरं दिली.

शिवसेना बदलली आहे का?

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे पर्यावरणाच्या विषयावर जास्त भर देतात. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी धर्म आणि राजकारण एकत्र करणं ही शिवसेनेची मोठी चूक झाली. याचं नुकसान शिवसेनेला भोगावं लागलं असं वक्तव्य केलं. त्यामुळे शिवसेना बदलली आहे का? शिवसेनेचा मेकओव्हर झालाय?

संजय राऊत, शिवसेना, कुणाल कामरा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे

या प्रश्नाचं उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "शिवसेना एक हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना सर्वांना एकत्र घेऊन किमान समान कार्यक्रमावर पुढे जातेय. भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम केलं जाईल."

सेक्युलर म्हणजे एक शिवी-राऊत

शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजेंडा सेक्युलर आहे. या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, "या देशात कोणीही सेक्युलर नाही. कोणी सेक्लुलर होऊ शकत नाही"

पण, काही दिवसांपूर्वी सेक्युलरिझमच्या मुद्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आणि देशाची राज्यघटना सेक्युलर आहे असं म्हटलं होतं. पदाची शपथ घेताना सेक्युलर धर्माचं पालन करावं लागतं असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं.

"सेक्युलरची भाषा करणारे सर्वात जास्त धर्मांध असतात. सेक्युलर म्हणजे एक शिवी आहे. या शब्दाचा राजकारणात खूप चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आलाय. या एका शब्दामुळे भारतात हिंदू आणि मुसलमान यांच्यात फूट पडली." असं संजय राऊत "शट अप या कुणाल' या कार्यक्रमात म्हणाले.

संजय राऊत, शिवसेना, कुणाल कामरा

फोटो स्रोत, Screen grab

फोटो कॅप्शन, संजय राऊत कार्यक्रमादरम्यान

"सेक्युलर म्हणजे काय? फक्त हिंदुंना शिव्या देऊन तुमचं सेक्युलरिझम वाढेल हे चुकीचं आहे." असं राऊत पुढे म्हणाले.

संजय राऊत यांची मुलाखत घेणारे कुणाल कामरा रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर, कोर्टाच्या निर्णयावर टीका केल्याने चर्चेत आले. कामरा यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागण्यास नकार दिलाय. कामरा यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी खटला सुरू करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

कोव्हिड-19 आणि राजकारण

कोरोना संसर्गाच्या मुद्यावरून राज्य आणि केंद्रात राजकारण झालं. जीएसटीचा परतावा देण्याच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे मोदी सरकारविरोधात शड्डू ठोकून उभे राहीले. जीएसटी ही चूक झाली हे मान्य करा, असं वक्तव्य ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलं.

या राजकारणावर बोलताना राऊत म्हणाले, "प्रत्येक राज्याने काम केलं. केंद्र सरकारची जबाबदारी देखील आहे. मी त्यांना दोष देणार नाही. देशावर संकट येतं तेव्हा पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतो. पंतप्रधान देशाचे नेते आहेत. त्यांच्या निर्णयानुसार आम्ही काम करणार."

संजय राऊत, शिवसेना, कुणाल कामरा

फोटो स्रोत, Screen grab

फोटो कॅप्शन, शिवसेना खासदार संजय राऊत

पण, प्रादेशिक पक्षांना श्रेय देत नाहीत. यावर बोलताना राऊत म्हणाले, "हा त्यांचा विचार आहे. अशा परिस्थितीत राजकीय विचारांपुढे जाऊन निर्णय घेतला पाहिजे."

राज्यात प्रादेशिक पक्षांना जागा आहे?

"प्रादेशिक पक्षांना आपली जागा आहे. राष्ट्रीय पक्ष प्रादेशक पक्षांची जागा घेऊ शकत नाही. पश्चिम बंगाल, आंध्र, तेलंगणा, ओडीशा, महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय पक्ष झाला तरी प्रादेशिक पक्ष रहाणारच. राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांना घेऊनच राजकारण करावं लागेल," असं राऊत म्हणाले.

मग, राज ठाकरेंच्या पक्षाबद्दल तुमचं मत काय? यावर राऊत म्हणाले, "प्रत्येक पक्षाला मोठं होण्याचा अधिकार आहे. लोकांनी तुम्हाला स्वीकारलं तर वाढलं पाहिजे. मनसे काही वर्षांपूर्वी मोठा पक्ष होता."

"बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात"

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. निवडणुकीत ईव्हीएमवर नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात. निवडणूका कशा व्हाव्यात? यावर बोलताना राऊत म्हणाले, "आमची भूमिका बदलेली नाही. बॅलेट पेपरवर निवडणुका करण्यात याव्यात. आम्ही कोणाला मत दिलं, कोणाला गेलं यावर लोकांचा विश्वास नाही."

महाविकास आघाडीमुळे मतदारांमध्ये संभ्रम

शिवसेनेने भाजपसोबत युती करून 2019 च्या निवडणुका लढवल्या. त्यानंतर युती तोडून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली.

राऊत म्हणाले, "हे राजकारण आहे. राजकारण साधू संतांचा खेळ नाही. आम्ही तपस्या करण्यासाठी आलेलो नाही. पण, तपस्या केल्याशिवाय राजकारण होत नाही. मोदींनी प्रचारक म्हणून तपस्या केली आहे."

"भाजपसोबतचे संबंध फक्त राजकीय नव्हते. भावनिक होते. ते तोडून नवीन घर बसवणं..खूप दुख: होतं." असं राऊत म्हणाले.

"सुशांत बिहारचा नाही मुंबईचा"

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात मोठं राजकारण झालं. भाजपने सुशांत बिहारचा मुलगा असं म्हणत, बिहार निवडणुकीत याचा वापर केला.

संजय राऊत, शिवसेना, कुणाल कामरा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुशांत सिंह राजपूत

यावर बोलताना राऊत म्हणाले, "मी सुशांतला बिहारचा मानत नाही. तो मुंबईचा होता. त्याची ओळख मुंबईत आल्यानंतर बनली. पाटण्यात असताना त्याला कोणीच ओळखत नव्हतं. आम्ही पहिल्यापासून सांगितलं, तो आमचा होता. ओरडून काहीच फायदा नाही. त्याला न्याय आम्ही देणारच."

बॉसकडून काही ऑर्डर आली आहे का?

एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतने आत्महत्या केल्याचा रिपोर्ट दिला. "सत्य लपवून ते काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. जो तुमच्या समोर आहे त्यावर पडदा टाकून नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. का? कशासाठी? तुम्हाला बॉसकडून काही ऑर्डर आलीये का? याच दिशेने चौकशी करा. या लोकांनाच टार्गेटकरून तुम्हाला चौकशी करायची आहे. असं असेल तर, जे सुरू आहे के ठीक आहे. पण, मुंबई पोलिसांनी केलेली चौकशी खरी होती."

अर्णब गोस्वामी वर काय म्हणाले राऊत?

"हा व्यक्ती मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द उच्चारतो. शरद पवारांविरोधात बोलतो. गृहमंत्र्यांविरोधात बोलतो. त्याच्या आसपास राहू नका. जवळ आला तर दंडुक्याने मारा असं कधीच म्हटलं नाही. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. तर, मदत करू," असं राऊत म्हणाले.

संजय राऊत, शिवसेना, कुणाल कामरा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अर्णब गोस्वामी

आदित्य ठाकरेंविरोधात सुरू असलेल्या मोहिमेबाबत बोलताना राऊत म्हणाले, "मुंबई पोलिसांनी 400- 500 रूपये द्या आणि सत्य माना याबाबत चौकशी सुरू केलीये. कुठून येतो हा पैसा?"

फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणात पाहण्याची इच्छा-राऊत

देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. राजकारणात कोणीही शत्रू नसतो. वैचारिक मतभेद असू शकतात. फडणवीस आमचे शत्रू नाहीत. भाजपचे मोठे नेते आहेत. राष्ट्रीय स्त्ररावर त्यांना पाहण्याची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस युवा नेतृत्व आहे. राष्ट्रीय स्त्ररावर काम करू शकतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)