बिहार निवडणूक: असदुद्दीन ओवेसींमुळे जेडीयू आणि भाजपला बिहारमध्ये सत्ता स्थापन करता आली?

ओवेसी

फोटो स्रोत, AIMIM

बिहारच्या सीमांचल भागात 24 जागा आहेत ज्यातल्या जवळपास अर्ध्या जागांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या अधिक आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने 5 जागांवर विजय मिळवला आहे.

व्हीडिओ कॅप्शन, बिहार निवडणूक निकाल: ओवेसींमुळे MIM ला मुस्लिमांशिवायही पाठिंबा मिळाला का?

निवडणुकीच्या आधी राजकीय विश्लेषकांना वाटत होतं की सीमांचलच्या भागात मुस्लीम मतदार ओवेसींच्याऐवजी धर्मनिरपेक्ष प्रतिमा असणाऱ्या महागठबंधन म्हणजे तेजस्वी यादव आणि काँग्रेसच्या पारड्यात मत टाकतील. पण तसं झालेलं नाही.

बिहारमधले वरिष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर असं का झालं याचं विश्लेषण करताना सांगतात, "ओवेसी मतदारांना हे पटवण्यात यशस्वी झाले की राष्ट्रीय जनता दल असो किंवा महागठबंधन, हे फक्त तुमची मतं मिळवतात पण तुम्हाला त्याबदल्यात काहीही मिळत नाही. त्यामुळे मुस्लीम मतदारांनी सीमांचल भागात एकगठ्ठा मतं ओवेसींच्या पारड्यात टाकली."

0
भाजप+
0
राजद+
0
इतर

सर्व निकाल

भाजप+
राजद+
इतर
निकाल नाही

सर्व मतदारसंघ

हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण होत असताना ते दोन्ही बाजूंना होऊ शकतं हाही मुद्दा ते मांडतात. "भाजप जसा हिंदूचं ध्रुवीकरण करण्यात यशस्वी झाला तसंच ओवेसींनी सतत कलम 370, ट्रिपल तलाकला विरोध अशा मुद्द्यांवरून भाजपचा विरोध करत बरोबर उलटं ध्रुवीकरण केलं. त्यामुळे मुस्लिमांना ते आपलेसे वाटले, याचाही फायदा त्यांना झाला. म्हणून ओवेसींच्या पक्षाला जागा मिळाल्या. पण यात फायदा झाला तो भाजपचा. कारण महागठबंधनच्या वाटेच्या जागा ओवेसींना गेल्या."

अनेक वर्षांपासून आमदार असलेले उमेदवार हरले

पूर्णियाच्या अमौर जागेवर गेल्या 36 वर्षांपासून अब्दुल जलील मस्तान आमदार होते. यंदा त्यांना फक्त 11 टक्के मतं मिळाली आहेत. दुसरीकडे एमआयएमचे अख्तर-उल-ईमान यांनी 55 टक्के मतं मिळावून त्यांनी या जागेवर विजय मिळवला आहे.

बहादुरगंजच्या जागेवरून काँग्रेसचे तौसीफ आलम गेल्या 16 वर्षांपासून आमदार होते. यंदा त्यांना फक्त 10 टक्के मतं मिळाली आहेत आणि एमआयएमच्या अंजार नईमी यांनी 47 टक्क्यांहून अधिक मतं मिळवली आहेत. विश्लेषक हसन जावेद म्हणतात की, "महागठबंधनला वाटत होतं की सीमांचलमध्ये आरामात जागा मिळतील आणि ते राज्यात सरकार बनवू शकतील. पण निकाल याच्या बरोबर विरूद्ध आहेत."

'मुस्लिमांना स्वतःची वेगळी ओळख हवीये'

निवडणूक प्रचारात सीमांचलचा दौरा करणारे मुक्त पत्रकार पुष्य मित्र म्हणतात की, "मुस्लीम मतदारांना स्वतःची वेगळी ओळख हवीये. भाजपला हरवणारी व्होट बँक इतकीच आपली ओळख असावी असं त्यांना वाटत नाही. त्यांना आपल्या भागात बदल हवाय, विकास हवाय."

सीमांचल भागात अजूनही हवा तसा विकास झालेला नाही या गोष्टीकडे ते लक्ष वेधतात. "इथे अजून लोकांसाठी धड पूल नाहीत, लोक अजूनही कच्च्या पुलांवरून जा-ये करतात. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर उमेदवार इथे मतं तर मागतात पण इथल्या विकासात त्यांना रस नसतो."

अख़्तरउल ईमान

फोटो स्रोत, @LadeedaFarzana

सीमांचल भागातल्या मुस्लिमांना बदल हवा होता ही गोष्ट हसन जावेदही मान्य करतात. त्यांच्या मते इथल्या मतदारांची मागणी होती की राजद आणि काँग्रेसने आपले जुने उमेदवार सोडून नवे चेहरे द्यावेत. इथे नेतृत्वात बदल घडावा पण तसं होताना दिसत नाही. म्हणूनच एमआयएमला आपला पाया पक्का करता आला.

ते म्हणतात, "काँग्रेस इथल्या मुस्लीम मतदारांना जणू काही वेठबिगार मतदार समजत होती की काहीही झालं तरी हे मतदार आपल्यालाच मत देतील. इथल्या लोकांना बदल हवा होता आणि म्हणूनच अनेक वर्षांपासून जिंकणाऱ्या मातब्बर नेत्यांना इथल्या जनतेने पूर्णपणे नाकारलं."

पुष्य मित्र याला दुजोरा देतात. "सीमांचलमध्ये जुनेच नेते ठाण मांडून बसले होते. नेत्यांच्या नव्या पिढीला जागाच मिळत नव्हते. मुस्लीम मतदारांना मात्र वेगळे चेहरे हवे होते."

मुस्लिमेतरांची मतं ओवेसींच्या पारड्यात पडली का?

2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ओवेसींना मुस्लिमेतरांची मतं, विशेषतः दलितांची मतं मिळाल्याचं दिसून आलं होतं. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना मुस्लीम, दलित आणि इतरही मतं मिळाली होती. तसं काही बिहारच्या सीमांचल भागात झालं का?

मणिकांत ठाकूर यांचं उत्तर नाही असं देतात. "इथल्या मुस्लीम मतदारांनीच ओवेसींच्या पारड्यात मत टाकलं आहे. पण इथे मुस्लीम बहुसंख्य आहेत आणि ते ज्यांना एकगठ्ठा मतदान करतील तोच उमेदवार निवडून येईल हे नक्की होतं.

"ओवेसी हे क्षेत्र सोडून इतर ठिकाणी गेलेही नाहीत जिथे मुस्लीम मतदार बहुसंख्य नाहीत. हिंदू किंवा दलितांची मतं ओवेसींना मिळालेली नाहीत. पण भाजपच्या ध्रुवीकरणाचा फायदा ओवेसींना झाला हे नक्की. हिंदू जसे भाजपकडे वळले, तसे मुस्लीम ओवेसींकडे," ठाकूर नमूद करतात.

एक चुनावी रैली में असदुद्दीन ओवैसी

फोटो स्रोत, BBC WORLD SERVICE

ओवेसींनी काँग्रेसची मतं खाल्ली का?

या निवडणुकीनंतर ओवेसींवर हाही आरोप केला जातोय की त्यांनी काँग्रेसची मतं खाल्ली. मात्र माध्यमांशी बोलताना ओवेसींनी म्हटलं की, "आम्ही काँग्रेसची मतं खाल्ली नाहीत, तर त्यांनीच आमची खाल्लीत कारण जिंकून आम्ही आलो आहोत."

यावर बोलताना मणिकांत ठाकूर म्हणतात की, "हे नक्की की एमआयएममुळे काँग्रेसला आणि राजदला नुकसान झालेलं आहे. ओवेसी म्हणत जरी असले की काँग्रेसने आमची मतं खाल्ली, आम्ही त्यांची नाही. तरी याला विशेष काही अर्थ नाहीये. ते असं म्हणणारच. पण एक लक्षात घ्या की काँग्रेस राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष आहे, आणि ओवेसींचा पक्ष तितका मोठा नाहीये."

पण दुसरीकडे काही तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की ओवेसींनी काँग्रेसची मत विभाजित करण्याचा संबंध नाही कारण त्यांनी फक्त 20 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते आणि त्यातले 5 जिंकून आले. जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त त्यांना दुसऱ्या जागांवर विशेष मतं मिळालेली नाहीत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)