You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अण्णा हजारे : 'महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती नाम गाडी,थांबला तर खटारा' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. 'महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती नाम गाडी,थांबला तर खटारा' - अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार म्हणजे 'चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा' असं अण्णा हजारे म्हणाले आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.
लोकपालनंतर लोकायुक्त कायद्यासाठी मुख्यमंत्री वगळता एकही मंत्र्याने माझ्या पत्राला उत्तर दिले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नंतर पाहू असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकायुक्त कायदा आणला नाही तर पुन्हा आंदोलन करणार असा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला आहे. आताचे राजकारण म्हणजे पैसा आणि सत्ता इतकेच आहे. राजकारण्यांमध्ये सेवाभाव नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
2. उद्धव ठाकरे भेटत नाहीत म्हणून शिवसेना नेत्याने राज्यपालांची भेट घेतली
महाराष्ट्रात राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे दिसून येते. भाजप आणि मनसेचे नेते सतत राज्यपालांची भेट घेत असतात. पण आता शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी राज्यपालांची भेट घेतली. लोकमतने हे वृत्त दिले आहे.
प्रत्येक मागणीसाठी राज्यपालांची भेट घेणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती, तर मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने राज्यपालांना भेटावे लागते असा टोला भाजपने लगावला होता.
अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याला खूप कमी मदत येणार असल्याचं सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विशेषाधिकार वापरून मदत करावी अशी मागणी किशोरी तिवारी यांनी केली आहे.
चार दिवसांपासून मुंबईत असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी वेळ दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
3. अर्णब यांची अटक वृत्तपत्र स्वातंत्र्यांवर हल्ला कसा करू शकतो? - संजय राऊत
अर्णब गोस्वामी यांची अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला अशी प्रतिक्रिया देणाऱ्या भाजपवर सामनातून टीका करण्यात आली आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले आहे असं मत खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या आपल्या सदरात मांडले आहे.
संजय राऊत यांनी आपल्या सदरात लिहिलं आहे, "अर्णब गोस्वामी या वृत्तवाहिनीच्या मालकास 'आत्महत्या' प्रकरणात पकडताच अनेकांना चौथ्या स्तंभावर हल्ला झाल्याची उबळ आली. रिया चक्रवर्तीच्या अटकेसाठी ज्यांनी मोहिम राबवली त्यांना त्याच गुन्ह्यात अटक झाली आहे. तेव्हा तो वृत्तपत्र स्वातंत्र्यांवर हल्ला कसा ठरू शकतो?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
"अर्णब गोस्वामी यांनी एका मराठी उद्योजकाचे पैसे बुडवले असून याप्रकरणात आत्महत्या झाल्यानंतर 'सुसाईड नोट'मध्ये मृत्यूस गोस्वामी जबाबदार आहेत असे म्हटले आहे. आधीच्या भाजप सरकारने यासंदर्भात तपास केला नाही," असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
4. रुपाली पाटील यांना मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी
राजकीय पक्षांकडून आता पदवीधर मतदार नोंदणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे पदवीधर मतदारसंघासाठी रुपाली पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. लोकमतने हे वृत्त दिले आहे.
पुणे मनसेच्या महिला अध्यक्ष असणाऱ्या रुपाली पाटील यांना कसबा मतदारसंघातून विधानसभेची उमदेवारी दिली जाणार होती पण ऐनवेळी मनसेने अजय शिंदे यांना संधी दिली. यामुळे रुपाली पाटील पक्षावर नाराज होत्या.
रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ईच्छा व्यक्त केली होती.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांना मागे टाकत मनसेने पदवीधर मतदारसंघासाठी सर्वप्रथम आपला उमेदवार जाहीर केला आहे. इतर उमेदवारांची यादी मनसेकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
5. एक जानेवारीपासून सर्व चारचाकी वाहनांसाठी 'फास्ट टॅग' अनिवार्य
मोदी सरकारने आता सर्व चारचाकी वाहनांसाठी 1 जानेवारी 2021 पासून 'फास्ट टॅग' अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री 1 डिसेंबर 2017 च्या अगोदर झालेली आहे, अशा वाहनांसाह M व N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे.
केंद्रीय मोटार मोटार वाहन नियम 1989 नुसार 'फास्ट टॅग' ला 1 डिसेंबर 2017 नंतर खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या सर्व रजिस्ट्रेशनसाठी अनिवार्य केले गेले होते आणि वाहन निर्माता किंवा डीलरद्वारे 'फास्ट टॅग'चा पुरवठा केला जात होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)