You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनंत भालेराव: लोकशाहीच्या मूल्यांसाठी तुरुंगवासही पत्करणारे पत्रकार
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये सामाजिक जबाबदारीचं भान ठेऊन ज्या पत्रकारांनी आपली लेखणी झिजवली अशा पत्रकारांमध्ये दै. मराठवाडाचे संपादक अनंत भालेराव यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. आज (26 ऑक्टोबर) त्यांचा स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्या आठवणींना दिला हा उजाळा.
अनंत भालेरावांनी फक्त दैनिक मराठवाडाच चालवला नाही तर त्यांचे मराठवाडा या प्रदेशाच्या बांधणीतही महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या लेखणीने नेहमीच गोर-गरीब आणि शोषित वर्गांची बाजू लावून धरली.
मराठवाड्याच्या प्रश्नांवर त्यांनी पोटतिडकीने भूमिका मांडली इतकेच नाही तर त्यावर मार्ग कसा शोधायचा हे देखील त्यांनी दाखवून दिलं. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून ते मराठवाड्याच्या उभारणीमध्ये भालेरावांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सुमारे 40 वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता करून लेखणी चालवणाऱ्या या संपादकाने कधी काळी हातात बंदूक घेतली असेल हा विचार आपण करू शकतो का? पण स्वातंत्र्याआधी बंदूक तर स्वातंत्र्यानंतर लेखणी घेऊन समाज घडवून लोकशाहीची मूल्यं टिकवण्याचं काम त्यांनी केलं.
स्वातंत्र्य आंदोलनात भालेराव कसे आले?
शालेय वयापासून भालेराव हे स्वातंत्र्य आंदोलनाने भारलेले होते. शिक्षण सुरू असतानाच ते छोट्या-मोठ्या आंदोलनात भाग घेत असत. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेनी त्यांनी 'वंदे मातरम' आंदोलनात भाग घेतला आणि परिणामी त्यांची शाळेतून हकालपट्टीही झाली होती.
1939 मध्ये भालेरावांनी परभणी जिल्ह्यातील सेलूच्या नूतन विद्यालयात त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. ही राष्ट्रीय शाळा होती. समविचारी लोकांनी एकत्र येऊन काढलेली ती एक स्वतंत्र शाळा होती.
अशा प्रकारची शाळा आधी स्वामी रामानंद तीर्थ यांनी अंबाजोगई येथे काढली होती. त्याच मॉडलवर नूतन विद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. या शाळांनी विद्यार्थी तर घडवलेच पण नवं नेतृत्वदेखील घडवलं.
या शाळांबद्दल नरेंद्र चपळगावकर आपल्या कर्मयोगी संन्यासी पुस्तकात सांगतात की, स्वातंत्र्यलढ्याला सर्वांत मोठी कुमक याच शाळांमधून आली होती. किंबहुना हेच त्यांच्या स्थापनेचे खरे उद्दिष्ट होते. स्वामीजी, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई, अनंत भालेराव हे नेते या शाळांनी तर दिलेच पण सत्याग्रहात सहभाग घेणा-यांमध्ये खासगी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.
1942 ला 'चले जाओ'च्या वेळी ही शाळा कार्यकर्त्यांसाठी एक केंद्र बनली होती. या काळात भालेरावांनी सत्याग्रहींची व्यवस्था करणं आणि सत्याग्रहासाठी सत्याग्रही पाठवणं ही कार्ये पार पाडली. पण शिक्षक म्हणून अनेक बंधनं त्यांच्यावर येऊ लागली होती.
निजामाची देखील त्यांच्यावर करडी नजर होती. म्हणून 1944 मध्ये ते काँग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. लोकांचं संघटन करणं, सभासदांची नाव नोंदणी करणं इत्यादी कामे त्यांना काँग्रेस पदाधिकारी म्हणून करावी लागत.
परभणी आणि नांदेड जिल्ह्याचे ते संघटक देखील बनले. संघटक म्हणून त्यांनी गावागावात जाऊन प्रचार केला. स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन ते करत.
उमरीच्या दरोड्यात सहभाग
भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं पण निजामाने हैदराबाद संस्थानचा ताबा सोडला नव्हता. निजामाला आव्हान किंवा त्याला हादरा बसवा अशा हेतूने एक बॅंक लुटण्याची योजना जानेवारी 1948 मध्ये आखण्यात आली. याला 'उमरी बॅंक अॅक्शन' असे म्हटलं गेलं.
उमरखेड कॅंपच्या स्वातंत्र्य सैनिकांनी या योजनेत सहभाग घेतला. उमरी या गावात रझाकारांचा प्रभाव होता. तसेच पोलीस आणि बॅंकेच्या रक्षणासाठी असलेले अरब यांचा विचार केला असता ही मोहीम खूप धाडसी होती असंच म्हणावं लागेल.
बॅंक लुटून व्यवस्थितपणे पैसे आणण्यासाठी वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आल्या होत्या. बॅंकेवर हल्ला करण्यासाठी वेगळी तुकडी, बाहेरून येणा-या पोलिसांपासून रक्षण करण्यासाठी वेगळी तुकडी, रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवण्यासाठी वेगळी तुकडी अशी विभागणी करण्यात आली होती.
बॅंकेवर हल्ला करून पैसे लुटणा-या तुकडीमध्ये भालेराव यांचा समावेश होता. ही योजना यशस्वी झाली त्यात प्रतिकार करणा-या 9-10 जणांचे प्राण गेले. स्वातंत्र्य सैनिक सर्व परत सुखरूप आले.
पत्रकारितेला सुरुवात
आपल्या पत्रकारितेचा पाया स्वातंत्र्य आंदोलनातच बांधला गेला असं अनंत भालेरावांना वाटत असे. स्वातंत्र्यपूर्व काळात आनंद वाघमारे यांनी मराठवाडा नावाचे एक नियतकालिक काढले होते. त्यावर निजामाने बंदी आणली.
निजामाने बंदी आणली की, वाघमारे पुन्हा नव्या नावाने ते नियतकालिक सुरू करत असत. त्या काळात या नियतकालिकाचे 11 नावे बदलण्यात आली. 1948 मध्ये अनंत भालेराव स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम करत असतानाच मराठवाडासाठी लेख पाठवू लागले. मग नंतर ते 'मराठवाडा' मध्येच संपादक म्हणून रूजू झाले.
पाच वर्षं तिथे काम केल्यानंतर ते मराठवाड्याचे संपादक झाले.
जनतेचे प्रश्न मांडणे आणि तो सोडवणे यासाठी दै. मराठवाडाने सातत्याने पाठपुरावा केला.
गोविंदभाई श्रॉफ यांच्या चळवळीला अनंत भालेरावांच्या मराठवाडाची साथ असल्यामुळे परिणाम लवकर साधला जात असे असं परभणीचे अॅड. अनंत उमरीकर सांगतात. उमरीकर यांनी अनंत भालेराव यांच्यासोबत काही काळ काम केलं आहे.
ते सांगतात, "एखाद्या प्रश्नाची तड लावायची असे तेव्हा गोविंदभाई आणि भालेराव ही जोडी एकत्र येऊन विचार करत असे एकदा का पक्कं झालं काय करायचं तर गोविंदभाई आपल्या लोकसंग्रहातून आणि चळवळीतून तो प्रश्न उठवत आणि त्या प्रश्नाला भालेराव आपल्या मराठवाडातून उचलून धरत. सातत्य आणि पाठपुराव्यामुळे तो प्रश्न सुटलाच पाहिजे असा या दोघांचा धाक होता."
पत्रकारितेसाठी तुरुंगवास
1964मध्ये साखरेचे भाव दुप्पट झाले. या भाववाढीत काळबेर आहे असं हेरून सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी एक लेख लिहिला आणि तो भालेरावांनी मराठवाडात छापला. साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ करण्यात आली आणि त्यासाठी तत्कालीन पुरवठा मंत्री तल्यार खान कसे जबाबदार आहेत असा त्याचा आशय होता.
या लेखानंतर सुराणा आणि भालेराव यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला भरण्यात आला. संपादकांनी माफी मागावी अशी नोटीस त्यांना आली पण पूर्ण विचारांती भालेरावांनी माफी न मागता न्यायालयात जायचे ठरवले. खटल्याचं कामकाज पूर्ण होईपर्यंत वर्ष-दीड वर्ष गेलं. हा खटला इन कॅमेरा होता म्हणजे न्यायालयात काय सुरू आहे याची बातमी बाहेर येत नव्हती.
शक्य ते पुरावे सादर करण्यात आले पण भालेराव हा खटला हरले. त्यामुळे त्यांना आणि सुराणा यांना 1965 मध्ये तीन महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. खटला जिंकूनही तल्यार खान यांची स्थिती हरल्यासारखीच झाली होती. पुढे तल्यार खान यांना आपलं पद सोडावं लागलं.
तीन महिन्यांची शिक्षा भोगून झाल्यावर सुराणा आणि भालेराव बाहेर आले. त्यानंतर जनतेनी त्यांचे भव्य स्वागत केले होते.
पुढे आणीबाणीच्या काळातही त्यांनी दै. मराठवाडामध्ये सरकारविरोधात अनेक लेख छापले त्यामुळे त्यांना 1975 ते 1977 या काळात तुरुंगवास भोगावा लागला.
पत्रकारांसाठी आदर्श
अनंत भालेरावांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये 9 हजाराहून अधिक अग्रलेख आणि 8 हजारांहून अधिक विशेष लेख लिहिले आहेत. त्यांचे निवडक लेख कावड आणि आलो याची कारणासी या पुस्तकांमध्ये वाचायला मिळतात.
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि कोपऱ्यापासून ते कॅलिफोर्नियापर्यंत सर्व विषयांवर त्यांनी लिखाण केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी भालेराव यांच्यावर लेख लिहिला होता, त्यात त्यांनी भालेरावांना 'पत्रकारितेचं ज्ञानपीठ म्हटलं होतं. अगदी योग्य शब्दांत हे वर्णन आहे असंच मला वाटतं. केवळ मराठवाड्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून येऊन मराठी पत्रकारितेमध्ये करिअर घडवू पाहणा-या तरुण-तरुणींसाठी ते आदर्श आहेत यात शंकाच नाही.
'तर मग फोर्थ इस्टेट म्हणू नका'
अनंत भालेरावांसाठी पत्रकारिता म्हणजे ख-या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ होती आणि त्याचं पावित्र्य राखण्याबाबत ते कमालीचे आग्रही होते ते म्हणत, "वृत्तपत्रांचं काम हे सत्तेवर अंकुश ठेवणं व ज्यांना आधार नाही त्यांना आधार देणं हेच असलं पाहिजे. तुम्हाला नुसता व्यवसाय करायचा असेल, सिमेंटच्या कारखान्याला असतो तसा धंदा करायचा असेल तर करा. मग फोर्थ इस्टेट म्हणून दावा सांगू नका."
पत्रकारितेतील त्यांचे आदर्श टिळक, आगरकर आणि आंबेडकर हे होते. त्यांच्याइतकं नाही तर निदान त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर जरी आपल्याला चालता आलं तर स्वतःला धन्य समजू असं ते त्यांना वाटत असे ते म्हणत, "आपण मराठी पत्रकार ज्या टिळक-आगरकरांची व फुले आंबेडकरांची परंपरा मोठ्या अभिमानाने मिरवीत असतो ती सर्व माणसे सर्वार्थाने समर्थ व जीवनाचा समग्र वेध घेणारी होती. त्यांची पात्रताही मोठी होती. आपण निदान त्यांनी मळलेल्या वाटेने जाणारे वाटसरू बनलो तरी पुष्कळ झाले."
हेच त्यांच्या पत्रकारितेचं सार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)