भगतसिंह कोश्यारींच्या 'सेक्युलर' वाक्यावर अमित शाह यांची नाराजी

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर अमित शाह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यूज 18 या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीतील उत्तरावरून शाह यांची नाराजी दिसून येते.

या मुलाखतीतल अमित शाह यांनी शिवसेनेसोबतच्या राजकीय संबंधांबाबतही भाष्य केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पत्रव्यवहारादरम्यान वापरलेल्या भाषेवरून निर्माण झालेल्या वादावर अमित शाह यांनी आपलं मत मांडलं.

भगतसिंह कोश्यारी

फोटो स्रोत, Getty Images

हे पत्र आपण वाचलं असल्याचं शाह यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणतात, म्हणतात, "पासिंग रेफरन्स त्यांनीसुद्धा दिला आहे. पण मला वाटतं की कोश्यारी यांनी शब्दांची निवड टाळली असती तर बरं झालं असतं."

काय आहे संपूर्ण प्रकरण?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून 'मंदिरं का उघडली जात नाहीयेत,' असा प्रश्न विचारला होता.

मंदिर मुद्यावर राज्यपालांचं पत्र जसंच्या तसं:

'1 जूनला लोकांना उद्देशून केलेल्या भाषणात आपण "मिशन बिगिन अगेन" "पुन:श्च हरिओम" असं म्हणाला होतात. त्याचसोबत आता लॉकडाऊन हा शब्द नाही असं देखील तुम्ही म्हणाला होतात.

पण, दुर्दैवाने लोकांसमोर उद्देशून करण्यात आलेल्या भाषणाच्या चार महिन्यांनंतरही तुम्ही राज्यातील पार्थनास्थळांवरील बंद सुरू ठेवली आहे.

एकीकडे राज्य सरकारने राज्यातील बार, हॉटेल, बीच सुरू करण्यासाठी परवानगी दिली. दुसरीकडे राज्यातील देव मात्र अजूनही लॉकडाऊनमध्ये आहेत.

तुम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार करता. मात्र, मला असा प्रश्न पडतो की तुम्हाला दैवी पूर्वसूचना मिळाली आहे की काय, तुम्ही वेळोवेळी राज्यातील प्रार्थनास्थळं उघडणे पुढे ढकलता. का तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? ज्या शब्दाचा तुम्ही तिरस्कार करत होतात.'

भगतसिंह कोश्यारी, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, GOVERNOR OF MAHARASHTRA

उद्धव ठाकरेंच प्रत्युत्तर

या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्र लिहून उत्तर दिलं. आपल्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये असा सूर त्यांच्या पत्रात होता.

"माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसंच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्याचं हसत-खेळत घरात स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही," असं उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं.

"Have you suddenly turned 'Secular' yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे सेक्युलर असं आपलं म्हणणं आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा 'सेक्युलॅरिझम' आहे तो आपल्याला मान्य नाही का?" असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात विचारला.

शरद पवार यांचं नरेंद्र मोदींना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं होतं.

शरद पवार

फोटो स्रोत, NCP

दुर्दैवानं राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्राचा सूर एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला उद्देशून लिहिल्यासारखा आहे. राज्यघटनेमध्ये 'धर्मनिरपेक्ष' या शब्दाचा उल्लेख आहे, ज्याचा अर्थ सर्व धर्मांना समानतेनं वागवलं जाईल असा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घटनात्मक मूल्यांप्रमाणेच वागायला हवं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी आपापले विचार मांडण्यात काही गैर नाही, मात्र राज्यपालांनी पत्रात वापरलेली भाषा ही पदाला साजेशी नसल्याचं शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)