बिहार निवडणूक: देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत सुशांत सिंह राजपूतला न्याय देण्याबाबत घोषणाबाजी

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. 'सुशांतला न्याय द्या,' फडणवीसांच्या बिहारमधील सभेत घोषणाबाजी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा मुद्दा बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपस्थित होईल, असा अंदाज गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केला जात होता. शनिवारी भाजपच्या एका प्रचारसभेत हेच दिसून आलं.

या सभेला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सभेला उपस्थितांपैकी काही लोक सुशांतचे पोस्टर घेऊन आले. सुशांतला न्याय द्या, अशी त्यांनी घोषणाबाजी केली.

सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस सध्या बिहारमध्येच तळ ठोकून आहेत. भाजपकडून फडणवीस यांनाच बिहार निवडणुकीच्या प्रभारीपदी नेमण्यात आलं आहे. त्यामुळे फडणवीस भाजप आणि जनता दल(संयुक्त) यांच्या युतीसाठी प्रचारसभाही घेताना दिसत आहे.

फडणवीस यांनी गोपालगंज येथे भाजप उमेदवार सुभाष सिंह यांच्यासाठी एक प्रचारसभा आयोजित केली होती. सभेला प्रचंड गर्दी जमली. सभेला सुरुवात होताच काही लोकांनी सुशांत सिंह राजपूतचे पोस्टर उंचावून घोषणाबाजी सुरू केली.

सुशांतला न्याय द्या, अशी घोषणाबाजी लोक करू लागले. हे पाहून फडणवीस व्यासपीठावर उभे राहिले. त्यांनी सर्वांसमोर हात जोडले. यानंतर काहीही न बोलता ते पुन्हा खाली बसले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. राज्य चालवणं येड्या-गबाळ्याचं काम नाही - रावसाहेब दानवे

कोरोना व्हायरस साथीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी राज्याचे दौरे करून जनतेला दिलासा देणं महत्त्वाचं असतं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'मी आणि माझं कुटुंब' म्हणत घरात बसून आहेत. राज्य चालवणं हे काय येड्या-गबाळ्याचं काम नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

पैठण शहरात आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी दानवे बोलत होते.

"राज्यात सरकार कोण चालवतं, निर्णय कोण घेतं, ते कळतच नाही. संकटकाळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते राज्यभर दौरे करत आहेत. पण राज्याचे प्रमुख 'मी आणि माझं कुटुंब' म्हणत घरात बसून आहेत, हे राज्याचं दुर्दैव आहे," असं दानवे म्हणाले. ही बातमी दैनिक लोकमतने दिली आहे.

3. बॉलीवूडमधील खलनायकांची खबर घ्यावीच लागेल - गृहमंत्री

बॉलीवूडवर सरसकट आरोप करणं चुकीचं आहे. पण काही जणांचा ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. नायक आणि खलनायक यांच्यात फरक करून खलनायकांची खबर घ्यावीच लागेल, असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं.

महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुख बोलत होते. "बॉलीवूडमधील काहीजण अंमली पदार्थ्यांच्या आहारी गेल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. या अपप्रवृत्तींचं समर्थन करण्याचा प्रश्नच नाही.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस वाईट प्रवृत्तींचा योग्य समाचार घेतील. मात्र, फक्त काही जणांच्या चुकीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीला बदनाम करणं योग्य नाही," अशी भूमिका देशमुख यांनी मांडली.

4. मनसेच्या इशाऱ्यानंतर फ्लिपकार्टचा सकारात्मक प्रतिसाद

मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिल्यानंतर त्याला फ्लिपकार्ट कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. फ्लिपकार्टवर सध्या उपलब्ध असलेल्या भाषांसह इतर भाषांमध्येही अॅप उपलब्ध असेल.

भारतात विविध भागात पोहोचण्यासाठी विविध भाषा आणि व्हॉइस सॉल्यूशनचा वापर येईल, अशी माहिती फ्लिपकार्टच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन कार्यालयांना भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी हे अॅप मराठीत का नाही, याचा जाब विचारला होता. तसंच सात दिवसांत अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला नाही, तर दिवाळी मनसे स्टाईल होईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

यानंतर फ्लिपकार्टकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला. "फ्लिपकार्ट ही पूर्णपणे स्वदेशी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेली कंपनी आहे. ग्राहकांना नवनवीन आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. ई-कॉमर्स सर्वदूर पोहोचवण्यासाठी या उद्योगात लोकशाहीप्रमाणे काम करण्यास कटिबद्ध आहोत.

मातृभाषेच्या वापरामुळे मोठ्या संख्येने ग्राहक आकर्षित होतील, लघु-मध्यम उद्योजक आणि कारागिरांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल," असं फ्लिपकार्टच्या प्रवक्त्यांनी म्हटलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

5. 'यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी'

"कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी," अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पाटील यांनी ट्वीट करून याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. "न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणं आवश्यक होतं. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपाची मागणी आहे.

यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचं आहे. आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात," अशी टीकाही पाटील यांनी केली. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)