कोरोना व्हायरस : रेमडेसिव्हिरच्या वापराने कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होत आहे का?

औषध
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

कोरोना व्हायरस विरोधात कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी कोव्हिड-19 विरोधातल्या लढाईत रेमडेसिव्हिर डॉक्टरांच्या हातात असलेलं एकमेव शस्त्र मानलं जात आहे. पण, कोरोना व्हायरस विरोधातील युद्धात हे शस्त्र देखील निकामी ठरतंय. डॉक्टरांच्या हाती असलेली ही रेमडेसिव्हिर नावाची ढाल कोव्हिड-19 ला रोखण्यास असमर्थ असल्याचं दिसून आलं आहे.

जगभरात मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्तांवर रेमडेसिव्हिरच्या मदतीने उपचार केले जात आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिव्हिरचा वापर कोव्हिड-19 मुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी होतो का, यावर अभ्यास केला होता.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासातील निष्कर्ष

  • रेमडेसिव्हिरमुळे कोव्हिडग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होत नाही.
  • रुग्णालयातील उपचाराचे दिवस कमी होत नाहीत.
  • रेमडेसिव्हिर दिल्यानंतर व्हॅन्टिलेटरची गरज भासणं कमी झालं नाही.

(स्रोत-जागतिक आरोग्य संघटना)

रेमडेसिव्हिर सोबतच WHOने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, लोपिनाविर आणि इंटरफेरॉन या औषधांचाही अभ्यास केला. फेब्रुवारी महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या 'कोव्हिड-19 रिसर्च फोरम'ने यावर अभ्यास करण्याची शिफारस केली होती.

रेमडेसिव्हिरची ट्रायल

  • जगभरातील 30 देशात ट्रायल घेण्यात आली.
  • जगभरातील 405 रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांवर अभ्यास.
  • 11,266 प्रौढांना ट्रायलसाठी निवडण्यात आलं.
  • यापैकी 2,750 रुग्णांना रेमडेसिव्हिर देण्यात आलं

जागातिक आरोग्य संघटनेचा रेमडेसिव्हिरबाबतचा ट्रायल रिपोर्ट "MedRvix" नावाच्या प्री-प्रिंट जर्नलमध्ये छापण्यात आला आहे. या अभ्यासाचा अजून पिअर-रिव्हू होणं बाकी आहे.

रेमडेसिव्हिर

फोटो स्रोत, ALLAN CARVALHO/NURPHOTO VIA GETTY IMAGES

ICMR काय म्हणतंय?

रेमडेसिव्हिरच्या ट्रायलविषयी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

त्यात ICMRचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे की, "रेमडेसिव्हिरच्या ट्रायलसाठी चार औषधांची चाचणी करण्यात आली. मात्र, अंतरिम निष्कर्षानुसार कोणत्याही औषधाने मृत्यूदर कमी होत नाही किंवा रुग्णालयात दाखल रुग्णांना व्हॅन्टिलेटरची गरज भासणं कमी होत नाही" ICMR च्या माहितीनुसार, ट्रायलच्या निष्कर्षानंतर इंटरफेरॉनची चाचणी थांबवण्यात आली आहे. मात्र निष्कर्ष अजूनही अचूक करण्यासाठी रॅमडेसिव्हिरची ट्रायल सुरू ठेवण्यात येणार आहे. चांगली उपचारपद्धत विकसीत करण्यासाठी चाचणी सुरू ठेवण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र सरकारची भूमिका

भारतामध्येही डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिरचा वापर कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांसाठी केला जातोय. महाराष्ट्रात मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा त्रास असलेल्यांना रेमडेसिव्हिर औषध दिलं जातं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासाचा महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करणार का? याबाबत बीबीसीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याची चर्चा केली.

बीबीसीशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात रेमडेसिव्हिरमुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होत नसल्याचं स्पष्ट झालंय. राज्यातही मोठ्या संख्येने कोव्हिड-19 रुग्णांना रेमडेसिव्हिर दिलं जातंय. त्यामुळे, महाराष्ट्र सरकार या रिपोर्टचा निश्चित अभ्यास करेल. हा रिपोर्ट फार गांभीर्याने पहावा लागेल.

"कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य सरकारला कोरोनाग्रस्तांच्या ट्रीटमेंटबाबतच्या प्रोटोकॉलची शिफारस करतात. त्यामुळे WHO च्या रिपोर्टबाबत त्यांच्याशी चर्चा करून सल्ला घेतला जाईल. टास्कफोर्सच्या डॉक्टरांकडून याबाबत पुढे काय करायचं याची माहिती घेऊन पुढे उपचारपद्धतीबाबत निर्णय घेतला जाईल."

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोव्हिड-19 रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिव्हिरचा वापर केला जातोय. रेमडेसिव्हिरची मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाल्याने तुटवडा भासतोय. राज्य सरकारने रेमडेसिव्हिर लोकांना कमी किंमतीत उपलब्ध व्हावं यासाठी याचा दर 2,360 रूपये निश्चित केला आहे.

सद्यस्थितीत रुग्ण आणि नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिरची मागणी होतेय. त्या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असल्याचं आरोग्यमंत्र्यांचं मत आहे.

कोरोना औषध

फोटो स्रोत, Getty Images

टास्कफोर्सचे डॉक्टर काय म्हणतात?

महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर देण्यात येत असल्याने याची मागणी मोठी आहे. मागणी वाढल्याने तुटवडा भासू लागला आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासाचा कोरोनाग्रस्तांच्या उपचारांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

याबाबत बीबीसीशी बोलताना फोर्टिस रुग्णालयाच्या इंटेन्सिव्ह केअर विभागाचे प्रमुख आणि राज्य सरकारच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडीत म्हणाले, "जागतिक आरोग्य संघटनेच्या ट्रायलमध्ये स्पष्ट झालंय की रेमडेसिव्हिरच्या वापरामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होत नाही. तीव्र स्वरूपाचा आजार असलेल्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचं या अभ्यासात दिसून आलं नाही. त्यामुळे आता गंभीर स्वरूपाचा आजार असलेल्यांना रेमडेसिव्हिर द्यायचं का अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रेमडेसिव्हिरच्या वापरात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही."

रुग्णांना रेमडेसिव्हिर दिल्यानंतरचा तुमचा अनुभव कसा आहे. याबाबत बोलताना डॉ. राहुल पंडीत म्हणतात, "रेमडेसिव्हिर सद्यस्थितीत गंभीर रुग्णांना दिलं जात आहे. आता याचाही फायदा होत नसल्याचं स्पष्ट झालंय. कोरोनावर सद्यस्थितीत औषध नाही किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर स्वरूपाचा आजार असलेल्यांना रेमडेसिव्हिर देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जितक्या लवकर रुग्णांना औषध मिळेल तितका फायदा जास्त होईल. त्यामुळे भारतातही रेमडेसिव्हिरच्या वापराबाबतची माहिती एकत्र करून अभ्यास करायला हवा."

कोरोना
कोरोना

महाराष्ट्रात रेमडेसिव्हिरचा वापर

राज्यात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून डॉक्टरांनी कोरोनाग्रस्तांना रेमडेसिव्हिर देणं सुरू केलं. राज्य सरकारने बॉम्बे हायकोर्टात सादर केलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 2 लाख रेमडेसिव्हिर इंजेक्शन वितरित करण्यात आली.

रेमडेसिव्हिर वापरणाऱ्या डॉक्टरांचं मत

रेमडेसिव्हिरचा रुग्णांना फायदा होतो का? याबाबत बीबीसीशी बोलताना पिंपरी-चिंचवडच्या कोव्हिड सेंटरचे प्रमुख डॉ. संग्राम कपाले म्हणतात, "रेमडेसिव्हिरचा आत्तापर्यंचा अनुभव चांगला आहे. योग्य वेळेत रुग्णांना रेमडेसिव्हिर दिल्याने याचा फायदा झाल्याचं दिसून आलं आहे. आत्तापर्यंत 500 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमडेसिव्हिर देण्यात आलंय. रेमडेसिव्हिर देण्यात आलेले अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत."

डॉ. संग्राम यांच्या मते, रेमडेसिव्हिर रुग्णांना केव्हा देण्यात येतं हे फार महत्त्वाचं आहे.

ते सांगतात, "कोव्हिड-19 ची लक्षणं दिसून आल्यानंतर पहिल्या सात दिवसांच्या आत रेमडेसिव्हिरचा डोस दिला तर याचा फायदा होतो. दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सेकंड स्टेजमध्ये रुग्णाला रेमडेसिव्हिर दिल्यास त्याचा काही फायदा होत नाही. याचं कारण म्हणजे शरीरात व्हायरस मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. त्यामुळे सरकारने रेमडेसिव्हिर योग्य पद्धतीने वापरण्याबाबत प्रोटोकॉल तयार केला पाहिजे."

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टमध्येही रेमडेसिव्हिरमुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होत नाही असंच स्पष्ट झालं आहे, असं डॉ. संग्राम पुढे म्हणतात.

रेमडेसिव्हिरच्या वापराबाबत पुण्यात कोव्हिड रुग्णांवर उपचार करणारे इमर्जन्सी मेडिसिन फिजीशिअन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. सुजय पाटील म्हणतात, "काही रुग्णांव्यक्तिरिक्त इतरांना रेमडेसिव्हिर दिल्याने त्यांची परिस्थिती सुधारण्यास आणि मृत्यूदर कमी होण्यास नक्कीच मदत होते. रेमडेसिव्हिरसोबत इतरही औषधं दिली जातात. या दोन्हीचा एकत्र परिणाम चांगला असल्याने रेमडेसिव्हिर न वापरण्यापेक्षा रुग्णाला फायदा होत असेल तर नक्की वापरलं जावं. कोरोनाग्रस्तांच्या उपचारात रेमडेसिव्हिर एक हेल्पिंग हॅंड नक्कीच आहे.

"रेमडेसिव्हिर दिल्याने रुग्णांना मोठी हानी झाल्याचं दिसून आलं नाही. याचा फायदा होतो का नाही यावर विविध मतं असू शकतात. पण, रुग्णाचा तब्येत खराब होणार असेल तर रेमडेसिव्हिरचा पर्याय म्हणून नक्की विचार केला गेला पाहिजे. फक्त याचा वापर योग्य परिस्थितीत आणि विशिष्ट रुग्णांवर वापर करण्यात यावा. हल्ली ओपीडीत, घरी देखील रुग्ण रेमडेसिव्हिर घेतात. हा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने खबरदारी घेतली पाहिजे."

रुग्णांना रेमडेसिव्हिर देण्याचा तुमचा अनुभव काय, याबाबत डॉ. सुजय सांगतात, "आत्तापर्यंत मी 150 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांना रेमडेसिव्हिर दिलं आहे. अनेकांच्या लवकर रिकव्हरीमध्ये आणि मृत्यूदर कमी होण्यात याचा फायदा झाल्याचं दिसून आलं आहे."

काय आहे रेमडेसिव्हिर?

रेमडेसिव्हिर एक अँटी-व्हायरल म्हणजेच व्हायरस विरोधातील औषध आहे. 2014 मध्ये अफ्रिकेत आढळून येणाऱ्या 'इबोला' आजारावर रेमडेसिव्हिर प्रभावी असल्याचं दिसून आलं. तज्ज्ञांच्या मते, शरीरातील 'व्हायरल लोड' म्हणजे शरीरातील व्हायरसचं प्रमाण किंवा संख्या कमी करण्यासाठी रेमडेसिव्हिरचा फायदा होतो.

कोरोनाविरोधात लस किंवा औषध नसल्याने याचा जगभरात वापर सुरू झाला. रेमडेसिव्हिरमुळे कोरोनाग्रस्तांच्या शरीरात कोरोना व्हायरसला वाढण्यापासून प्रतिबंध होतो आणि शरीरातील व्हायरसची संख्या कमी होण्यास मदत होते. यासाठी याचा वापर सुरू झाला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)