प्रकाश आंबेडकर यांची उदयनराजे भोसलेंवर जहरी टीका, म्हणाले 'एक राजा बिनडोक आहे'

मराठा आरक्षणावर विविध मराठा संघटना बैठका घेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीने 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची भूमिका घेतली आहे. या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देत असताना त्यांनी उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली आहे.
"दोन्ही राजांचा बंदला पाठींबा दिला आहे असे कुठेही माझ्या वाचनात आले नाही. एक राजा बिनडोक आहे, ज्या माणसाला घटना माहीत नाही ते मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर सर्व आरक्षण रद्द करा असे वक्तव्य करतात. अशा माणसाला भाजपाने राज्यसभेत कसं पाठवलं हा प्रश्न आहे," असं प्रकाश आंबेडकर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले
तर संभाजीराजे यांनी भूमिका घेतली परंतु ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर जास्त लक्ष देत आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.
10 ऑक्टोबरच्या बंदला वंचितचा पाठिंबा
10 तारखेला मराठा आरक्षण संघर्ष समितीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी संपर्क करून बंदला पाठींबा देण्याची विनंती केली. वंचितने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे बंदलादेखील पाठिंबा देत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितलं.
परंतु ओबीसी आरक्षण वेगळं आहे आणि मराठा आरक्षण वेगळं आहे. त्यामुळे ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मागणी होणार नाही याची दक्षता घ्यावी असं पाटील यांना कळवलं असल्याचंही आंबेडकर म्हणाले.
'...तर राज्याचे सामंजस्य बिघडण्याची शक्यता'
शासनाकडून मराठा आरक्षणाला फाटे फोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे विविध मराठा संघटनांमध्ये कलह होण्याची शक्यता आहे. या संघटनांमधील कोणीतरी अग्रेसिव्ह भूमिका घेऊन राज्याचं सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे, असा जावाही आंबेडकरांनी केला आहे.
तसंच एमपीएससीची परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असेल तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असंही मत आंबेडकर यांनी मांडलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








