मराठा आरक्षण : उदयनराजे आणि संभाजीराजे यांचं पटत नाहीये का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात आंदोलनं सुरू झाली. मराठा समाजाच्या नेत्यांनी राज्यव्यापी बैठका आयोजित करणं सुरू केलं. या सर्व घडामोडींमध्ये खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे यांच्या भूमिकांची चर्चा होतेय.
खरंतर विविध बैठकांना दोन्ही राजे उपस्थित राहतात. पण ज्या ठिकाणी संभाजीराजे उपस्थित राहतात, त्या ठिकाणी उदयनराजे उपस्थित राहत नाहीत.
7 ऑक्टोबरला माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईला आयोजित केलेल्या बैठकीत दोन्ही राजेंना आमंत्रित केले होते. खासदार संभाजीराजे या बैठकीला उपस्थित राहिले. पण उदयनराजेंनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

फोटो स्रोत, Twitter/@YuvrajSambhaji
याउलट खासदार उदयनराजे यांनी हे बैठकीला येण्याऐवजी नाशिकला कामानिमित्त गेल्याचं सांगण्यात आलं. छत्रपती उदयनराजे हे लवकरच मराठा समाजाच्या राज्यस्तरीय आंदोलनाची घोषणा करणार असल्याची चर्चा आहे.
त्याआधी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत संभाजीराजे उपस्थित होते, पण उदयनराजे मात्र अनुपस्थित होते.
उदयनराजे यांनी साताऱ्यात बैठका बोलावल्याच्या चर्चा सुद्धा झाल्या.
नाशिकमध्ये झालेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला संभाजीराजे उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांनी उदयनराजे यांची बहीण मनिषाराजे यांची भेट घेतली. या भेटीचे विविध अर्थ काढण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाच्या या लढ्याचं नेतृत्व कुणी करावं यावरूनही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. खासदार संभाजी राजे यांनी या लढ्याचं नेतृत्व करावं अशी मागणी होतेय. तर दुसरीकडे खासदार उदयनराजे यांनी या लढ्याचं नेतृत्व करावं असा सूर देखील उमटतो आहे.
यावर साताऱ्याची आणि कोल्हापूरची गादी एकच असल्याचं सांगत माध्यमांसह इतरांनी हे लक्षात घ्यावं आम्ही एकच आहोत असं संभाजीराजे यांनी म्हटलंय. मला या मोहीमेचं नेतृत्व नको, मोहीम द्या मोहीम फत्ते करून दाखवणार असं त्यांनी त्याबाबत बोलून दाखवलंय.
दोन्ही राजेंची भूमिका एक असली तरी ते एकत्र येणं का टाळतात? यामुळे मराठा समाज विविध गटांमध्ये विभागला जातोय का? वेगवेगळ्या भूमिकांमुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटेल का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
एकत्र येणं टाळतात?
मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर जातीनिहाय आरक्षण रद्द करून आर्थिक निकषांवर आरक्षण लागू करा असं मत उदयनराजे यांनी व्यक्त केलं होतं. तर दुसरीकडे सरकार दखल घेण्यात कमी पडत असेल तर लढावं लागेल असा इशारा संभाजीराजे यांनी दिला होता.
यानंतर उदयनराजे यांनी मराठा नेत्यांशी चर्चा केली तर संभाजीराजे विविध बैठकांना उपस्थित राहीलेले पाहायला मिळालं.
3 ऑक्टोबरला शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावर पुण्यात विचार मंथन आयोजित केलं होतं. या बैठकीत 25 ठराव पारित करण्यात आले. या बैठकीला विनायक मेटे यांनी खासदार उदयनराजे, शिवेंद्रराजे आणि खासदार संभाजीराजे यांना आमंत्रित केलं होतं. पण हे राजे मेटेंच्या या बैठकीला अनुपस्थित राहिले.

फोटो स्रोत, Twitter/@Chh_Udayanraje
विनायक मेटे त्यावेळी बोलताना म्हणाले "मी स्वतः उदयनराजे यांना आमंत्रित केलं होतं. ते का आले नाहीत, हे माहिती नाही. त्यांना काही अडचणी आल्या असतील किंवा आणल्या गेल्या असतील. पण ते लवकरच साताऱ्यात बैठक घेणार आहेत".
नवी मुंबईत नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यासपीठावर छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे या दोघांसाठी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. संभाजीराजे या बैठकीला पोहोचले, पण उदयनराजेंची अनुउपस्थितीची चर्चा झाली.
जेष्ठ पत्रकार श्रीमंत माने याबाबत बोलताना म्हणाले, "दोन्ही राजांचे वेगळे स्वभाव आहेत. संभाजीराजे हे कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात असतात. लोकांमध्ये रमतात. उदयनराजेंची काम करण्याची पद्धत यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे ते फार प्रसारमाध्यमांमधली चर्चा टाळण्यासाठी काही मोजक्याच ठिकाणी हजेरी लावतात. त्यामुळे उदयनराजे यांना संभाजीराजे नको आहेत असं वाटत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
याउलट जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच मत आहे. ते म्हणतात "या दोन्ही राजांनी एकत्र यावं किंवा एकमेकांना टाळावं इतकी त्यांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका गंभीर आहे असं वाटत नाही. त्यांच्या भूमिकांमुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात काय फरक पडणार आहे? या दोन्ही नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्याच्या मुळाशी जाऊन गोष्टी समजूत घेऊन काही केल्याचं दिसत नाही. त्यामुळे आताच्या बैठकांना राजकीय किनार आहे"
मुद्दा एक भूमिका अनेक?
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भक्कमपणे न्यायालयीन लढाई लढू अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. मराठ्यांना आरक्षण मिळत नसेल तर जातीनिहाय आरक्षण न देता आर्थिक निकषांवर आरक्षण लागू करा, असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं
तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी "मराठा समाजाला 'एसईबीसी' (SEBC) अंतर्गत आरक्षण मिळणं शक्य नाही त्यामुळे इडब्ल्यूएस (EWS) अंतर्गत जे मिळतय ते पदरात पाडून घ्यावं" असं म्हटलंय.

फोटो स्रोत, Twitter/@Chh_Udayanraje
या अनेक भूमिकांमुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटेल का? जेष्ठ पत्रकार श्रीमंत माने म्हणतात, "मराठा आरक्षणाबाबत तीन वेगवेगळे मत प्रवाह आहेत. काहींना एसईबीसी अंतर्गत मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण हवे आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या गटाला 'इडब्ल्यूएस' (EWS) मध्ये आरक्षण मिळतय ते घ्यावं असं वाटतय. तर काहींना ओबीसींमध्ये रूपांतर करून आरक्षण द्यावं असं वाटत. हा मुद्दा आता राजकीय भांडवल बनला आहे."

फोटो स्रोत, Twitter/@YuvrajSambhaji
मराठा आरक्षाचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे नेत्यांच्या काहीही भूमिका असल्या तरी त्याचा फायदा होणार आहे का? यावर जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणतात, "सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. यापुढे हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसं टिकणार किंवा ते टिकलं नाही तर हे प्रश्न समोर असताना राज्यभरात जी आंदोलनं मराठा प्रस्थापित नेत्यांनी सुरू केली त्याला राजकारणा पलिकडे अर्थ नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








