मराठा आरक्षण : विवेक रहाडेची सुसाईड नोट बनावट? आत्महत्या प्रकरणावरून निर्माण झालेला वाद नेमका काय?

फोटो स्रोत, @dhananjay_munde
- Author, हर्षल आकुडे आणि शशी केवडकर
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा वाद एकीकडे पेटलेला असताना बीडच्या केतूर गावात विवेक कल्याण रहाडे या 18 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती.
पाठोपाठ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपण आत्महत्या करत असल्याबाबत उल्लेख असलेली विवेकची कथित सुसाइड नोटही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
यावरून राज्यात खळबळ माजलेली असतानाच ती सुसाइड नोट विवेकने लिहिलेली नसून बनावट असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालानुसार, सुसाईड नोट विवेकने लिहिलेली नव्हती, असं सांगत या प्रकरणाचा संबंध मराठा आरक्षण आंदोलनाशी जोडून सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या हे कृत्य करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण, आता या प्रकरणावरून विवेकच्या नातेवाईकांमध्ये नाराजी असून आम्ही मुलगा गमावल्याने दुःखात असताना पोलिसांनी यात नवा वाद निर्माण केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
विवेकची कथित सुसाईड नोट
विवेकच्या आत्महत्येनंतर एक सुसाइड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
यामध्ये 'मी विवेक कल्याण राहाडे एक कष्टकरी आणि गरिब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मी आताच नीट मेडिकलची परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याची ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलाची किव येईल आणि माझे मरण सार्थक होईल' असा मजकूर लिहिला होता.

ही सुसाइड नोट व्हायरल होताच राज्यातून याबाबत अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेक दिग्गज नेत्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं. पार्थ पवार यांनी तर मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करू, अशी भूमिका घेतली होती.
'सुसाईड नोट बनावट'
बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून याप्रकरणी सविस्तर माहिती दिली आहे.
ते सांगतात, "बीड तालुक्यातील केतूर गावात राहणाऱ्या विवेक राहाडे या 18 वर्षीय तरुणाने 30 सप्टेंबर रोजी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मनाला वेदना देणारा आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नातेवाईकांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला. मृताच्या कपड्यांची तपासणी केली. तसंच त्यावेळी आजूबाजूचा परिसर तपासण्यात आला. त्यावेळी पोलिसांना काहीही आक्षेपार्ह आढळून आलं नाही. त्यानंतर बीडच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. त्यामध्ये गळफास घेतल्याने मृत्यू असं कारण निष्पन्न झालं आहे.
"दरम्यान, कुणीतरी खोडसाळपणाने रजिस्टरमधील चिठ्ठी पोलिसांसमोर न आणता थेट सोशल मीडियावर पोस्ट केली. हे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी घराची तपासणी करून सदर रजिस्टर जप्त केलं. त्या रजिस्टरमधील एका पानावर वरील आशयाचा कथित सुसाईड नोटचा मजकूर लिहिलेला होता."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"त्यानंतर पोलिसांनी विवेकने ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतलं, तेथील उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्या. या सगळ्या गोष्टी हस्ताक्षर परिक्षणासाठी औरंगाबादला तज्ज्ञांकडे पाठवण्यात आल्या. सुसाईड नोटमधील हस्ताक्षर आणि उत्तरपत्रिकांमधील विवेकचं हस्ताक्षर जुळत नसल्याचा अहवाल हस्ताक्षरतज्ज्ञांनी दिला आहे."
"या घटनेला वेगळं स्वरूप देण्याच्या दुष्ट हेतूने अज्ञात व्यक्तीने विवेक वापरत असलेल्या रजिस्टरमध्ये वरील मजकूर लिहून बनावट दस्तऐवज बनवले. तो मजकूर विवेकने लिहिला आहे, असं दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या हेतूने हा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे सदर प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी यांनी दिली आहे.
'आमचं लेकरू जीवानिशी गेलं, सरकार आत्महत्येला खोटं ठरवण्याच्या प्रयत्नात'
याप्रकरणी, विवेकचे मामा नाना तळेकर यांच्याशीही बीबीसी मराठीने बातचीत केली. चर्चेदरम्यान नातेवाईकांचा रोष स्पष्टपणे दिसून आला.
"आमचं लेकरू जीवानिशी गेलं, मात्र सरकार आमच्या लेकराच्या आत्महत्येलाच खोटं ठरविण्यात कामाला लागलं आहे. या दोन दिवसात आमच्या घरावर कोण कोण येतं यावर पाळत ठेवली आहे. आम्ही कोणालाही दोषी मानत नाही, आम्ही कुणाला नुकसानभरपाईसुद्धा मागितलेली नाही. आमचं हुशार लेकरू गेलं, जीवनात त्याला काही तरी करून दाखवायचं होतं. मात्र ते नशीबाला मान्य नसावं."
"मोठी बहीण आरक्षण कोट्यातून मेडिकलला लागली होती, यालाही चांगले मार्क पडले होते, CETला मात्र स्पर्धा खूप असते. आरक्षण असतं तर नक्कीच नंबर लागला असता, अशी त्याची भावना होती. मात्र, आरक्षण वर स्थगिती आल्यापासून तो अस्वस्थ होता. ही आत्महत्या आरक्षणासाठी नव्हती, असं दर्शवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आमच्या मुलाचं व्हायचं ते झालं, पण इतर कुणाचं असं होऊ नये, अशीच आमची भूमिका आहे," असं नाना तळेकर म्हणाले.
'प्रकरणाचा तपास व्हावा, पण आरक्षणाची मागणी ही वस्तुस्थिती'
विवेक रहाडे यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट आहे. त्याच्या सुसाईड नोटवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं असेल तर पोलिसांनी त्याबाबत तपास करावा, पण मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही वस्तुस्थिती आहे, असं मत विधान परिषद आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केलं.

फोटो स्रोत, Getty Images
विनायक मेटे यांच्या मते, "विवेकच्या बहिणीचं गेल्यावर्षी SEBC गटातून अॅडमिशन झालं होतं. पण आत्ता मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर त्याच्या मनात याबाबत दडपण असण्याची शक्यता आहे. हस्ताक्षर जुळत नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पण या प्रकरणाचा तपास करत असताना आत्महत्येचं कारण, तसंत हे कृत्य कुणी केलं याचा योग्य प्रकारे शोध घ्यावा."
"दुसरीकडे, सुसाईड नोट चुकीची आहे म्हणून आरक्षणाची मागणी नाही, असा समज कुणी करून घेऊ नये. आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर आपली आर्थिक स्थिती नाही, त्यामुळे शिक्षणाचं काय होईल, अशी भीती मराठा विद्यार्थ्यांमध्ये आहे. आजही अनेक विद्यार्थी मला फोन, मॅसेज करून याबाबत सांगतात. ते प्रचंड तणावाखाली आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे."
'मराठा समाजात अस्वस्थता, पण वार्तांकन करताना घाई नको'
महाराष्ट्र टाईम्सचे वरीष्ठ सह-संपादक प्रमोद माने यांच्याशी बीबीसीने बातचीत केली. 'मराठा समाजात अस्वस्थता आहे, हे नक्की. पण हा विषय संवेदनशील असल्याने वार्तांकन करताना माध्यमांनी घाई करू नये, असं मत माने नोंदवतात.

फोटो स्रोत, Getty Images
प्रमोद माने सांगतात, "विवेक रहाडे आत्महत्या प्रकरणानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी याबाबत ट्विट केले होते. सुसाईड नोटवरून घाईघाईने वृत्तांकन झालं. पण हे टाळता आलं असतं. पोलिसांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न कुणीच त्यावेळी केला नाही. अशा प्रकरणांमध्ये FIR मध्ये काय लिहिलंय, हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं असतं."
"मराठा समाजातील गरीब वर्गाला खरोखरच आरक्षणाची गरज आहे. स्थगिती मिळाल्यापासून गरीब मराठा विद्यार्थ्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पण सध्याच्या वातावरणात आरक्षणाच्या बातम्या येत असताना त्याबाबत वार्तांकन करण्याची घाई करू नये.
हा विषय मुळातच संवेदनशील आहे आणि न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणत्याही घटनेचा खटल्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुनावणी सुरू असेपर्यंत आपण सर्वांनी संयम बाळगण्याची गरज आहे," असंही माने यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








