You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हाथरस: 'आई-वडिलांनी आपल्या तरुण मुलींना संस्कारी बनवलं तर बलात्कार थांबतील' #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. मुलींवर संस्कार नसल्यानंच बलात्कार - भाजप आमदार
मुलींवर संस्कार नसल्यानं बलात्काराच्या घटनांत वाढ होत आहे, असं उत्तर प्रदेशातील बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
"आपल्या तरुणी मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत," असंही त्यांनी म्हटलं आहे.
"आपल्या तरुण मुलींवर संस्कार करणं हा सर्वांचा धर्म आहे. माझा धर्म आहे, सरकारचा धर्म आहे. परंतु, कुटुंबाचाही हा धर्म आहे. जिथे सरकारचा धर्म संरक्षण करण्याचा आहे. तिथं मुलांना संस्कार देणं हा कुटुंबांचा धर्म आहे. सरकार आणि संस्कार मिळून देशाला सुंदर रुप देऊ शकतात. त्यासाठी दुसरं कुणीही समोर येणार नाही," असंही त्यांनी म्हटलंय.
2. योगीजींच्या राज्यात महिला पोलीस नाही का? - संजय राऊत यांचा सवाल
हाथरस येथील कथित बलात्काराच्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी निघाल्या होत्या. यावेळी युपी पोलिसांनी प्रियंका गांधींसोबत गैरवर्तन केल्याचा दावा करणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्ली आणि नोएडा फ्लाय ओव्हरवर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केली. त्यावेळी प्रियांका गांधी स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि लाठीचार्ज रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक पोलीस कर्मचारी प्रियंका गांधी यांना रोखण्यासाठी त्यांचा कुर्ता खेचताना दिसत आहे. या प्रकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून याविरोधात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिलीय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्वीट करत म्हटलं की, योगीजींच्या राज्यात महिला पोलीस नाहीत का?
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं, "याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही."
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करत म्हटलं, "भाजपावालो, करारा जवाब मिलेगा."
3. मराठा आरक्षणासाठी राजा म्हणून नाही तर सेवक होऊन लढणार - संभाजीराजे छत्रपती
मराठा आरक्षणासाठी राजा म्हणून नाही तर समाजाचा सेवक म्हणून शेवटपर्यंत लढणार, असं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजित संघर्ष यात्रेच्या प्रसंगी ते बोलत होते.
संभाजीराजे पुढे म्हणाले, "मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत योग्यपणानं लावून धरू. यासाठी सगळ्याच मराठी नेत्यांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरावा. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहेत."
4. मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही : पीयूष गोयल
मुंबई लोकल सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला अजून कोणतीही मागणी आली नसल्याचं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्यातील गैरसमज दूर करण्यासाठी पीयूष गोयल यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुंबई लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
त्यावर ते म्हणाले, " मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा अजून कोणताही प्रस्ताव आला नाही. जोपर्यंत राज्यसरकार प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही."
दरम्यान, मुंबई लोकल 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू करू, असं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.
5. कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान
आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी नवीन कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.
संसदेत नुकतीच पारित करण्यात आलेली कृषी विधेयकं ही भेदभाव करणारी आणि मनमानी पद्धतीनं लादल्याचं झा यांनी म्हटलं आहे.
या कायद्यामुळे शेतकरी मोठमोठ्या उद्योगपतींचे गुलाम बनतील, असं त्यांचं म्हणणं आहे.
या तीन कायद्यांविरोधात यापूर्वी काँग्रेसचे केरळचे खासदार टीएन प्रथापन आणि तामिळनाडूमधील डीएमकेचे सासदार त्रिची शिवा सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)