हाथरस बलात्कार: योगी आदित्यनाथांनी जंगलराज थांबवावे अनिल देशमुखांची टीका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या राज्यांना सल्ले देत बसले आहेत. यापेक्षा त्यांनी त्यांच्या राज्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करावं आणि जंगलराजवर कडक कारवाई करावी असा सल्ला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आदित्यनाथांना दिला आहे.

"योगी आदित्यनाथ यांचं सरकार अमानवी आहे. कुटुंबीयांच्या गैरहजेरीत मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे वागणं अमानवी आणि दुर्देवी आहे. मुलींना जिवंतपणी सन्मान मिळतो ना मेल्यानंतर. योगी आदित्यनाथ वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात. केवळ महाराजांचं नाव घेण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना न्याय, सन्मान आणि समतेचं राज्य निर्माण करता येत नसेल तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही", असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

"उत्तर प्रदेशमध्ये आता कायद्याचं राज्य राहिलेलं नाही तर योगींच्या खास लोकांचं राज्य आलं आहे. योगी हे महाराज आहेत परंतु राज्य राजासारखं चालवत असून हे लोकशाहीला घातक आहे", अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपतींना याप्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. "हाथरस घटनेतील पीडितेवर पोलिसांनी कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत परस्पर अंत्यसंस्कार केले. या भयंकर घटनेमुळे देशभरात चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत", अशी विनंती करणारे पत्र शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे.

"आरोपींना जामीन मिळू नये, न्यायालयीन कार्यवाहीसाठी अनुभवी आणि कार्यक्षम सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, पुरेसे आणि योग्य पुरावे सादर करण्यात यावेत, न्यायालयात आरोपपत्र वेळीच दाखल करण्यात यावे, साक्षीदारांना पोलीस संरक्षण मिळावे, आरोपींना फाशी व्हावी यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आपल्या वकिलांना कायदेशीर मदत द्यावी", अशा मागण्या नीलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत.

"योगीजी तुम्हीही एका महिलेच्या पोटातून जन्म घेतला आहे. तुम्हाला इतरांच्या बहिणीमुलींना आपली बहीण-मुलगी मानायला हवं. तुम्ही त्यांचं संरक्षण करू शकत नसाल तर तुम्ही या पदापासून स्वत:च दूर व्हायला हवं.

तुम्ही स्वत:च राजीनामा द्यायला हवा. माझा 99 टक्के नाही तर शंभर टक्के विश्वास आहे की सध्याचे उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तुम्ही करू शकत नसाल तर इथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. उत्तर प्रदेशच्या जनतेवर दया करा", असं उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा अध्यक्ष मायावती यांनी म्हटलं आहे.

त्या पुढे म्हणतात, "हाथरस घटनेनंतर मला आशा होती की दोषींवर उत्तर प्रदेश सरकार कारवाई करण्यासाठी पुढे येईल. पोरीबाळींना आपल्या वासनेचं शिकार ठरवणाऱ्यांवर नियंत्रण आणेल. परंतु असं काहीही झालेलं नाही. आज सकाळी मी बलरामपूरची घटना पाहिली ज्यानं मला हादरवून टाकलं.

महिलांची सुरक्षा निश्चित करता येत नसेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा. मी केंद्र सरकारला आग्रह करते की त्यांना त्यांच्या योग्य स्थानी धाडण्यात यावं-गोरखनाथ मठ. मंदिर पसंत नसेल तर त्यांना राम मंदिर निर्माणाचं काम देण्यात यावं".

"उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेने शेवटचा श्वास घेतला आहे. खासकरून या सरकारच्या राज्यात बहिणी-मुली अजिबात सुरक्षित नाहीत. भाजप सरकारमध्ये केवळ गुंड, बदमाश, माफिया आणि बलात्काऱ्यांचं राज्य सुरू आहे", अशा तीव्र शब्दात मायावती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहे.

त्या म्हणतात, "बेटी बचाओ-बेटी पढाओ या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या अगदी उलट कारभार उत्तर प्रदेशात सुरू आहे. हाथरसनंतर आता बलरामपूर इथेही अशीच घटना समोर आली आहे. हे कधी थांबणार? अशा अमानुष घटना थांबवण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कठोर कायदे करण्याची आणि ते राबवण्याची गरज आहे".

"हाथरस-19 वर्ष, बुलंदशहर-14 वर्ष, आझमगढ- 8 वर्ष. ही यादी न संपणारी आहे. आजी सुरक्षित नाही, लहान बालिका सुरक्षित नाहीत. बलात्कार सोडून बाकी सगळ्या विषयांवर चर्चा होते", असं काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

"हाथरस इथल्या पीडितेवर काही नराधमांनी बलात्कार केला. काल अख्ख्या व्यवस्थेने तिच्यावर बलात्कार केला. हे सगळंच अतिशय वेदनादायी आहे", अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"हाथरसच्या पीडितेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मला शब्द अपुरे पडतील. हे अतिशय नृशंस आणि घृणास्पद कृत्य आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सगळेच सहभागी आहोत.

कुटुंबीयांच्या उपस्थितीविना तसंच त्यांच्या परवानगीविना पीडितेवर सक्तीने अंत्यसंस्कार करण्यात येणं हे अतिशय लांच्छनास्पद आहे. मतांसाठी घोषणाबाजी आणि खोटी आश्वासनं देणाऱ्यांचा चेहरा उघड झाला आहे", अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"संपूर्ण देशात आंध्र प्रदेश आणि तेलंगणसारखा कायदा लागू करावा. मुली किंवा महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना तात्काळ फासावर लटकवण्यात यावं. देशात अशाप्रकारचे कृत्य करणारे नराधम पुढची सात-आठ वर्ष जगू शकतात. कडक कारवाई होत नाही हे त्यांना माहिती आहे. देशातील कायद्यात बदल घडत नाही तोपर्यंत हे चालू राहणार", असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)