मराठा आरक्षण : उदयनराजे आणि संभाजीराजे एकत्र येतील का?

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या स्थगितीनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. राज्य सरकारने ही कोंडी फोडण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू केले.

या सगळ्यामध्ये राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपने महाविकास आघाडी सरकार यासाठी जबाबदार असल्याची टीका केली.

यातच राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण मिळत नसेल तर सर्वच आरक्षण रद्द करा आणि मेरीटवर निवड करा अशी भूमिका घेतली, तर खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण कायम होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवू अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

27 सप्टेंबरला नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीतही संभाजीराजे उपस्थित राहिले आणि यावेळी त्यांनी साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे यांची बहीण मनिषाराजे यांची भेट घेतली. या भेटीनंतर छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली.

काय आहेत दोन्ही राजेंच्या भूमिका?

मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांची मराठा नेत्यांनी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, "मराठा समाजाच्या मुलामुलींना चांगले मार्क मिळाले तरी प्रवेश मिळत नाही. उलट कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. कोणताही विद्यार्थी असू दे प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. मी अनेकदा सांगितलं जर आरक्षण देता येत नसेल तर सर्वच आरक्षण रद्द करा आणि मेरीटवर निवड करा."

ते पुढे म्हणाले, "आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी 3 ऑक्टोबरला आम्ही प्रमुख लोकांशी चर्चा करणार आहे. या समाजात कष्ट करण्याची तयारी असतानाही कायम अन्याय झाला."

दुसरीकडे, खासदार संभाजीराजे यांनी पत्रक काढून त्यांचं मत मांडलं. ते म्हणाले, "राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाचा कायदा महाराष्ट्रात आणला तो मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. वंचितांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी हे आरक्षण होतं.

"आता मराठा समाज मुख्य प्रवाहाबाहेर फेकला गेला आहे म्हणून मी त्यांच्यासोबत आहे. लोकप्रतिनिधींनी या आरक्षणाच्या लढाईसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावं."

यानंतर नाशिकमध्ये झालेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला संभाजीराजे उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांनी उदयनराजे यांची बहीण मनिषाराजे यांची भेट घेतली. या भेटीचे विविध अर्थ काढण्यात येत आहे.

मराठा आरक्षणाच्या या लढ्याचं नेतृत्व कुणी करावं यावरूनही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. खासदार संभाजी राजे यांनी या लढ्याचं नेतृत्व करावं अशी मागणी होतेय. तर दुसरीकडे खासदार उदयनराजे यांनी या लढ्याचं नेतृत्व करावं असा सूर देखील उमटतो आहे.

यावर साताऱ्याची आणि कोल्हापूरची गादी एकच असल्याचं सांगत माध्यमांसह इतरांनी हे लक्षात घ्यावं आम्ही एकच आहोत असं संभाजीराजे यांनी म्हटलंय. मला या मोहीमेचं नेतृत्व नको, मोहीम द्या मोहीम फत्ते करून दाखवणार असं त्यांनी त्याबाबत बोलून दाखवलंय.

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे याबाबत सांगतात, "संभाजीराजे यांनी मनिषाराजे यांची घेतलेली भेट ही आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आहे असं वाटत नाही. याचं कारण ती छत्रपती संभाजीराजेंचीही बहीण आहे आणि ते बहिणीला भेटत असतात. छत्रपतींच्या घराण्यात काही मुद्यांवर वाद असले तरी इतर नात्यांवर त्यांचा परिणाम होत नाही हे मी पाहिलेलं आहे. "

याआधीही घेतली एकच भूमिका?

ज्या ज्या वेळी जनतेचा प्रश्न येतो त्या त्या वेळी राजकारण बाजूला ठेवून नेते एकत्र येण्याची परंपरा महाराष्ट्रात कायम दिसून येते. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर सर्व राजकीय नेत्यांबरोबरच दोन्ही छत्रपतींनीही एकत्र यावं अशी मागणी मराठा नेत्यांकडून केली जात आहे.

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे हे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल तर सर्व राजकीय नेत्यांबरोबर सातारा आणि कोल्हापूरच्या दोन्ही छत्रपतींनी एकत्र यावं. मी उदयनराजे यांची भेट घेतली. ते मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर कायमच सकारात्मक आहेत. आरक्षण न टिकण्याचा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा त्यांनी मग सर्व आरक्षण रद्द करून मेरीटवर आरक्षण द्या हा मुद्दा मांडला."

"उदयनराजे आणि संभाजीराजेंची भूमिका सारखीचं आहे. त्यामुळे सर्व नेत्यांबरोबर या दोन्ही छत्रपतींनी एकत्र येण्याची गरज आहे," असंही मेटे म्हणाले.

पण हे शक्य आहे का? याआधी असं घडलं होतं का? हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे सांगतात, "याआधी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊ नये अशी एकच भूमिका उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी घेतली होती. एकाच दिवशी या दोन्ही राजांनी महाराष्ट्र सरकारला पत्र दिलं होतं."

"मराठा आरक्षणाबाबत बोलायचं झालं तर 30 वर्षांपूर्वी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका घेतली. त्यावेळी अनेक मराठा प्रस्थापित नेत्यांना आरक्षणाची गरज काय? असं वाटत होतं. त्यामध्ये छत्रपती घराणंही होतं. पण कालांतराने त्यांनाही भूमिका पटायला लागली. आता तर मराठा मोर्चांमध्ये हे नेते चालताना दिसतात. दोन वर्षांपूर्वी उदयनराजे यांनी सर्व मराठा संघटनांची बैठक घेतली होती. त्यामुळे त्यांचीही भूमिका उघड आहे. जर काळानुसार विचारांमध्ये बदल घडू शकतात तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उदयनराजे आणि संभाजीराजे हे दोन्ही एकत्र येऊ शकतात," असा विश्वास श्रीमंत कोकाटे यांना वाटतो.

'तरच फायदा होईल...'

रस्त्यावर मोर्चे निघतायेत. सर्वपक्षीय बैठका होत आहेत. सरकारला पत्र लिहिली जात आहेत. विविध राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या भूमिका मार्ग सूचवले जात आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर सर्व पक्षाचं एकमत आहे. पण यासाठीचं नेतृत्व अद्याप कोणी स्वीकारलेलं नाही. हे नेतृत्व दोन्ही छत्रपतींनी स्वीकारावं असा मतप्रवाह आहे. पण नेतृत्व स्वीकारून याचा फायदा होईल का?

याबाबत आम्ही लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांना विचारलं. ते म्हणतात, "दोन्ही छत्रपतींची भूमिका जवळपास सारखीच आहे. पण ही लढाई राजकीय किंवा रस्त्यावरची लढाई नसून ही कायदेशीर लढाई आहे. त्यामुळे या दोन्ही छत्रपतींचं आरक्षणाच्या मुद्द्यावर एकमत झालं तरी कायदेशीर लढाई हे दोघं एकत्र येऊन लढले तर त्याचा फायदा होईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)