महाराष्ट्रात आता सुटी सिगारेट किंवा बिडी मिळणार नाही

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रातील कुठल्याही पान-बिडी दुकानात किंवा इतरत्र कुठेही सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास बंदी असेल. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने तसा निर्णय जारी केला आहे.
या निर्णयाची तातडीने आणि कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस आणि महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत.
सुटी सिगारेट आणि बिडी विकण्यास बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
सिगारेट किंवा बिडी खरेदी करणाऱ्यांना पाकिटावरील आरोग्याच्या दृष्टीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे ग्राफिक आणि इशारा दिसावा, तसंच पर्यायाने सिगारेट किंवा तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसार आणि सेवनावर नियंत्रण आणण्याचा उद्देश या निर्णयामागे आहे.

फोटो स्रोत, Getty Images
24 सप्टेंबरपासून आरोग्य विभागाचा हा निर्णय राज्यभर लागू करण्यात आला आहे.
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा, 2003 (जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अंतर्गत सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना पाकिटाच्या 85 टक्के भागावर सिगारेट किंवा बिडी आरोग्याला घातक असल्याचा इशारा देणारा संदेश छापणं बंधनकारक आहे.
मात्र, सिगारेट किंवा बिडीची सुट्या पद्धतीने विक्री झाल्यास या संदेशाचा उद्देश साध्य होत नाही. सिगारेट किंवा बिडी पिणाऱ्यास धोक्याची कल्पना मिळत नाही, असं कायदा सांगतो.

फोटो स्रोत, Getty Images
यापुढे कुणी दुकानदार सुटी सिगारेट किंवा बिडी विक्री करताना सापडल्यास एक वर्षांपर्यंत कारावास किंवा एक हजारापर्यंत दंड आकारला जाईल किंवा या दोन्ही शिक्षा एकत्र दिल्या जातील.
एकदा या शिक्षा भोगून झाल्यानंतर पुन्हा तीच व्यक्ती हा गुन्हा करताना आढळल्यास दोन वर्षांच्या शिक्षा किंवा तीन हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.
दरम्यान, मनी कंट्रोलच्या वृत्तात म्हटलंय की, ग्लोबल टोबॅको युथ सर्व्हे, 2016 नुसार महाराष्ट्रात धुम्रपानाचा दर देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








