देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीत भाजपला फायदा करून देऊ शकतील का?

फोटो स्रोत, Devendra Fadnavis/FACEBOOK
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
बिहार निवडणुकीचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होत आहेत. रालोआला सरकार स्थापन करता येण्याची शक्यता सुरुवातीच्या कलामधून दिसत आहे.
भाजपनं बिहार निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यादृष्टीनं बिहारमधील प्रचारही केला.
निवडणूक आयोगानं बिहारमधील निवडणुकीची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "मी स्वत: बिहारला जाऊन आलो आहे. बिहारच्या सामान्य माणसाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रचंड विश्वास आहे. त्यासोबतच नीतीश कुमार, सुशीलकुमार मोदी यांच्या सरकारनं गरीब आणि शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम केलं आहे. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएला अतिशय मोठा विजय मिळेल."
पण, देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातील राजकीय अनुभवामुळे भाजपला बिहारमध्ये फायदा होईल का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

फोटो स्रोत, Devendra Fadnavis/FACEBOOK
बिहारमधील राजकीय समीकरण
बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. सत्तेत येण्यासाठी 122 जागा जिंकणं गरजेचं आहे.
बिहारमध्ये सध्या जनता दल (युनायटेड) आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. जेडीयूचे नेते नीतीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत, तर भाजप नेते सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री आहेत.
2015मध्ये नीतीश कुमार यांच्या नेतृत्वात जेडीयूनं लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सोबत निवडणूक लढवली होती. त्यावेळी जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्षांनी एकत्र येत महाआघाडी तयार केली होती. तेव्हा जेडीयूला 69 आणि आरजेडीला 73 जागा मिळाल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर जेडीयू आणि आरजेडीनं सत्ता स्थापन केली. नीतीश कुमार मुख्यमंत्री झाले, तर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले.
पण, 2017मध्ये नीतीश कुमार यांनी आरजेडीसोबतची आघाडी तोडली आणि पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार स्थापन केलं. भाजपचे 52 आमदार निवडून आले होते.
काँग्रेसनं गेल्या वेळची निवडणूक आरजेडीसोबत लढवली होती आणि 23 जागांवर विजय मिळवला होता. भाजपचा सहकारी रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षानं 2 जागांवर विजय मिळवला होता.
जागा वाटपाचा तिढा
बिहारमधील निवडणुकीसाठीचं एनडीए आणि महाआघाडी दोन्हीकडचं जागावाटप अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एनडीएमध्ये जेडीयू, भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाचा समावेश होता. आता या आघाडीत बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान अवाम मोर्चा सहभागी झाला आहे.
बिहारमधील विधानसभेच्या जागावाटपाबाबत बिहारमधील स्थानिक पत्रकार नीरज प्रियदर्शी सांगतात, "जीतम राम मांझी यांच्या एनडीएतील समावेशामुळे लोक जनशक्ती पक्षाला कमी जागा मिळेल की काय, अशी भीती चिराग पासवान यांच्या मनात आहे. म्हणून ते गेल्या काही दिवसांपासून नीतीश कुमार यांच्याविरोधात बोलत आहे. असं असलं तरी भाजप मात्र याबाबतीत गप्प आहे. या माध्यमातून भाजप चिराग पासवान यांना पुढे करून जेडीयूवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे."
ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या 2014 ते 2019 दरम्यान सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीसारखीच आहे.
भाजप-शिवसेना सत्तेत असताना त्याकाळी शिवसेनेनं भाजपवर अनेकदा भाजपवर टीका केली. आता बिहारमध्ये सत्तेतील एक घटक पक्ष लोक जनशक्ती पक्ष जेडीयूवर टीका करताना दिसतोय.
त्यामुळे मग देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यास मदत होईल का, असं विचारल्यावर नीरज प्रियदर्शी सांगतात, "देवेंद्र फडणवीस हे बिहारच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर भूमिका निभावत नाहीयेत. त्यांनी दोन-चार कार्यक्रम तेवढे घेतले आहेत."

फोटो स्रोत, Devendra Fadnavis/FACEBOOK
पण, देवेंद्र फडणवीसांचा पुर्वानुभाव पाहता त्यांचा बिहार निवडणुकीत भाजपला फायदा होईल, असं महाराष्ट्र टाइम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित सांगतात.
ते म्हणतात, "देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते आहेत. बेरजेचं राजकारण कसं करायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे, याशिवाय सध्याच्या काळात जुळवून घेण्याचं राजकारण फडणवीसांशिवाय कुणीच करू शकत नाही. कारण जुळवून न घेतल्यानं काय फटका बसतो, हे त्यांनी वर्षभरापूर्वी पाहिलं आहे. त्यामुळे या अनुभवाचा त्यांना नक्कीच फायदा होईल आणि जागावाटपाचा तिढा सोडवायला मदत होईल."
वर्षभरापूर्वी भाजपपेक्षा कमी जागा मिळालेला शिवसेना पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आला आणि भाजपला विरोधी पक्षाची वाट धरावी लागली. त्यावेळी भाजपनं शिवसेनेशी जुळवून न घेतल्यानं आज त्यांना विरोधात बसावं लागल्याकडे अपराजित लक्ष वेधतात.
फडणवीसांमुऴे काय फायदा?
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे काही प्रमाणात राजपूत मतदार भाजपकडे वळतील, असं नीरज प्रियदर्शी सांगतात.
ते म्हणतात, "देवेंद्र फडणवीस बिहारला आले आणि त्यांनी पहिल्याच दिवशी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल वक्तव्य केलं. बिहारच्या लोकांना मला हे सांगायचा आहे की, महाराष्ट्रात सुशांत सिंह राजपूतवर कशाप्रकारे अन्याय झाला, असं वक्तव्य त्यांनी केलं. तेव्हापासून बिहारमध्ये दररोज सुशांत सिंह प्रकरणाचा उल्लेख राज्यकर्ते करताना दिसतात. याचा त्यांना किती फायदा होईल हे आताच सांगणं कठीण आहे. पण कदाचित काही राजपूत मतदार यामुळे प्रभावित होऊन त्यांच्याकडे वळू शकतील."
देवेंद्र फडणवीस यांचा बिहारमधील भाजपला हा फायदा आहे की, त्यांची प्रतिमा एकदम क्लीन आहे, असं मत बीबीसी हिंदीचे डिजिटल एडिटर राजेश प्रियदर्शी व्यक्त करतात.

फोटो स्रोत, Devendra Fadnavis/FACEBOOK
ते म्हणतात, "देवेंद्र फडणवीस यांची इमेज क्लीन आहे. ते बिहारमध्ये गेल्यामुळे बिहारमधील भाजपच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याविषयी कोणताही पूर्वाग्रह असणार नाही. गेल्या निवडणुकीत भाजपची जबाबदारी भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळी मात्र स्थानिक नेते आणि या दोन नेत्यांमधील समीकरणं व्यवस्थित नसल्याचं समोर आलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत तसं होणार नाही."
भाजप आणि जेडीयूमधील जागावाटपात भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील, यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा अनुभव कामाला येईल, असं राजेश प्रियदर्शी पुढे सांगतात.
असं असलं तरी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा मुद्दा निवडणुकीत इतका प्रभावी ठरणार नाही की त्यामुळे सत्तेच्या समीकरणावर परिणाम होईल, असंही ते पुढे सांगतात.
श्रीपाद अपराजित यांच्या मते, "देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये यशस्वी होतात की नाही, हा चिंतेचा विषय नाही. कारण, बिहारमधील विरोधी पक्ष संपुष्टात आला आहे. दुसरं म्हणजे भाजपनं यापूर्वीच बिहारमधील निवडणुकीचा चेहरा म्हणून जेडीयूच्या नितीश कुमार यांचं नाव जाहीर केलं आहे. त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना बिहारमध्ये यश मिळवण्यासाठी जास्त कष्ट करण्याची गरज पडणार नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








