अयोध्या मंदिर भूमीपूजन: मुहूर्त, कोरोना आणि बिहार निवडणुका

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या इथं राम मंदिराच्या कामाचं भूमीपूजन करतील. चांदीच्या पाच विटांना त्यांना 32 सेकंदात मंदिराच्या पायाभरणीत ठेवायच्या आहेत.
भूमीपूजनाची तिथी आणि मुहुर्तावरून बराच वादविवाद सुरू आहे. भूमीपूजनाचा मुहुर्त आचार्य गणेश्वर राज राजेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढला आहे. विद्वान म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ते काशी राजघराण्याच्या गुरुपरिवाराचा भाग आहेत.
भूमीपूजनाचा मुहूर्त रक्षापौणिमेच्या दिवसापासून म्हणजे तीन तारखेपासून सुरू होतो आहे. परंतु कोनशिला सोहळ्यासाठी 5 ऑगस्टचा मुहुर्त काढण्यात आला आहे. यादिवशी 12.15.15 ते 12.15.47 अशी वेळ देण्यात आली आहे.
मुहुर्तावरून वाद सुरू होण्याचं कारण म्हणजे आचार्य द्रविड यांनी सांगितलेली तिथी, तारीख आणि वेळ याला ज्योतिष्पीठाधीश्वर आणि द्वारका शारदापीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी विरोध केला आहे.
मंदिराचं काम योग्य पद्धतीने व्हायला हवं आणि भूमीपूजन योग्य वेळी व्हायला हवं असं त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग

सध्या काढण्यात आलेला मुहूर्त अशुभ असल्याचं स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचं म्हणणं आहे. मात्र आपण काढलेला मुहुर्त योग्य असून, ज्यांना तो चुकीचा वाटत आहे त्यांनी शास्त्राच्या आधारे ते सिद्ध करून दाखवावं असं आव्हान आचार्य गणेश्वर राज राजेश्वर शास्त्री द्रविड यांनी केलं आहे. मात्र तूर्तास त्यांना कोणीही आव्हान दिलेलं नाही.
काशीचे योग गुरू चक्रवर्ती विजय नावड यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "नक्षत्र विज्ञानात देशातल्या सर्वोत्कृष्ट विद्वानांमध्ये आचार्य द्रविड यांचं नाव घेतलं जातं. सूक्ष्म ज्योतिषी गणना करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. या कारणासाठीच श्रीराम जन्मभूमी न्यास ट्रस्टने चातुर्मास काळात मुहुर्त काढण्याची जबाबदारी आचार्यांकडे सोपवली".
परंतु नावड सांगतात की हिंदू धर्माच्या मान्यतांनुसार चातुर्मासात म्हणजेच भगवान विष्णूंच्या चार महिन्यांच्या निद्राकाळात कोणत्याही स्वरुपाचं मंगलकार्य करणं निषिद्ध आहे. परंतु विशेष परिस्थितीत दोषांची पीडा दूर करून व्यवस्था केली जाऊ शकते.
नावड पुढे सांगतात, "पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी ज्योतिष क्षेत्रातील दुर्लभ ग्रंथ चिंतामणी, ज्योतिर्विदाभरण, मुहुर्त पारिजात, राज मार्तंड, पीयूषधारासह श्रीकृष्ण यजुर्वेद, अमरकोष, शब्द कल्पद्रुम कोश अशा शास्त्रीय ग्रंथांच्या आधारे विशेष परिस्थिती म्हणून 5 ऑगस्टचा मुहूर्त काढला आहे."
साधूसंतांच्या वक्तव्यावर भाष्य करणार नसल्याचं विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितलं. जो मुहूर्त काढण्यात आला तो योग्यच असल्याचं त्यांना वाटतं.
फोनवरून बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नाही. हा केवळ हिंदूंसाठी नव्हे तर समाजासाठी आस्थेचा विषय आहे. म्हणूनच मंदिराच्या निर्माणासाठी देशातल्या पवित्र ठिकाणांइथली माती आणि पवित्र नद्यांचं पाणी आणण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त तीन लाख विटा अयोध्येत आधीच येऊन पोहोचल्या आहेत".
राजकीय कंगोरा
भूमीपूजनाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र या सोहळ्याचा राजकीय उपयोग केला जात असल्याचं विरोधी पक्षांनी केंद्रातील भाजप आणि उत्तर प्रदेशातील सरकारवर केला आहे.
बिहारमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि देशात कोरोनाचे आकडे वाढत असताना अयोध्या मंदिराचं भूमीपूजन आता करणं योग्य नसल्याची टीका भाजपवर केली जात आहे.
काँग्रेसचे नेते आणि माजी न्यायमंत्री वीरप्पा मोईला म्हणतात, भगवान राम यांच्या तीर-धनुष्य रुपाऐवजी राम, सीता, हनुमानच्या मुर्ती तयार करायला हव्या होत्या. मोईली म्हणतात की भगवान राम आक्रमक नव्हते तर ते करुणावतारी होते.

फोटो स्रोत, THE INDIA TODAY GROUP
अयोध्या मंदिराच्या भूमीपूजनासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण द्यायला हवं होतं असं काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांना वाटतं.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मनोज झा म्हणाले, "भूमीपूजनाचं त्यांना आश्चर्य वाटतं आहे. भगवान राम केवळ दशरथपुत्र नव्हते. ते सगळ्यांसाठी श्रद्धेय आहेत. त्यामुळे मंदिराची उभारणी केव्हाही होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे त्यामुळे मंदिराचं काम केव्हाही होऊ शकतं. त्यासाठी घाई करण्याची आवश्यकता नाही".
भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधानांनी यासंदर्भात जनतेसमोर उदाहरण मांडायला हवं होतं असं झा यांना वाटतं. कोरोना वेगाने पसरतो आहे, अनेक राज्यातली आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. बिहारसारख्या राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयं अपुरी पडत आहेत. ज्या काळात एकमेकांपासून अंतर राखणं आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींनी योग्य निर्णय घ्यायला हवा होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह प्रांत संघचालक अलोक कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की मुख्य प्रवाहातील कोणतेही पक्ष मंदिराच्या कामाला विरोध करत नाहीयेत. त्यांनी काँग्रेसचंही नाव घेतलं. शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं परंतु त्यांचा गैरसमज झाला होता.
भूमीपूजन सोहळ्यासाठी सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यासंदर्भात त्यांना विचारलं असता ते म्हणाले, अंतर राखण्याच्या नियमामुळे केवळ दीडशेजणांनाच सोहळ्याला उपस्थित राहण्याची अनुमती आहे. कोरोनाचं संकट नसतं तर या सोहळ्याला लाखो लोक उपस्थित राहिले असते. प्रभू श्रीराम यांची ओळख धनुष्यबाणासहित आहे. त्यामुळे निमंत्रणात त्याच प्रतिमेचा उपयोग करण्यात आला आहे.
महत्त्वाचे प्रश्न
याव्यतिरिक्त 5 ऑगस्टला जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्याला तसंच जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश केल्याच्या निर्णयाला वर्ष पूर्ण होत आहे. अयोध्या मंदिराच्या भूमीपूजनाच्या वातावरणात काश्मीरसंदर्भातली चर्चा दुय्यम राहण्याचीच शक्यता आहे.
कोरोनामुळे देशाची स्थिती डळमळीत झालेली आहे तसंच अर्थव्यवस्थेशी निगडीत गंभीर प्रश्न आ वासून उभे आहेत. अयोध्या भूमीपूजनामुळे थोड्या काळासाठी का होईना त्या गोष्टी बाजूला होतील. टीव्हीवर राम मंदिराच्या भूमीपूजनाचं थेट प्रक्षेपण मीडियाचा अजेंडा निश्चित करेल.
कोणतेही राजकीय पक्ष यावर बोलताना, टीका करताना दिसत नाहीत. कारण तसं केलं तर राजकीय नुकसान होईल आणि परिणामांना सामोरं जावं लागेल म्हणूनच मोठे नेते कोणतंही वक्तव्य देत नाहीयेत असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं.

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
लखनौस्थित ज्येष्ठ पत्रकार वीरेंद्रनाथ भट्ट सांगतात, स्वातंत्र्यानंतर अशा स्वरुपाच्या राजकारणामुळे समाजाचं नुकसान झालं आहे. लोक आपापसात वैचारिक, धार्मिक, जातींवर विभागले गेले आहेत. देशातील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनेही याचा फायदा उचलला आहे आणि प्रादेशिक पक्षांनीही.
समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या विचारसरणींच्या पक्षाचा उल्लेख करताना ते म्हणाले, अल्पसंख्याक समाजात असुरक्षितता तसंच भीतीचं वातावरण निर्माण करून नेत्यांनी राजकीय फायदा उचलला आहे. या सगळ्यात सगळ्यात जास्त फटका काँग्रेसला पक्ष म्हणून बसला आहे".
भूमीपूजनानंतर दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर आपल्या देशात अशा स्वरुपाचा आयोग स्थापन करण्यात यावा ज्यामध्ये धर्म आणि जातींना विसरून लोक एकत्र येतील. समाजात दुही माजवणाऱ्यांना मुद्यांना मूठमाती देण्यात यावी. समाजात असलेला संघर्ष थांबवता यावा असं भट्ट यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








