कन्हैया कुमार बिहार निवडणूक लढवणार का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दिल्ली हिंसाचारप्रकरणी उमर खालिद याला झालेल्या अटकेप्रकरणी आपण मौन बाळगलं नसल्याचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे.
उमर खालिद यांना जेएनयूमध्ये वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी कन्हैया कुमारसोबत अटक झाली होती. त्यांच्यावरही राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता.
दिल्ली हिंसाचारप्रकरणी आपल्या सहकाऱ्याचे, उमर खालिदचे समर्थन केले नाही, असा आरोप कन्हैया कुमार यांच्यावर करण्यात येत आहे. कन्हैया यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, याप्रकरणी केवळ उमर खालिद यांनाच नाही, तर अन्य काहीजणांनाही अटक करण्यात आली आहे.
कन्हैया म्हणतात, "जे आता सत्तेत आहेत, त्यांना वाटतं की, विरोधामध्ये उमटणाऱ्या आवाजाचं अपराधीकरण केलं जायला पाहिजे. खोट्या आरोपांच्या आधारे, बनावट व्हीडिओ बनवून तिंवा चुकीच्या पद्धतीने व्हॉट्स अप मेसेज तयार करून विरोध करणाऱ्यांना लोकांमध्ये बदनाम करायला पाहिजे."
सरकार जर इतकं निष्पक्ष आहे, तर त्यांनी उघडपणे लोकांना गोळ्या घालण्याची भाषा करणाऱ्यांची, दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत दंगे घडविण्याची भाषा करणाऱ्यांची चौकशी का नाही केली, असा प्रश्न कन्हैया यांनी उपस्थित केला. त्यांना काही होत नाहीये. या देशात दंगे घडविण्याचा आरोप असलेले, तडीपार झालेले लोक सत्तेत आहेत. न्यायाचा आवाज दाबला जात आहे.
याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी 'युनायटेड अगेन्स्ट हेट'चे संस्थापक उमर खालिद यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अटक केली आहे.
सध्या उमर खालिद दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. UAPA कायद्यांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेला विविध विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता.
दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी झालेल्या अटकेविरोधात दिल्ली प्रेस कल्बमध्ये प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण आणि एनी राजा यांच्यासह काही सामाजिक संघटनांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलणाऱ्यांच्या यादीत कन्हैय्या कुमार यांचंही नाव होतं. मात्र ते या कार्यक्रमाला आले नाहीत.
"ज्यादिवशी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यादिवशी मी दिल्लीत नव्हतो. तुम्ही माझी फेसबुक पोस्ट पाहा. मी अटकेचा निषेध केला आहे," असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं.
कन्हैया कुमार बिहार निवडणूक लढवणार का?
आपण निवडणूक लढवू इच्छित नसल्याचं कन्हैया कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. अर्थात, आपला पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीत कोणती जबाबदारी सोपवेल, यावरही हे अवलंबून असल्याचं कन्हैया यांनी म्हटलं.
कन्हैया कुमार हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी म्हटलं, "निवडणूक लढविण्याबद्दल विचाराल, तर वैयक्तिकरीत्या मी स्वतः उमेदवार नाहीये. मी निवडणूक लढवत नाहीये. पण जेव्हा निवडणूक होईल तेव्हा पक्ष नक्कीच निवडणूक लढवेल. पक्षाचा सदस्य या नात्याने माझ्यावर जी जबाबदारी सोपविली जाईल, ती मी पार पाडेन."
अर्थात, कोरोनाच्या काळात विधानसभा निवडणूक घेतली जाऊ नये, असं आमच्या पक्षाचं मत असल्याचं कन्हैया कुमार यांनी म्हटलं.
सध्याच्या काळात सुरक्षितपणे निवडणूक लढविण्यासाठी काय उपायोजना करणार आहात, हे स्पष्ट करा असं आमच्या पक्षानं निवडणूक आयोगाला विचारलं असल्याचंही कन्हैया यांनी म्हटलं.
"सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून प्रचार कसा होऊ शकतो? मतदान केंद्रावर मतदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काय उपाययोजना केली जाणार आहे? या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगानं द्यायला हवीत. कर्मचारी आणि मतदारांच्या सुरक्षेचा विचार व्हायला हवा. आणि जर या सगळ्या परिस्थितीतही जर इतर पक्ष निवडणूक लढवण्यास तयार असतील, तर आम्हीही निवडणूक लढवू," असं कन्हैया यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








