नरेंद्र मोदी पत्रकारांनी विचारलेल्या अडचणींच्या प्रश्नांना कसे सामोरे जातात?

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेणारे एक गोष्ट नक्कीच मान्य करतील आणि ती म्हणजे संवाद साधण्यात त्यांची हातोटी आहे. मात्र, त्यांचं संवाद कौशल्य नेमकं आहे तरी कसं? ते अवघड, अडचणीत टाकणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देतात की त्यांना हवं तेच बोलतात?

नरेंद्र मोदी वयाची सत्तरी ओलांडत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात त्यांनी फारशा मुलाखती दिलेल्या नाहीत. उलट गेल्या काही वर्षातल्या त्यांच्या मुलाखतींमध्ये त्यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले जात नाहीत, अशी टीका होते.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून म्हणजेच गेल्या सहा वर्षांत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. यावरूनही त्यांच्यावर सातत्याने टीका केली जाते.

याबाबत नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी त्यांच्या मुलाखती घेतलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना काय वाटतं, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

यासंदर्भात आम्ही ज्येष्ठ पत्रकार स्मिता प्रकाश, विजय त्रिवेदी, राजदीप सरदेसाई आणि नवदीप धारीवाल यांच्याशी बातचीत केली. या ज्येष्ठ पत्रकारांच्या भावना जाणून घेऊया, त्यांच्याच शब्दात.

स्मिता प्रकाश (ANI वृत्तसंस्था)

मी नरेंद्र मोदी यांच्या दोन मुलाखती घेतल्या आहेत. पहिली 2014 साली. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. दुसरी मुलाखत घेतली जानेवारी 2019 मध्ये. लोकसभा निवडणुकांना पाच महिने बाकी असताना.

पहिली मुलाखत उत्तम होती, असं मी म्हणेन. कारण 2014 च्या काही वर्षं आधी मी गुजरातला गेले होते आणि त्यांची मुलाखत मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मला मुलाखत मिळाली नव्हती. त्यामुळे 2014 मध्ये काय होईल, याची मला कसलीच कल्पना नव्हती. शिवाय, मोदी यांच्या मनात पत्रकारांविषयी एक प्रकारची साशंकता असल्याचंही मी ऐकलं होतं.

मात्र, ते अत्यंत हसतमुखाने भेटले आणि मला ते खूप प्रतिभावंत वाटले. 'हे विचारू नका, ते विचारू नका,' असं त्यांनी म्हटलं नाही. मी त्यावेळी 'न्यूज एशिया' या सिंगापूरस्थित चॅनलसाठीही काम करायचे. मला त्या चॅनलसाठीही त्यांचे काही साउंड बाइट हवे होते.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

नरेंद्र मोदी यांना परराष्ट्र धोरणाची बरीच माहिती होती, हे बघून मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. पंतप्रधान होण्याआधी लोकांना वाटायचं की, परराष्ट्र धोरणाबाबत ते नवशिके आहेत. त्यांना परराष्ट्र धोरणाची जाण नाही. मात्र, सिंगापूरच्या प्रेक्षकांचा विचार करून ते बोलले आणि तिथेही त्याची बरीच चर्चा झाली.

माझ्यासाठी मुलाखत चांगली की वाईट हे रेटिंगवरून ठरत नाही. मी घेतलेली मुलाखत सर्व सबस्क्रायबर्सना जाते. ती प्रत्येकाशी संबंधित असणं, गरजेचं असतं. मी घेतलेली मुलाखत करण थापर यांच्या मुलाखतीसारखी असू शकत नाही. एका वृत्तसंस्थेची प्रतिनिधी म्हणून मी जेव्हा मुलाखत घेते तेव्हा मला मोठं-मोठे साउंड बाईट हवे असतात. जेणेकरूण आमच्या वृत्तसंस्थेच्या सबस्क्रायबर्सना त्या मुलाखतीतला हवा तेवढा भाग एडिट करून वापरता यावा.

स्मिता प्रकाश

फोटो स्रोत, Ani

एखादा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे, असं तुम्हाला वाटत असलं तरी तो प्रश्न विचारल्यावर नरेंद्र मोदी त्यालाही उत्तर देतात. मात्र, त्यांना हव्या त्या पद्धतीने ते उत्तर देतात.

मुलाखत घेण्याआधी आणि घेतल्यानंतर त्यांच्यात काहीच बदल झाल्याचं मला जाणवलं नाही. मुलाखत संपल्यावर ते थोडं पाणी प्यायले. पण, दीर्घ मुलाखतीमुळे ते दमले नव्हते. तुम्ही मला एकच गोष्टी 2-3 वेळा का विचारली, असं ते तुम्हाला म्हणणार नाही. मुलाखत संपल्यावर ते शांतपणे निघून गेले.

त्या मुलाखतीनंतर त्यांनी मला कॉल केला आणि म्हणाले की, ही मुलाखत सर्व चॅनलवर एकाचवेळी दाखवली जाईल, असं त्यांना वाटलं नव्हतं.

विजय त्रिवेदी

(विजय त्रिवेदी यांनी NDTV या न्यूज चॅनलमध्ये असताना ही मुलाखत घेतली होती. सध्या ते 'सत्य हिंदी' या न्यूज वेब पोर्टसाठी काम करतात.)

एप्रिल 2009 मध्ये मला नरेंद्र मोदी यांच्याकडून कॉल आला. त्यांनी मला अहमदाबादला बोलावलं. त्यावेळी जवळपास 20 वर्षांपासून माझे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. दिल्लीत पक्षाचे सरचिटणीस असताना मी अनेकदा त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. ते दरवर्षी दिवाळीत फोन करून मला शुभेच्छा द्यायचे. ते उत्तम पाहुणचार करायचे. ते तुमची काळजी घेतात.

सकाळची वेळ होती. आम्ही अहमदाबादहून एका छोट्या हेलिकॉप्टरमध्ये बसून रवाना झालो. हेलिकॉप्टरमध्ये चौघा जणांसाठी जागा होती. मात्र, आम्ही पाच जण होतो.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

त्यावेळी नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेणं, रंजक अनुभव असायचा. मोदी त्यांना जे म्हणायचं आहे ते अत्यंत कणखरपणे आणि स्पष्टपणे बोलायचे. बरेचदा पॉलीटिकली करेक्ट बोलण्याचा नेत्यांचा प्रयत्न प्रयत्न असतो. मात्र, मोदी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलायचे. उदाहरणार्थ-2008 साली जेव्हा अडवाणी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार करायचं का, यावर पक्षातले इतर नेते स्पष्ट भूमिका घ्यायला कचरत होते. त्यावेळी नरेंद्र मोदी अगदी स्पष्टपणे म्हणाले होते की, अडवाणीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असायला हवे.

आम्ही अमरेलीला जात होतो. मोदीजी म्हणाले, "45 मिनिटांचा प्रवास आहे आणि पुढे 30 मिनिटांचा प्रवास आहे. तुम्हाला हवी तेव्हा मुलाखत घ्या."

मी मुलाखत सुरू केली आणि पुढे मुलाखतीच्या ओघाने विचारलं की, तुम्ही 2002 च्या दंगलीची नैतिक जबाबदारी घेणार का आणि घडलेल्या हिंसाचारासाठी माफी मागणार का?

नरेंद्र मोदींनी मला प्रतिप्रश्न केला, "सोनिया गांधींना, 1984 च्या दंगलीसाठी माफी मागाल का, हा प्रश्न विचारण्याचं धाडस तुमच्यात आहे का?"

मी म्हटलं की, सोनिया गांधींजी मुलाखत घेईल त्यावेळी मी हा प्रश्न विचारेन.

मी नरेंद्र मोदी यांना पुन्हा तोच प्रश्न विचारला. ते म्हणाले, "यावर त्यांना जे काही सांगायचं होतं ते सांगून झालं आहे."

मी पुन्हा तोच प्रश्न विचारला. ते काहीच बोलले नाही आणि त्यांनी त्यांचा हात कॅमेऱ्यासमोर धरला. त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि फाईल चाळू लागले नंतर खिडकीतून बघू लागले. त्या कर्कश्श आवाज करणाऱ्या हेलिकॉप्टरच्या आता शांतता पसरली होती.

आम्ही उतरलो तेव्हा मोदीजी माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, "कदाचित हे आपलं शेवटचं बोलणं आहे." पहिल्या सभेचं वार्तांकन करून मी परतलो तेव्हा त्यांचं हेलिकॉप्टर मला न घेताच रवाना झालं होतं. त्यांच्या एका सहाय्यकाने मला सांगितलं की, मोदीजींनी माझ्या परतीच्या प्रवासाठी कारची व्यवस्था केली आहे. मी नकार दिला आणि त्याऐवजी ट्रॅक्टरनं परतणं पसंत केलं.

त्यांनी या मुलाखतीचं प्रसारण थांबवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. आम्ही ती संपूर्ण मुलाखत दाखवली. उलट आमच्या एडिटरने त्या मुलाखतीतून एक प्रोमोसु्दधा बनवला. त्या म्हटलं होतं, 'मुलाखत म्हणजे मौन.' ही मुलाखत एवढी गाजेल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

त्या मुलाखतीनंतर आजतागायत नरेंद्र मोदी माझ्याशी बोलले नाहीत. मी त्यांचे कार्यक्रम कव्हर केले. त्यांच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेतही गेलो. मात्र, फक्त एकदाच जेव्हा आम्ही एका सार्वजनिक स्थळी समोरा-समोर आलो त्यावेळी त्यांनी मला नमस्कार केला होता.

आज माझ्या मनात नरेंद्र मोदींविषयी कुठलीही कटू भावना नाही. तशी ती कधीच नव्हती. आजही जर मी त्यांना भेटलो तर मी पुन्हा तेच करेन - त्यांना प्रश्न विचारेन.

राजदीप सरदेसाई

(राजदीप सरदेसाई यांनी NDTV आणि CNN-IBN साठी नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. आज ते इंडिया टुडे समुहात कन्सल्टिंग एडिटर आहेत.)

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी अनेकवेळा त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, सप्टेंबर 2012 साली मी घेतलेली त्यांची शेवटची मुलाखत संस्मरणीय ठरली. त्यावेळी त्यांनी मला बसमध्ये खाली बसवलं होतं. ते चिडलेले वाटत होते आणि पत्रकारांविषयी एकप्रकारची सावधगिरी बाळगत असल्याचं जाणवलं. ही मुलाखत पत्रकारितेचा उत्तम नमुना असल्याचं आकार पटेल यांनी म्हटलं होतं.

मी त्यांची पहिली मुलाखत घेतली होती 1990 साली. रथयात्रेदरम्यान. त्यावेळी त्यांनी पांढरा शुभ्र सदरा घातला होता. ते टीव्हीचे सुरुवातीचे दिवस होते. मोदी एक कणखर आणि प्रभावी संवाद कौशल्य असलेली व्यक्ती म्हणून उदयास आले.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

2001 सालची घटना आहे. 9/11 हल्ल्याला तीन-चार दिवस झाले होते आणि आम्ही दहशतवादावर एक शो करत होतो. प्रमोद महाजन यांनी सरकारमध्ये असल्यामुळे कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता. मी शास्त्री भवनात नरेंद्र मोदी यांना भेटलो आणि त्यांनी त्या डिबेट शोमध्ये सहभागी व्हायला तात्काळ होकार दिला. ते मला असंही म्हणाले की, 'तुम्ही हा विषय घेतला, हे उत्तम आहे.'

त्याकाळी नरेंद्र भाई कायम उपलब्ध असायचे. कुठल्याही प्रश्नासाठी त्यांच्याकडे उत्तर असायचं. त्यांनी कधीच मुलाखतीपूर्वी प्रश्न मागावले नाही. हल्ली अनेक मुलाखती PR असल्यासारख्या वाटतात. PR-पूर्व काळात मोदी यांची मुलाखत घेणं, आनंददायी अनुभव असायचा.

नवदीप धारीवाल

(नवदीप धारीवाल यांनी बीबीसी न्यूजसाठी नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. )

मी 'व्हायब्रंट गुजरात' परिषदेवेळी बीबीसी न्यूजसाठी नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. त्या परिषदेसाठी ते खूप उत्साही होते. गुजरात तुम्हाला काय देऊ इच्छितो, हा संदेश त्यांना NRI नागरिकांना द्यायचा होता. गुंतवणुकीसाठी गुजरात सुवर्ण राज्य असल्याचा त्यांचा संदेश होता.

ते मुलाखतीसाठी आले. आम्ही हस्तांदोलन केलं. आम्ही थोडं बोललो आणि लगेच मुलाखतीला सुरुवात झाली. मला त्यांना परिषद आणि दंगल दोन्हीविषयी विचारायचं होतं. पत्रकारितेच्यादृष्टीने आणि संपादकाच्यादृष्टीने ते योग्यच होतं. मला वाटलं जगभरातल्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं होतं आणि त्यांना ते प्रश्न विचारण्याची पहिलीच संधी मला मिळाली होती.

मी अशा आशयाचा प्रश्न विचारला - "तुमच्या राज्यात हजारो मुस्लीम हत्याकांडात ठार झालेले असताना तुम्ही लोकांना इथे गुंतवणूक करण्याचं आवाहन करत आहात."

त्यांनी माझ्या या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मी याच मुद्द्यावर आणखी भर दिला. मग त्यांनी मायक्रोफोन काढला आणि मुलाखत सोडून निघून गेले.

त्यांचा संदेश स्पष्ट होता : मी 'व्हायब्रंट गुजरात' समिटसाठी इथे आलो आहे आणि इतर कुठल्याही विषयावर बोलणार नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )