पबजी बंदी : नरेंद्र मोदींना तरूणांची नाराजी भोवणार का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सचिन गोगोई
- Role, दक्षिण आशिया संपादक, बीबीसी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय आणि त्यांच्या लोकप्रियतेमध्ये सोशल मीडियाची भूमिका अतिशय महत्त्वाची होती, असं सांगितलं जातं. पण सध्या याच सोशल मीडियाचा नकारात्मक परिणाम मोदींच्या लोकप्रियतेवर होत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पबजी मोबाईल गेम आणि तत्सम अॅपवर बंदी घातल्यामुळे नाराज झालेल्या भारताच्या तरूणाईचं आव्हान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आहे.
कोरोना व्हायरसची साथ असूनसुद्धा JEE आणि NEET या दोन परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. सरकारच्या या निर्णयावर विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली.
या प्रकरणी ट्विटरवर मोहीमही चालवण्यात आली. JEE आणि NEET परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
पबजीचा खेळ खल्लास
पबजी या मोबाईलवर खेळता येऊ शकणाऱ्या लोकप्रिय गेमसह 118 इतर अॅपवर केंद्र सरकारने 2 सप्टेंबर रोजी बंदी घातली. चीनशी संबंधित अॅपवर बंदी घालण्याच्या मोहिमेचा हा एक भाग होता.
यापूर्वीही 106 इतर चिनी अॅपवर भारताने बंदी घातली होती. लडाखमध्ये सुरू असलेल्या भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण घटनाक्रम घडला.

फोटो स्रोत, Getty Images
इतर अॅप्सवर बंदी घालण्यात येत असतानाही पबजी मोबाईल गेमची लोकप्रियता कायम होती. सेन्सॉर टॉवर या अमेरिकन संस्थेच्या माहितीनुसार, भारतात या गेमचे सर्वाधिक वापरकर्ते होते. 2 जुलैपर्यंत जगभरात 73.4 कोटी वेळा हा गेम डाऊनलोड करण्यात आला आहे. त्यापैकी 24 टक्के म्हणजेच 17.5 कोटी डाऊनलोड भारतात करण्यात आले आहेत.
गेम डाऊनलोड करण्याबाबत चीन दुसऱ्या क्रमांकावर असून इथं जगातील 16.7 टक्के वापरकर्ते आहेत, तर अमेरिकेत 6.4 टक्के डाऊनलोड आहेत.
पबजी गेमवर बंदी घातल्यामुळे गेम खेळणाऱ्या तरूण वर्गात संमिश्र वातावरण आहे.
काहींनी याबाबत प्रकट नाराजी दर्शवली आहेत, तर काही जण चीनला धडा शिकवण्यासाठी हे पाऊल योग्य असल्याचं म्हणत आहेत.

फोटो स्रोत, Pubg
भारतात गेमिंग चॅनल चालवणारे अनेक युट्यूबर्स आहेत. या लोकांनी गेम खेळून आपला लाखोंचा चाहता वर्ग तयार केला आहे.
आदी सावंत हे डायनामो गेमिंग नावाचं एक युट्यूब चॅनल चालवतात. त्यांचे 80 लाख 43 हजार सबस्क्रायबर्स आहेत.
त्यांनी नुकतंच शेवटचं पबजी मोबाईल लाईव्ह स्ट्रीम केलं. यामध्ये ते म्हणाले, "मी अतिशय दुःखी आहे. पण फक्त पबजीवर बंदी घालण्यात आली आहे. युट्यूबवर नाही. त्यामुळे इतर कोणत्या तरी पद्धतीने मी तुमच्याशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करेन.
रोनी दासगुप्ता युट्यूबवर रॉकनी गेम्स नावाचं चॅनल चालवतात. त्यांचे जवळपास 11 लाख सबस्क्रायबर्स आहेत. त्यांच्या मते, "हा एक वाईट दिवस आहे. पण असं होण्यासाठी काही कारण आहे. लोकांची इ्च्छा असेल, तर ही बंदी आम्ही स्वीकारू."
व्यावसायिक गेमवर बंदी आल्यानंतर युट्यूबर संयमाची भूमिका घेत आहेत. पण सोशल मीडियावर याची प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

फोटो स्रोत, Pubg
सरकारने बंदी घातल्यानंतर 'PUBGBAN', 'Nation_Hates_Modi' आणि 'Tencent' हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत होते.
या हॅशटॅगचा वापर करून ट्विटरवर मोदी सरकारवर टीका होत आहे. काहीजण पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध गेम खेळणारे तरूण यांची लढाई असं चित्र रंगवत आहेत.
घसरलेल्या GDP वरून सामान्य माणसाचं लक्ष हटवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्विटरवर अभय नामक एका व्यक्तीने लिहिलं.
परीक्षेच्या निर्णयावरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
JEE आणि NEET परीक्षा सप्टेंबर महिन्यातच घेण्यात याव्यात, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही विद्यार्थ्यांना धोक्यात घालत असल्यावरून गंभीर प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.
काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने या निर्णयावर टीका केली आहे. 28 लाख विद्यार्थ्यांची पर्वा सरकार करत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणावरूनही सोशल मीडियावर वेगवेगळे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसले.
ऑगस्ट महिन्यात "AntiStudentModiGovt", "StudentsDislikePMModi", "ProtestAgainstExamsInCOVID", "SaveJEE_NEETstudentsPM" आणि "SpeakUpForStudentSafety" अशा प्रकारचे हॅशटॅग ट्रेंडिंग होते.
या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाला युट्यूबवर मोठ्या प्रमाणात डिस्लाईक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. सदर व्हीडिओ फक्त डिस्लाईक करण्यासाठीच शोधल्याचं काही ठिकाणी कमेंटमध्ये आढळून येईल.
पण भारतीय जनता पक्षाने हे विद्यार्थ्यांचं मत नसून विरोधी पक्ष काँग्रेसने हे घडवून आणल्याचं म्हटलं आहे.
तरुणांच्या असंतोषातून काय संकेत?
गेल्या काही दिवसांत मोदी सरकारच्या निर्णयांवर तरूणांनी दिलेली प्रतिक्रिया त्यांच्यासाठी अनपेक्षित होती. नरेंद्र मोदी यांच्या व्हीडिओला लाईकपेक्षा जास्त डिस्लाईक मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मोदी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. त्यांना डिस्लाईक बटणाची शक्ती आता कळाली आहे, असं मत 'द प्रिंट' या वेबसाईटवरील एका लेखात व्यक्त करण्यात आलं होतं.
विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावरील भूमिकेमुळे आगामी निवडणुकीच्या निकालांवर काय परिणाम होईल, याचा अंदाज व्यक्त करणं सध्या तरी घाईचं आहे.
पण अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ते यापुढे मोदींना मतदान करणार नाहीत, असं म्हटलेलं आहे. 2024 च्या निवडणुकीत मोदींचा बदला घेण्यात येईल, असं एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिलं होतं.
विद्यार्थ्यांच्या डिस्लाईक कँपेनमुळे निवडणूक निकालांचा अंदाज कुणीच बांधू नये, कारण भाजप 2024 च्या निवडणुकीत दुसरा एखादा मुद्दा घेऊन पुढे येऊ शकतो, असंही एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








