You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे वि. रिपब्लिक वाद : कर्जतजवळचं फार्म हाऊस चर्चेत का आहे?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कर्जतजवळचं फार्म हाऊस पुन्हा चर्चेत आलं आहे. हे फार्म हाऊस कुठे आहे, ठाकरे कुटुंबीयांसाठी ते महत्त्वाचं का आहे, याआधी ते वादात का सापडलं होतं आणि आता एवढं चर्चेत का आहे?
त्याचं झालं असं की, उद्धव ठाकरे यांच्या या फार्म हाऊसची टेहळणी करण्याच्या आरोपावरून रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या दोघा पत्रकारांसह तिघांना अटक झाल्याचं काल (बुधवारी) समोर आलं होतं. रिपब्लिक वृत्तवाहिनीनं मात्र आपले पत्रकार निर्दोष असल्याची भूमिका घेतली आहे.
ठाकरेंच्या फार्म हाऊसजवळ काय घडलं?
खालापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तीनजण गाडीतून आले आणि त्यांनी फार्म हाऊसच्या सुरक्षारक्षकांकडे ठाकरे यांचे फार्महाऊस कुठे आहे, अशी विचारणा केली. मात्र सुरक्षारक्षकाला संशय आला आणि त्यानं आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं. काही वेळानं ते तिघे या फार्म हाऊसमध्ये दाखल झाले आणि त्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा सुरक्षारक्षकाचा आरोप आहे.
सुरक्षारक्षनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि गाडीचं वर्णन केलं, त्याआधारे तिघांना टोल नाक्याजवळ ताब्यात घेण्यात आलं. तिघांवर जबरदस्ती घरात घुसण्याचा आणि सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचा आरोप असून, त्यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या कलम 452, 448. 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची मागिती रायगड पोलिसांनी दिली आहे.
रिपब्लिक वृत्तवाहिनीनं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच आपले पत्रकार कुठल्या बातमीसाठी तिथे गेले होते, हे सांगण्यासही नकार दिला आहे.
तिघाही आरोपींना अलिबाग न्यायालयानं पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. यातील दोघं रिपब्लिक वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि एक वाहनचालक असल्याचं समोर आलं आहे.
ठाकरे कुटुंबासाठी हे फार्महाऊस का महत्त्वाचं?
ठाकरे कुटुंबाचं हे फार्महाऊस कर्जतजवळ असलं, तरी ते प्रत्यक्षात खालापूर तालुक्यात येतं. कर्जत चौक रस्त्यावर भिलवले इथल्या धरणाच्या परिसरात हे फार्महाऊस आहे.
हा परिसर हिरवागार असून, ठाकरे यांच्या फार्महाऊसप्रमाणे आसपासच्या गावातील परिसरात इतरही अनेक बंगले, रिसॉर्ट तसंच गोल्फ कोर्स आहेत. ठाकरे यांचं फार्म हाऊस मुख्य रस्त्यावरून थेट दिसणार नाही, अशा दाट झाडीनं वेढलेलं आहे.
उद्धव यांनी यंदा विधान परिषधेत आमदारकीची शपथ घेण्यआआधी नियमांप्रमाणे आपली संपत्ती जाहीर केली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रामध्ये उद्धव यांनी या फार्महाऊसचा उल्लेख केला होता.
या शपथपत्रानुसार या बंगल्याचा एकूण बिल्ट अप एरिया अठरा हजार चौरस फुटांचा असून, या वास्तूची सध्याची किंमत पाच कोटी रुपयांहून अधिक आहे.
गेली सुमारे तीन दशकं या जागेशी ठाकरे कुटुंबाचं नातं आहे. उद्धव यांचे वडील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कधीकधी वेळ काढून इथे विश्रांतीसाठी येत असत.
बाळासाहेब ठाकरेंची पत्नी मीनाताई ठाकरे यांना 1996 या फार्महाऊसवर आल्या असताना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यातच त्यांचं निधन झालं होतं. त्यानंतर बाळासाहेब इथे फारसे आले नाहीत, असं परिसरातले रहिवाशी सांगतात.
ठाकरे फार्म हाऊसवरून याआधीही वाद
भिलवले इथलं हे फार्महाऊस याआधीही अनेकदा चर्चेत आलं आहे. 2012 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे या वारसांमध्ये मालमत्तेवरून तंटा उभा राहिला होता. जयदेव त्यावरून कोर्टातही गेले होते.
त्यावेळी ठाकरे यांचं निवासस्थान असलेलं मातोश्री आणि अन्य मालमत्तेबरोबरच या फार्म हाऊसच्या मालकीचा मुद्दाही उपस्थित झाला होता. पण साधारण चार वर्षांनी जयदेव यांनी आपला दावा मागे घेतल्यावर तो वाद मिटला आणि हे फार्म हाऊस उद्धव यांच्या मालकीचं असल्याचं स्पष्ट झालं.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीआधी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी रत्नागिरीतील पत्रकारांशी बोलताना ठाकरे कुटुंबावर सनसनाटी आरोप केले होते, तेव्हाही या फार्म हाऊसचा उल्लेख केला होता.
'कर्जतच्या फार्महाऊसवर अनेकांना मारण्यात आलं असून गायक सोनू निगमलाही मारण्याची योजना होती' असं निलेश राणे तेव्हा म्हणाले होते.
पण त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार यांनी विनायक राऊत यांनी निलेश राणे यांना 'फालतू' असं संबोधलं होतं आणि या आरोपांना उत्तर देण्याइतपत ते मोठे नाहीत, असंही म्हटलं होतं.
त्याआधी काही वर्षांपूर्वी या फार्म हाऊसच्या परिसरात झालेल्या झटापटीत एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)