पब्जी गेमचं भारतात पुनरागमन होणार?

फोटो स्रोत, Pubg
केंद्र सरकारने पब्जी गेमिंग अॅपवर बंदी घातल्यानंतर देशभरातल्या लाखो पब्जी फॅन्सची निराशा झाली. मात्र, हे अॅप पुन्हा एकदा भारतात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
चीनच्या टेन्सेन्ट गेम्स कंपनीकडे पबजीची भारतातली फ्रँन्चायजी होती. मात्र, यापुढे भारतातली फ्रँन्चायजी या कंपनीला न देण्याचा निर्णय PUBG Corporation या मूळ दक्षिण कोरियातल्या कंपनीने घेतला आहे. त्यासंबंधीचं एक पत्रकही कंपनीने प्रसिद्ध केलं आहे.
या पत्रकात PUBG Corporation ने म्हटलं आहे, "टेन्सेन्ट गेम्सकडे आता भारतातील पब्जी मोबाईल गेम हाताळण्याची जबाबदारी नसेल. गेमची सर्व जबाबदारी आता PUBG Corporation कडे असेल."
केंद्र सरकारने सुरक्षा आणि देशाच्या सार्वभौमतेच्या कारणास्तव अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय आपण समजू शकतो, असंही कंपनीचं म्हणणं आहे.
पत्रकात कंपनीने म्हटलं आहे, "सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही संपूर्ण आदर करतो. खेळाडूंच्या डेटा सुरक्षेला कंपनीचं सर्वोच्च प्राधान्य आहे. भारतीय कायदे आणि नियम यांचं पूर्ण पालन करत गेमर्सना गेम पुन्हा एकदा खेळता यावा, यासाठी भारत सरकारसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा आम्हाला आशा आहे."
पीटीआयने दिलेल्या वृत्तनुसार पश्चिम बंगालमध्ये 21 वर्षांच्या एका तरुणानं पब्जीवर बंदी आल्यामुळे आत्महत्या केली आहे. पब्जी गेम बॅन झाल्यापासून तो तणावात होता असं या तरुणाच्या आईचं म्हणणं आहे.
केंद्राने का घातली आहे बंदी?
भारत सरकारनं नुकतीच 118 मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. त्यात पब्जी गेमचा सुद्धा समावेश आहे.
पब्जी, वी चॅट, लुडो, वॉल्ट यांच्यासह तब्बल 118 मोबाईल अॅप्सवर भारताच्या इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली आहे.
माहिती तंत्रज्ञान कायदा 69 A नुसार भारताच्या सुरक्षा आणि सार्वभौमतेला धोका असल्याचं सांगत केंद्र सरकारने या अॅपवर बंदी घातली आहे.
भारत सरकारने बंदी घातल्यानंतर PUBG Corporation ने टेन्सेन्ट गेम्स या चीनी कंपनीकडून भारताचे हक्क काढण्याची घोषणा केली आहे.
मूळ पब्जी गेम एक युद्ध गेम आहे. तो आधी कॉम्प्युटरसाठी डिझाईन करण्यात आला होता. दक्षिण कोरियाच्या PUBG Corporation या कंपनीने तो डिझाईन केला होता. मात्र, टेन्सेन्ट या चीनी कंपनीने या गेमचं मोबाईल व्हर्जन तयार केलं आणि चीन, भारत, अमेरिका यासह जगातल्या अनेक देशांमध्ये मोबाईलवर खेळण्यासाठीचे सर्व ऑपरेशन्स हीच कंपनी बघते.
केंद्र सरकारने नुकतीच ज्या 118 अॅप्सवर बंदी घातली आहे त्यात PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite या अॅप्सचा उल्लेख आहे. हे दोन्ही अॅप्स चीनी कंपन्यांनी तयार केलेले आहेत. दक्षिण कोरियाच्या कंपनीने नाही.
डेस्कटॉपरव खेळला जाणारा मूळ पबजी गेम PUBG Corporation चा आहे आणि केंद्र सरकारने त्यावर बंदी घातलेली नाही. आता या कंपनीने मोबाईल गेमची फ्रँन्चायजी चीनी कंपनीकडून काढून घेण्याचा निर्णय घेतल्याने या गेमचा भारतातला मार्ग पुन्हा सुकर होऊ शकतो.
भारतात पब्जीचा मोठा ग्राहक वर्ग आहे. खरंतर पब्जीच्या मोबाईल व्हर्जनचा जगातला सर्वांत मोठा ग्राहकवर्ग भारतातच आहे. भारतात एकूण 25% गेमर्स आहेत. ज्या चीनीमध्ये हा गेम मोबाईलसाठी तयार करण्यात आला त्या चीनमध्येसुद्धा भारतापेक्षा कमी म्हणजे 17% गेमर्स आहेत. अमेरिकेत पब्जीचे 6% गेमर्स आहेत.

फोटो स्रोत, Pubg
जगभरात गेमिंग उद्योग मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. 2019 साली जगभरात गेमिंग उद्योगाची उलाढाल 16.9 अब्ज डॉलर्स इतकी होती. यापैकी 4.2 अब्ज डॉलर्सची उलाढालीसह चीन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अमेरिका, जपान आणि त्यानंतर ब्रिटन आणि दक्षिण कोरियाचा क्रमांक येतो. स्टॅटेस्टिका डॉट कॉमने ही आकडेवारी दिली आहे.
भारतातही हा उद्योग वेगाने वाढतो आहे. मात्र, अजूनही भारतातला गेमिंग उद्योग 1 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी आहे. भारतातला गेमिंग उद्योग मोठा नसला तरी इतर देशांसाठी भारत गेमर्सची मोठी बाजारपेठ आहे.
भारतातली गेमिंग स्ट्रिमिंग साईट रूटर्सचे सीईओ पियुष कुमार सांगतात, "भारतात केवळ पब्जीविषयी सांगायचं तर या गेमचे 175 दशलक्ष डाऊनलोड्स आहेत. यातले 75 दशलक्षच्या आसपास अॅक्टिव्ह यूजर्स आहेत. चीनपेक्षा भारतात जास्त लोक पबजी खेळतात."
गेमर्स जास्त असले तरी भारतातून होणारी कमाई जास्त नाही. पियुष कुमार म्हणतात, "याचं कारण पैसे देऊन गेम खेळणाऱ्यांची संख्या भारतात खूप कमी आहे."
याचा अर्थ भारताच्या या कथित डिजिटल स्ट्राईकचा चीनवर फारसा परिणाम होणार नाही का?
यावर बोलताना पियुष कुमार सांगतात, "असं म्हणणं चुकीचं ठरेल. भारतात गेम्स खेळणाऱ्यांची संख्या इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे भारताकडे भविष्यातली गेमिंग हब म्हणून बघितलं जातं. त्यामुळे एखाद्या कंपनीला भारतातून बाहेर जावं लागलं तर तिच्या यूजर बेसवर त्याचा परिणाम नक्कीच होईल."
यूजर बेसविषयी सांगायचं तर भारतात 14 ते 24 वर्ष वयोगटातली मुलं सर्वाधिक मोबाईल गेम खेळतात. मात्र, पैसे देऊन मोबाईल गेम खेळणाऱ्यांमध्ये 25 ते 35 वर्ष वयोगटातील तरुण सर्वाधिक आहेत.
ऑनलाईन गेमिंगमध्ये कमाई कशी होते?
हा एक महत्त्वाचा प्रश्न सर्वांनाच पडतो. याविषयी आम्ही ज्येष्ठ बिझनेस पत्रकार आशु सिन्हा यांच्याशी चर्चा केली. ते म्हणतात, "गेमिंगमधून पैसे कमावण्याचं एक मॉडेल आहे. याला फ्रिमियम म्हणतात. म्हणजे आधी मोफत खेळू द्या आणि त्यानंतर एकदा सवय झाली की पुढच्या लेव्हल खेळण्यासाठी प्रिमियम म्हणजे पैसे मागा. दुसरं मॉडेल आहे गेमशी संबंधित मर्चंडाईज तयार करणं. विशेषतः लहान मुलांमध्ये गेम्समधले कॅरेक्टरची खेळणी, प्रिन्टेड टीशर्ट, डिश प्लेट, टिफीन बॉक्सेस, कम्पास बॉक्सेस अशा गोष्टी खूप लोकप्रिय असतात. या माध्यमातूनही कंपन्या बराच पैसा कमावतात."
सिन्हा सांगतात, "गेमिंग उद्योगाचं तिसरं मॉडल आहे गेमशी संबंधित जाहिराती आणि चित्रपट तयार करणे. बरेचदा सिनेमांवर आधारित गेम्स बाजारात येतात. चित्रपटाची लोकप्रियता गेमच्या प्रसार-प्रचारात मोलाची मदत करतात. तर कधी-कधी गेमच्या लोकप्रियतेतून चित्रपटाच्या प्रसार-प्रचारात मदत होते."
प्रोफेशनल पद्धतीने पब्जी खेळणाऱ्यांना सरकारच्या बंदीचा मोठा फटका बसला असेल. हा गेम खेळणारे यूट्युबवरही पॉप्युलर आहेत.
पियुष सांगतात की सध्यातरी भारतात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन गेम्स तयार होत नाहीत. या व्यवसायात भारतीय डेव्हलपर्स अजूनही बरेच मागे आहेत. त्यामुळे सरकारने घातलेल्या बंदीनंतर अनेक कंपन्या या व्यवसायात हात आजमावतील, अशी आशा पियुष व्यक्त करतात.
याचं एक कारण म्हणजे गेम तयार केल्यावरही पब्जीची लोकप्रियता बघता ती नव्या येणाऱ्या कुठल्याही गेमसाठी मारकच ठरली असती.
भारतात कुठल्याही प्रकारचे मोबाईल ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांची संख्या म्हणजे एकूण गेमर्सची संख्या जवळपास 30 कोटी आहे. हा खूप मोठा आकडा आहे. लॉकडाऊनमध्ये या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसतेय.
विकास जयस्वाल गेम्स अँड टेक्नॉलॉजीचे संस्थापक आहेत. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "लॉकाडऊनपूर्वी दररोज त्यांचे 1.3 ते 1.5 कोटी अॅक्टिव्ह यूजर्स असायचे. लॉकडाऊनमध्ये यांची संख्या वाढून तब्बल 5 कोटींपर्यंत पोहोचली आहे. परिणामी उत्पन्नातही पाच पट वाढ झाली आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








