विदर्भ पूर: मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस, पूर मात्र विदर्भात

मध्य प्रदेशातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नद्यांना पूर आला. वैनगंगा नदीकाठावरील गावांसह भंडारा शहरातही पुराचं पाणी शिरलं होतं.

भंडाऱ्यातील टाकळी, जवाहरनगर, कपिलनगर भागात पुराचं पाणी शिरलं होतं. पुराचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने वाहतूकही ठप्प झाली होती. भंडारा शहरासह 40 गावांना पुराचा फटका बसला.

तीन दिवस झालेला संततधार पाऊस आणि मध्य प्रदेशातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैनगंगेसह बावनथडी, चुलबंद या नद्यांना पूर आला.

तुमसर आणि पवनी तालुक्यांचंही नुकसान झालं आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरपरिस्थिती नीट न हाताळल्याबद्दल राज्य सरकारवर टीका केली आहे.

36 तास हाती असताना सरकारने वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते. मदतीला विलंब झाल्याने घरे आणि शेती पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले असं फडणवीस म्हणाले.

पूर्व विदर्भातील परिस्थिती भीषण असून, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करावेत. मदतीसंदर्भात स्वतंत्र जीआर काढून या भागातील नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई देऊन मदत करावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मध्य प्रदेश सरकारशी समन्वय न राखल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. राजीवसागरचे पाणी सोडल्यानंतर 36 तासांनी पोहोचतं. वेळीच सतर्कतेचा इशारा दिला असता तर नुकसान टाळता आलं असतं असं ते म्हणाले.

पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे चार मीटरने उघडण्यात आले पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

नदी काठावर असलेल्या रांझीच्या गणेश मंदिरात तब्ब्ल 25 वर्षांनंतर दोन फूट पाणी आत शिरले आहे. गणपतीच्या पायाला या पाण्याचा स्पर्श झाला आहे.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या टोकावरुन वाहत असलेल्या वैनगंगा नदीला पूर आल्याने काल रात्रीपासून दोन्ही राज्याचा संपर्क भंडारा जिल्ह्याचा तुटला होता. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बावणथडी धरण 100 टक्के भरलं आहे. या धरणाची 4 दरवाजे उघडण्यात आले होते.

26 हजार क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरू असल्याने गोसेखुर्द धरणाचे बॅक वॉटर भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात घुसून भोजापूर नाल्यावरुन चार फूट पाणी वाहत असल्याने भंडारा-नागपूर मार्ग बंद झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)