संजय राऊत : उद्धव ठाकरे यांनी बिगर भाजपशासित राज्यांचं नेतृत्व करावं - #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1) उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचं नेतृत्त्व करावं - संजय राऊत

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगर भाजपशासित राज्यांचं नेतृत्त्व करावं, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत असून, देशाच्या इतिहासात त्यांचं नाव घेतलं जाईल, असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला. मुंबईत पत्रकारांशी संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसमधील घडामोडींवरही मत मांडलं. ते म्हणाले, "काँग्रेसमध्ये जे काय घडलं, त्यावर काँग्रेसनं बोललं पाहिजे. काँग्रेस हा देशाला माहीत असलेला मोठा पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. तसंच, देशाला मजबूत विरोधीपक्षाची गरज आहे."

दरम्यान, महाविकास आघाडीत उत्तम समन्वयासाठी समितीची गरज नव्हती, पण आता पुन्हा विचार करणार असल्याचं राऊत म्हणाले.

2) मुख्यमंत्र्यांनी 'मातोश्री'च्या बाहेर पडून राज्यात काय चाललंय, ते बघावं- राजू शेट्टी

"मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीच्या बाहेर पडून राज्यात काय चाललं आहे ते बघावं. अलिबाबा चाळीस चोर कशा पद्धतीने चोरी करीत आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सर्वच पक्ष सहभागी आहेत. तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ असं सुरू आहे," अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

राजू शेट्टी यांनी गुरुनारी (27 ऑगस्ट) बारामती शहरात दुधदरासाठी जनावरांसह आंदोलन केलं. शारदा प्रांगण येथून ढोलताशाच्या गजरात जनावरांना घेऊन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. इंदापूर चौक, गुणवडी चौक, पानगल्ली मार्गे प्रशासनभवनजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला. यावेळी शेट्टींनी सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षनेत्यांना खडे बोल सुनावले.

सरकारने दूध संघांना 25 रुपये प्रतिलीटर दर दिला. मात्र, शेतकऱ्यांना 17 रुपये दर मिळाला. हे सगळे जर मुख्यमंत्री बघत असतील तर शेतकऱ्यांनी हातात लोढणं का घेऊ नये, असा संतप्त सवाल शेट्टी यांनी यावेळी केला.

3) मोहरमच्या मिरवणुकांना सुप्रीम कोर्टानं परवानगी नाकारली

कोरोनाच्या प्रसारामुळे अनेक सण-उत्सव साजरे करण्यावर बंधनं आली आहेत. मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांनाही सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

मोहमर मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात याचिकाकर्त्यानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, जनतेच्या आरोग्याबद्दल धोका पत्कारू शकत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली.

"जर आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला करोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केलं जाईल. आम्हाला ते नको आहे," असंही मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे.

4) काँग्रेसनं भाजपवर हल्ला करण्याची गरज, स्वत:वर नाही - कपिल सिब्बल

काँग्रेसमधील अंतर्गत वाद शमता शमत नाहीत. पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांविरोधात उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्हा काँग्रेसनं पाच ठराव मजूर केले. यातील एक ठराव जितीन प्रसाद यांच्याबद्दलही आहे. प्रसाद यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करण्यात आलीय.

यानंतर कपिल सिब्बल यांनी जितीन प्रसाद यांची बाजू घेत, ट्विटरवरून काँग्रेसवर टीका केलीय.

"दुर्दैवाची बाब म्हणजे उत्तर प्रदेशात जितीन प्रसाद यांना अधिकृतपणे लक्ष्य केलं जात आहे. काँग्रेसनं स्वतःवर उर्जा वाया घालवण्यापेक्षा भाजपवर सर्जिकल स्ट्राईककरून भाजपला लक्ष्य करण्याची गरज आहे," अशी टीका सिब्बल यांनी केली आहे.

5) चीनसोबत भारताचं युद्ध झाल्यास पाकिस्तानही सहभागी होईल - कॅ. अमरिंदर सिंग

भारताचं चीनसोबत युद्ध झाल्यास पाकिस्तानही त्यात सहभागी होईल, असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणालेत. इंडियन एक्स्प्रेसच्या आयडिया एक्सचेंजमध्ये ते सहभागी झाले होते.

"माझे शब्द लिहून ठेवा, जर चीनसोबत युद्ध झालं, तर त्यात पाकिस्तानही सहभागी होईल," अशा शब्दात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी इशारा दिला आहे.

"गलवान खोऱ्यात चीनकडून अशा हालचाली करण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. 1962 सालीही चीन गलवान खोऱ्यात आला होता," असं अमरिंदर सिंग म्हणाले.

तसंच, "गलवान खोऱ्यात आता भारतीय लष्कराचे 10 ब्रिगेड तैनात असताना जर आपण चाल करून जाऊ असं चीन विचार करत असेल, तर ते मुर्ख आहेत. 1967 साली रक्तरंजित झटापट झाली होती. पुन्हा तसंच होईल," असंही अमरिंदर सिंग म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)