You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे: काँग्रेसच्या नाराजीमुळे महाविकास आघाडी धोक्यात आली आहे का?
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
महाविकास आघाडीत काँग्रेसची नाराजी वाढत चालल्याचे दिसून येते. एका बाजूला काँग्रेसला डावलण्यात येत असल्याचा आरोप आता जाहीरपणे काँग्रेस आमदारांकडून केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींनी सांगितले तर सरकारमधून बाहेर पडू असे विधान मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
नगर विकास खात्याकडून काँग्रेस आमदारांना जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा आरोप नुकताच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला होता. याप्रकरणी 11 आमदार नाराज असून उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला.
सहकारी पक्ष शिवसेनेविषयी काँग्रेसकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यात आल्याची ही पहिलीच घटना नाही. विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटप, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या-बदल्यांचे निर्णय, श्रेय वाद, कोरोनासंबंधीचे निर्णय अशा अनेक मुद्द्यांवरून तिन्ही पक्षांमध्ये सातत्याने कुरबुरी दिसून येत आहेत.
त्यामुळे ठाकरे सरकार अस्थिर होईल का? सत्तेत असूनही काँग्रेस अस्वस्थ का आहे? दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे काँग्रेस नेते सत्तेत राहण्याबाबत शंका का उपस्थित करतात? काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का? काँग्रेसच्या नाराजी सत्रामुळे शिवसेनेसमोर नवे आव्हान उभे आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार?
हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसमधले मतभेद वारंवार चव्हाट्यावर येत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचे कितीही दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष लपून राहिलेली नाही.
नगर विकास खात्याच्या असमान निधी वाटपावरुन नाराज असलेल्या काँग्रेसच्या 11 आमदारांची नाराजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतर दूर झाल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले.
दरम्यान, आमच्यासह मित्रपक्षातले आमदारही नाराज आहेत. काही पक्षातील आमदारांना जास्त निधी मिळाला आहे. मी त्या पक्षाचे नाव घेणार नाही. असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
तर 'आमदार उपोषणाला बसणार असतील तर तो काँग्रेसचा प्रश्न आहे. विरोधकांना हाती आयते कोलित मिळेल आणि काँग्रेस नेतृत्वासमोरील अडचण वाढेल.' या शब्दात शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये काँग्रेसच्या नाराज आमदारांच्या भूमिकेची दखल घेण्यात आली आहे.
एकाच मुद्द्यावरुन या तिन्ही पक्षांमधून आलेल्या या तीन प्रतिक्रिया सर्वकाही अलबेल नाही हेच सिद्ध करतात.
ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "मुळात काँग्रेसच्या आमदारांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला दूर करावी लागते ही काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे. याचा अर्थ काँग्रेसचे नेते आपल्या आमदारांचे समाधान करू शकत नाहीत असा होतो."
राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोघे मिळून सरकार चालवतात अशी तक्रार काँग्रेसकडून सत्ता स्थापनेपासून होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष प्रादेशिक असल्याने त्यांचा वरचष्मा आहे. त्यांच्यात अंतर्गत समन्वय अधिक प्रभावी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख एखादा निर्णय तात्काळ घेऊ शकतात. पण प्रदेश काँग्रेसकडे तशी सोय नाही.
"आघाडी सरकार असो वा युतीचे सरकार निधी वाटपावरुन कायम अशी नाराजी उफाळून येत असते. निधी वाटपात राजकारण होणे ही नवीन बाब नाही." असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले.
"काँग्रेसला विचारधारेशी तडजोड करून शिवसेनेसोबत टोकाचे मतभेद झाले तरच काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकते." अशी शक्यता अभय देशपांडे व्यक्त केली.
राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षात जो सावळा गोंधळ आहे तोच राज्यातही दिसून येतो. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकवाक्यता नसल्याचा फटकाही प्रदेश काँग्रेसला बसतोय.
"महाविकास आघाडीत सहभाग घेण्यासाठी आग्रही असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना सर्व घडामोडींपासून कमालीचे दूर ठेवण्यात आले आहे. काँग्रेसमुळे सत्ता स्थापन शक्य झाले आहे. पण काँग्रेसला आपल्या या ताकदीचा पूर्ण वापर करता आलेला नाही." असं मृणालिनी निनावडेकर यांना वाटते.
विधानपरिषद आणि राज्यसभेच्या एका जागेवरुन काँग्रेसला तडजोड करावी लागली होती. तेव्हा काँग्रेसचे संख्या बळ तुलनेने कमी असले तरी काँग्रेसमुळे महाविकास आघाडीचे सरकार आहे हा ठसा उमटवण्यात काँग्रेसला अपयश आल्याचे दिसून येते.
सत्ता स्थापन झाल्यापासून काँग्रेस हाय कमांडकडूनही महाराष्ट्रात नेमके काय चालले आहे? याची फारशी दखल घेतली गेलेली नाही हे वास्तव नाकारता येणार नाही. पण सध्याच्या परिस्थितीत सत्तेतून बाहेर पडणं काँग्रेसला परवडणारं आहे का ?
"भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे अशा कुरबुरींमुळे काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार नाही. असे केले तर पक्षाला मोठे नुकसान सोसावे लागेल आणि याचा अंदाज काँग्रेसला आहे." असे अभय देशपांडे यांना वाटते.
तर दुसऱ्या बाजूला विजय वडेट्टीवर यांनी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत केलेल्या विधानाचीही जोरदार चर्चा होत आहे. "पक्षात महत्त्वाचे पद आणि खाते न दिल्याने वडेट्टीवार स्वत: नाराज होते. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या विधानाला किती महत्त्व द्यायचे याबाबत मला शंका आहे. केवळ राहुल गांधींना खूश करण्यासाठी त्यांनी असे विधान केल्याचे वाटते." असे मत ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
काँग्रेसच्या नाराजीचा फायदा भाजपला
राजस्थान आणि मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रातले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे 'ऑपरेशन लोटस'चीही चर्चा होतेय.
'काँग्रेस आमदारांच्या नाराजीचे वृत्त पाहून विरोधकांना उकळ्या फुटत असतील तर तो त्यांचा भ्रम आहे.' असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
राजकीय संकट आले तरी उद्धव ठाकरे समर्थ आहेत. असा विश्वास सामनातून व्यक्त केलाय. 'आमच्यात समन्वयाचा अभाव नाही.' 'सर्वकाही आलबेल आहे.' 'आम्ही पाच वर्षे सत्ता टिकवणार.' ही वक्तव्य महाविकास आघाडीकडून आवर्जून केली जातात. पण मुळात असे स्पष्टीकरण देण्याची गरज का भासते ?
याविषयी बोलताना मृणालिनी निनावडेकर सांगतात, "भाजप सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल ही भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आहे. कारण तीन पक्षांचे सरकार यशस्वीपणे चालवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे."
ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, "सर्वाधिक संख्याबळ असून सत्ता स्थापन करता येत नाही हे भाजपला निश्चितच बोचते. हे भाजपचे अपयश आहे. कोरोना काळातही भाजपने सरकारला शक्य तिथे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला."
आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही भाजपने शिवसेनेवर अकार्यक्षम असल्याची टीका केली आहे. तेव्हा सातत्याने विविध मुद्द्य़ांवर शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.
मृणालिनी निनावडेकर सांगतात, "राजस्थानच्या अनुभवानंतर भाजप महाराष्ट्रात थोडी बॅकफूटवर गेली आहे. त्यामुळे तातडीने सत्ता पाडण्याच्या हालचालींना वेग येईल असे वाटत नाही. भाजपलाही 'मॅजिक फिगर'पर्यंत पोहचणं सोपं नाही. पण विरोधी पक्षम्हणून भाजप सरकारला घेरण्याचा पूर्ण प्रयत्न करते आहे."
का होत आहेत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद ?
1. निधी वाटपात काँग्रेसला डावलले ?
नगर विकास खात्याने निधी न दिल्याने काँग्रेसचे 11 आमदार नाराज असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. याप्रकरणी वेळ आली तर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला.
2. 'निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही.'
ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याची तक्रार काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी केली होती. त्यावर काँग्रेस ही जुनी खाट आहे, थोडी कुरकुरणारच असं सामनामधून लिहित शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याच सहकारी पक्षाला चिमटा काढला. काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपलं म्हणणंही मांडलं होतं.
3. महाजॉब्स पोर्टलवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस
महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, काँग्रेसच्या एकाही नेत्याचा त्यावर फोटो नाही. यावर प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आक्षेप घेतला होता. ट्वीटमध्ये लिहिलंय, "#महाजॉब्ज ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे की फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीची?"
महाविकास आघाडीची स्थापना होताना जे काही किमान समान कार्यक्रम ठरले, त्या शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल करत तांबे यांनी एकप्रकारे काँग्रेसची खदखद व्यक्त केली आहे.
4. राहुल गांधीचे खळबळजनक विधान
एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना स्वतः राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी मुख्य धोरणकर्ते आम्ही नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
5. 'काँग्रेसला मित्रपक्षाचे स्थान नाही.'
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आघाडीतील मित्रपक्ष म्हणून काँग्रेसला योग्य स्थान मिळत नसल्याची भावना काँग्रेसमधल्या अनेक बड्या नेत्यांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये वाढत असल्याचं म्हटलं होतं.
6. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या जागेवरुन मतभेद
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चर्चा सुरू असताना आपल्याला कोणतीही तडजोड करावी लागू नये अशी काँग्रेसची भूमिका होती. राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी प्रत्येक पक्षाला चार-चार जागा मिळाव्यात, असा फॉर्म्युला ठरला होता. पण काँग्रेस एका अतिरिक्त जागेसाठी आग्रही होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)