कोरोना व्हायरस: मुंबईत कोव्हिडसोबत वाढतोय को-इन्फेक्शनचा धोका?

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनाच्या मगरमिठीतून मायानगरी मुंबई हळूहळू सावरताना दिसत आहे. कोव्हिड-19 शी लढत असतानाच मुंबईवर आता मलेरियाचं संकट घोंघावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचं कारण मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात मलेरियाचे तब्बल 592 रुग्ण आढळून आले आहेत.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार 2 रुग्णांच्या मृत्यूचं कारण मलेरिया आणि कोव्हिड-19 हे दोन्ही आजार असल्याचं समोर आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, मलेरिया आणि कोव्हिड-19 यांचं को-इंन्फेक्शन ही मोठी चिंतेची गोष्ट आहे.
मुंबई आणि मलेरिया
मुंबईतल्या मलेरिया रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत बीबीसीशी बोलताना मुंबई महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, "पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईत मलेरियाचे रुग्ण वाढतात. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियाचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत. मार्च महिन्यापासून पालिकेच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी कोव्हिड-19 शी लढा देत आहेत. त्यामुळे मलेरियाकडे लक्ष देण्यात आम्ही कमी पडलो."

"ज्या दोन व्यक्तींचा मलेरियामुळे मृत्यू झाला त्यांना कोव्हिड-19 च इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे पालिकेच्या सर्व रुग्णालयांना आणि खासगी डॉक्टरांना कोव्हिड-19 सोबत पावसाळी आजारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोव्हिड-19 सोबत पालिका रुग्णालयात तापसदृश आजाराने येणाऱ्या सर्व रुग्णांची मलेरिया आणि पावसाळ्याच्या इतर आजारांसाठी तपासणी करण्यात येत आहे," असंही डॉ. गोमारे पुढे म्हणाल्या.
मुंबईत पावसाळ्याच्या दिवसात मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आणि स्वाईन-फ्लू यांसारख्या आजारांचे रुग्ण आढळून येतात. मात्र, यंदा मलेरियाच्या रुग्णांमध्ये खूप वाढ झाल्याचं दिसतंय.
पावसाळी आजारांची तुलना
(स्रोत - मुंबई महापालिका)
या आकडेवारीवरून स्पष्ट होतं की मुंबई गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी इतर पावसाळी आजारांचं प्रमाण कमी आहे.
"मलेरियावर आळा घालण्यासाठी मुंबईतील सर्व बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांची रक्त तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आहे. मुंबईत अनेक ठिकाणी धूर फवारणी करण्यात येत आहेत," असं डॉ. गोमारेंनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
मलेरिया-कोव्हिड-19 ने झालेल्या मृत्यूंची माहिती
2 ऑगस्टला एका 27 वर्षांच्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्वास घेण्यात अडथळा आणि छातीत दुखण्याची या रुग्णाची तक्रार होती. 3 ऑगस्टला या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाचा मृत्यू मलेरिया आणि कोव्हिड-19 मुळे झाल्याचं स्पष्ट झालंय.
29 जुलैला 40 वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्वास घेण्यास अडथळा आणि छातीत दुखण्याचीच तक्रार होती. तपासणी दरम्यान रुग्णाला मलेरिया आणि कोव्हिड असल्याचं निदान झालं. 4 ऑगस्टला या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाचा मृत्यू मलेरिया आणि कोव्हिड-19 मुळे झाल्याचं स्पष्ट झालंय.
हे दोन्ही रुग्ण एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या जी-उत्तर आणि एम-पूर्व भागातील रहिवासी असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
मलेरिया आणि कोव्हिड-19 चं संकट
कोव्हिड-19 च्या काळात मलेरियाचं संकट आरोग्य यंत्रणेसमोरचं एक मोठं आव्हान आहे. याबाबत बीबीसीशी बोलताना परळच्या ग्लोबल रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसीन तज्ज्ञ डॉ. मंजुषा अग्रवाल म्हणाल्या, "कोरोना पाठोपाठ मुंबईत मलेरियाही मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. जुलै महिन्यापासूनच मुंबईत मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. एकीकडे आपण कोरोनाशी लाढतोय. त्यात मलेरियाच वेळीच निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत."

फोटो स्रोत, Science Photo Library
"सद्यस्थितीत रुग्णालयात मलेरियाच्या 7-8 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दिवसाला रुग्णालयात 8-10 कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यात मलेरियाचे 1-2 रुग्ण आढळून येत आहेत. एखाद्या कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णाला जास्त काळ ताप असल्यास त्याला मलेरिया असण्याची शक्यताही दाट असते. गेल्या काही दिवसात आम्ही मलेरियाने ग्रस्त 40 रुग्णांना फोनवर कंन्सल्टेशन केलं आहे." असं डॉ. मंजुषा पुढे सांगतात.
कोव्हिड-19 च्या काळात डॉक्टरांना मलेरिया आणि कोव्हिड-19 चे रुग्ण आढळून येत आहेत का? याबाबत बीबीसीशी बोलताना झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. विक्रांत शहा म्हणाले, "पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो यांसारख्या आजारांचं प्रमाण वाढतं. सद्य परिस्थितीत डॉक्टरांकडे मलेरियाच्या उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये कोव्हिड-19 ची लक्षणं पहायला मिळत आहेत. डॉक्टरांसमोर हे एक मोठं आव्हान आहे. त्यामुळे पावसाळी आजारांकडे लोकांनी दुर्लक्ष न करता, अधिक काळ ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा."

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?

कोव्हिड-19 आणि मलेरिया, डेंग्यूचं को-इन्फेक्शन
मुंबई महापालिकेच्या सायन, नायर आणि केईएम रुग्णालयात कोव्हिड 19-मलेरिया, कोव्हिड-19-डेंग्यू अशा को-इंन्फेक्शनची प्रकरणं आढळून आली आहेत.
मुंबईच्या नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल बीबीसीशी बोलताना म्हणाले, "रुग्णालयात तापसदृश आजाराने येणाऱ्या सर्व रुग्णांची प्रोफाईल करण्यात येत आहे. कोव्हिड-19 सोबत मलेरिया आणि इतर तपासण्याही करण्यात येत आहेत. मुंबईत मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ निश्चित होत आहे. मलेरिया आणि कोव्हिड-19 या को-इंन्फेक्शन असलेल्या रुग्णांची संख्या फार कमी आहे. डॉक्टर या को-इन्फेक्शन असलेल्या लोकांवर लक्ष ठेवून आहेत."
तर नवी मुंबईतील पॅथॉलॉजिस्ट डॉ. हेमंत भालेकर यांच्या माहितीनुसार, "जून महिन्यापासून मलेरियाच्या केसेसमध्ये वाढ होताना पाहायला मिळतेय. गेल्या 10 दिवसात मलेरियाचे 30 रुग्ण आढळून आले आहेत. तर जुलै महिन्यात कोव्हिड-19 आणि डेंग्यू अशा कॉम्बिनेशनचा रुग्ण आढळून आला होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट की को-इन्फेक्शनवर आता सरकारला लक्ष द्यावं लागेल. परदेशात अशा केसेस होत्या. मात्र, आता आपल्याकडे अशा केसेस दिसून आल्याने याचा डेटा एकत्र करून ठेवला पाहिजे."
तज्ज्ञांच्या मते, नागरिकांनी या को-इंन्फेक्शनला घाबरून जाण्याचा गरज नाही. फक्त पावसाळ्याच्या दिवसात योग्य दक्षता घणं गरजेचं आहे.
मलेरिया आणि मुंबई
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








