गणेश चतुर्थीः जे 128 वर्षांत घडलं नाही, ते पुण्यात कोरोनाकाळातल्या गणेशोत्सवात घडणार

दगडूशेठ गणपती
    • Author, मयुरेश कोण्णूर.
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गणेशोत्सव उंबरठ्यावर आला आहे. 'तो' आला आहे म्हणतांना सगळ्यांचं लक्ष सहाजिक पुण्याकडे जातं कारण सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कित्येक प्रथा, परंपरा, स्वरुप हे पुण्यानं ठरवलं.

हा उत्सव, त्याच्या मिरवणुका, सजावटी, देखावे, ढोलताशे हे सगळं पुण्यातनं सुरु झालं. पण यंदाचा कोरोनाकाळातला पुण्याचा गणेशोत्सव यापूर्वी कधीही पाहिलेला नसेल असा असेल. गर्दीनं दहा दिवस ओसंडून वाहणारे रस्ते, यंदा तुरळक गर्दीचेच असतील. देखावे, सजावटी, मिरवणुका यातलं काहीही नसेल.

साथीच्या काळातला पुण्याचा हा काही पहिला गणेशोत्सव नव्हे. 1897 ची ती प्लेगची साथ आली तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला होता. पण आजच्यासारखं रुप त्याला अद्याप आलं नव्हतं. त्यामुळे उत्सवाचं रुप पालटून टाकणारी ही कोरोनाची साथच पहिली म्हणायची.

पुण्याच्या सगळ्या, मानाच्या गणपतींच्या आणि इतरही, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येऊन यंदाचं स्वरुप पूर्ण बदलायचं ठरवलं आहे. अनेक गोष्टी अशा आहेत ज्या या उत्सवाच्या 128 वर्षांच्या इतिहासातही पहिल्यांदा घडतील.

त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पुण्याची मंडळं यंदा सुरु करत असलेला नवा पायंडा. यंदा या मंडळांच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा ही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे. म्हणजे मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवाचे उत्सवप्रमुख करणार आहेत आणि दगडूशेठ हलवाई गणेशाची प्रतिष्ठापना कसबा देवस्थाच्या अध्यक्षांच्या हस्ते होईल. असाच पायंडा इतर महत्वाची मंडळंही पाडतील.

असं यापूर्वी अगोदर कधीही झालं नव्हतं. कोणी राजकीय, सामाजिक क्षेत्रांतली मान्यवर व्यक्ती बोलावून मोठे कार्यक्रम व्हायचे. पण साधेपणानं उत्सव साजरा करण्याच्या इच्छेतून आणि एका प्रकारच्या आवश्यकतेतून सार्वजनिक गणेश मंडळं एकत्र आली.

देखावे तर होणार नाहीच आहेत, पण सोबतच ज्यांची मंदिरं आहेत ते गणेशोत्सव यंदा मांडवही उभारणार नाही आहेत. बाकीची मंडळं परवानगीनं आटोपशीर मांडव उभारतील.

दगडूशेठ हलवाई गणपतीचा मांडव दरवर्षी तुळशीबागेच्या तोंडावर असलेल्या दत्त मंदिराच्या चौकात उभा राहतो. पण यंदा तो मांडव नाही.

मूर्ती मंदिरात नेहमी असते तिथेच असेल. यंदा या गणपतीचं ओनलाईन दर्शनच घ्या असंही सांगितलं गेलं आहे. दरवर्षी दर्शनाला या म्हणणारे मंडळाचे कार्यकर्ते यंदा येऊ नका, असं सांगत आहेत आणि घरुनच दर्शन घ्या अशी विनंती करताहेत. ही विनंती करणं त्यांच्या अक्षरश: जीवावर येतं आहे.

कोरोना
लाईन

"स्वागताला आम्ही नेहमीच उत्सुक असतो. पण यंदा येऊ नका असं सांगावं लागतं आहे. पण हे लोकांच्या हिताच्या इच्छेनंच करतो आहे. म्हणून कार्यकर्ताही नेहमीच्या जोशात नाही आहे.

पण बाप्पाची आज्ञा समजून हा उत्सव साधेपणानं साजरा करतो आहे. सगळ्यांना ओनलाईन दर्शन घेण्याचं आवाहनही करतो आहे," असं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणतात.

कसबा गणपती

पुण्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही चिंतेच्या पातळीवरच आहे, पण बाजारपेठा नेहमीच्या जोशात नाही, पण गणेशोत्सवासाठी हळूहळू उघडू लागल्या आहेत. त्यात नेहमीसारखी गर्दी नाही.

पुण्याच्या गणेशोत्सव म्हणजे मोठी आर्थिक उलाढालही असते. काही शे कोटींवर ही उलाढाल जाते. पण यंदा कोरोनामुळं त्यालाही आर्थिक चाप बसला आहे. आनंद सराफ हे पुण्याच्या गणेशोत्सवाचा चालताबोलता इतिहास म्हणून ओळखले जातात. त्यांच्यामते यंदा उत्सवाच्या मर्यादित स्वरुपामुळे त्यावर आधारित व्यवसायांना 20 टक्क्यांपर्यंत एकूण फटका बसणार आहे.

"पुण्यात नोंदणीकृत साडेचार हजार मंडळं आहेत. पण जवळपास 30000 सोसायट्या, चाळींमध्येही सार्वजनिक गणेशोत्सव होतो. त्यांचा सरासरी खर्च 2 लाख रुपये होतो. जवळपास 5 लाख घरांमध्ये गणपती बसतो. घरटी किमान 2 हजार रुपये खर्च होतोच.

आता या आकड्यांवरुन एकूण उलाढालीचा अंदाज लावता येईल. मंडळांशिवय अनेक उत्सवावर आधारलेले व्यवसाय असतात. मांडववाले, सजावटीवाले, कार्यक्रम करणारे कलाकार, हॉटेल्स. असे असंख्य व्यवसाय. यंदा त्यांना काहीही मिळणार नाही. मागे स्वाईन-फ्लूच्या साथीच्या वेळेस असं पहायला मिळालं होतं. पण यंदा परिस्थिती अधिक गंभीर आहे," असं सराफ म्हणतात.

पुणे

दुसऱ्या बाजूला पुणे कोरोनाच्या संसर्गासाठी अद्यापही आरोग्य यंत्रणा तयार करतं आहे. पुण्यासाठी तयार होणारी 3 जम्बो कोव्हिड हॉस्पिटल्स अद्यापही तयार होत आहेत आणि त्यातलं एकही सेवेत आलेलं नाही आहे.

19 ऑगस्ट ही पहिली डेडलाईन होती, पण आता सीओईपी मैदानावरचं हॉस्पिटल 22 ऑगस्टपर्यंत सुरु होईल असे दावे जिल्हा प्रशासन करतं आहे. त्यात गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हॉस्पिटल उभारणीत अडथळे येत आहेत. त्यामुळे कामाचा वेगही मंदावतो आहे.

एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे आवडता गणेशोत्सव अशा स्थितीत पुणे आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)