सचिन तेंडुलकर म्हणतो, 'माझी पहिली कार शोधून द्या'

माझी पहिली कार शोधण्यासाठी मला मदत करा, अशी विनंती क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने चाहत्यांना केली आहे.

मारुती 800 ही त्याची पहिली कार होती आणि कारचं हे मॉडेल 90च्या दशकात भारतात लोकप्रिय होतं.

सचिनने म्हटलं आहे की, माझ्या कारविषयी कुणाला काही माहिती मिळाल्यास माझ्याशी संपर्क करा. कारविषयी सचिनने सविस्तर माहिती मात्र दिली नाही.

एका वेब चॅट शोमध्ये सचिनने म्हटलं, व्यायसायिक क्रिकेटपटू बनल्यानंतर ही कार खरेदी केली होती.

तेंडुलकरने 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. असं असलं तरी आजही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत त्याचा समावेश होतो.

मारुती 800

त्या काळात ही कार खूप लोकप्रिय होती. आपल्याकडे ही कार असावी असं प्रत्येक तरुण-तरुणीला वाटायचं. जसा जमाना बदलला आणि नव्या नव्या कार बाजारात येऊ लागल्या तेव्हा मारुती 800 ची लोकप्रियता कमी होऊ लागली होती.

2014मध्ये कंपनीनं या कारचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी दु:ख व्यक्त केलं होतं. यातूनच या कारची लोकप्रियता दिसून येते. त्यावेळी अनेकांनी या कारविषयी त्यांच्या आठवणी व्यक्त केल्या होत्या.

जसं जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होत गेलो, तसंतसं नवनवीन कार घेत गेलो आणि शेवटी जुनी कार विकावी लागली, असंही सचिन यांनी सांगितलं.

कारविषयीच्या आवडीबदद्ल त्यांनी सांगितलं, "माझ्या घराशेजारी एक मोठं सिनेमागृह होतं. तिथं लोक कारमध्ये बसून सिनेमा बघायला यायचे. तेव्हा मी माझ्या भावासोबत बाल्कनीमध्ये बसून तासनतास त्या गाड्यांना बघत बसायचो."

तेंडुलकरने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यांनी 200 कसोटी सामन्यांत 15,837 आणि 463 एकदिवसीय सामन्यांत 18,426 धावा ठोकल्या आहेत.

सचिन दोनदा भारतीय क्रिकेटसंघाचे कर्णधार राहिले आहेत. त्यांनी 1989मध्ये वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2012मध्ये ते 100 आंतरराष्ट्रीय शतक ठोकणारे जगभरातले पहिले क्रिकेटपटू ठरले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)