पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही, अन् आम्ही घेतही नाही - गिरीश बापट #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, @PARTHAJITPAWAR
आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवरील बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1) पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही, अन् आम्ही घेतही नाही - गिरीश बापट
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहीररित्या फटकारल्यानंतर, पार्थ पवार वेगळा निर्णय घेण्याची चर्चा रंगू लागली होती. विशेषत: पार्थ भाजपची वाट निवडणार का, असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात होता. मात्र, या चर्चा भाजप खासदार गिरीश बापट यांनी फेटाळल्या आहेत.
पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्याला घेतही नाही, असं भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

"पार्थ पवारांबाबतचा प्रश्न हा पवार कुटुंबाचा प्रश्न आहे. आम्ही त्यात फार पडू इच्छित नाही. त्यांचा त्यांनी कुटुंबात सोडवावा," असंही गिरीश बापट म्हणाले.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी पार्थ पवार यांनी केल्याबद्दल शरद पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, "पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या मताला कवडीची किंमत देत नाही," असं ते म्हणाले होते.
2) संजय राऊतांनी माफी मागावी - IMA
डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं, या संजय राऊतांच्या वक्तव्यावरून आता वातावरण तापू लागलं आहे. संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननं केली आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.
"डॉक्टरांबद्दल अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समस्त डॉक्टर वर्गाची माफी मागावी," अशी मागणी करत इंडियन मेडिकल असोसिएशननं निषेधाचा ठराव एकमतानं मंजूर केला.

फोटो स्रोत, Twitter
IMA चे महाराष्ट्र प्रमुख अविनाश भोंडवे यांनी या मागणीबद्दल माध्यमांना माहिती दिली.
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की, "WHO ला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. WHO म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कंपाऊंडरकडून घेतो. कारण त्यांना जास्त कळतं."
3) कोल्हापूर-सांगलीला पुन्हा पुराचा धोका, NDRF ची चार पथकं तैनात
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना गेल्यावर्षी पुराला सामोरं जावं लागलं होतं. त्या नुकसान आणि धक्क्यातून बाहेर पडत असतानाच, यंदा पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाची संततधार आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या पुन्हा पात्राबाहेर पडू लागल्या आहेत. सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 30 फुटांवर पोहोचल्यानं काठावरील लोकांचं स्थलांतरही सुरू करण्यात आलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, SWATI PATIL
कोल्हापूर जिल्ह्यातील 70 बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचल्यानं पुराचा धोका वाढला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सांगली आणि कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. त्यात धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यानं बहुतांश धरणं भरली आहेत.
4) पश्चिम बंगालमध्ये राजभवानवर पाळत - राज्यपाल
राज भवनावर पाळत ठेवून या संस्थेचे पावित्र्य कमी केले जात आहे, असा आरोप पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी केला.
या आरोपामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल यांच्यात आधीच ताणले गेलेले संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता निर्माण झालीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे राज्य राहिले नसल्याचा आरोपही राज्यपाल जगदीप धनखार यांनी केला.
पाळत प्रकरणाची चौकशी आपण सुरू केली आहे, राज भवनाच्या कारभाराचं पावित्र्य अबाधित राहिलं पाहिजे, अशी माहिती राज्यपालांनी दिली. मात्र, ही पाळत नेमकी कशी ठेवली जातेय, याबद्दल त्यांनी काहीच सांगितलं नाही.
दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेसकडून अद्याप कुठली प्रतिक्रिया आली नाहीय.
5) राजस्थान काँग्रेसमध्ये बदल
राजस्थानातील सत्तेचा आणि पक्षाचा पेच कमी करण्यासाठी काँग्रेसनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. सचिन पायलट यांचा ज्यांच्यावर आक्षेप होता, अशी चर्चा होती, त्या काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. अजय माकन हे आता राजस्थान काँग्रेसचे प्रभारी असतील. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Twitter
तसंच सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी केसी वेणुगोपाल, अहमद पटेल आणि अजय माकन यांच्या नेतृत्त्वात समिती स्थापन करण्यात आली आहे.
सचिन पायलट यांनी समिती स्थापन करण्याच्या या निर्णयाबद्दल पक्षाचे आभार मानले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








