महेंद्रसिंग धोनी: रनआऊटने सुरुवात आणि रनआऊटनेच शेवट

धोनी महेंद्र सिंह

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महेंद्रसिंग धोनी या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दंतकथासदृश प्रवासाची सुरुवात रनआऊटने झाली होती आणि शेवटही रनआऊटनेच झाला. 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध धोनीने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं.

वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर अशी बिरुदावली पटकावलेल्या धोनीला त्या मॅचमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता.

130 कोटींहून अधिक जनतेच्या देशातून टीम इंडियात स्थान मिळवणं ही दुर्मीळ गोष्ट आहे. त्यात पहिल्याच सामन्यात भोपळाही फोडता न आल्यावर धोनीचं असंख्य खोगीरभरती खेळाडूंप्रमाणे खेळाडूंप्रमाणे आलेले गेलेले सदरात जाणार असं चित्र होतं. 23 डिसेंबर 2004 रोजी एम.ए.अझिझ स्टेडियमवर धोनीला टीम इंडियाची कॅप देण्यात आली.

श्रीधरन श्रीराम आऊट झाल्यानंतर धोनी मैदानात अवतरला. धष्टपुष्ट शरीरयष्टीचा रांचीचा राजकुमार तोपर्यंत डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगलंच नाव कमवून होता. केनियात झालेल्या तिरंगी स्पर्धेत धोनीच्या तडाखेबंद खेळींनी त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. याचा परिणाम म्हणजे बांगलादेशच्या मालिकेसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली.

श्रीधरन श्रीराम आऊट झाल्यावर धोनी मैदानात अवतरला. बांगलादेशचा अनुभवी खेळाडू मोहम्मद रफीक बॉलिंग टाकत होता. ४२वी ओव्हर म्हणजे हाणामारीचा कालखंड. रफीकच्या बॉलिंगवर पहिलाच बॉल धोनीने स्वीप केला.

बॉल शॉर्ट फाईनलेगला तापाश बैश्यकडे गेला. मोहम्मद कैफने सिंगलला हो म्हटलं आणि धोनी धावू लागला. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली धाव धोनीच्या नशिबात नव्हती. तापाश बैश्य आणि खालेद माशूद यांनी धोनीचा प्रयत्न संपवला.

काही कळायच्या आत नावावर भोपळ्यासह धोनी माघारी देखील परतला. हा माणूस पुढे टीम इंडियाचा आधारस्तंभ होईल, कर्णधार होईल असं कुणालाही वाटलं नाही. रनआऊट हा क्रिकेटमधला आऊट होण्याचा सगळ्यात दुर्देवी प्रकार. अशा पद्धतीने कारकीदीर्ची सुरुवात झालेला माणूस भारतीय क्रिकेटमधला लार्जर दॅन लाईफ होईल याचा सुगावा कोणालाही लागला नाही. १० जुलै 2019. साधारण वर्षभरापूर्वीचा दिवस. क्रिकेट एखाद्या धर्माप्रमाणे असणाऱ्या टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी महत्त्वाचा दिवस. 50 ओव्हर वर्ल्ड कपची सेमी फायनल पावसामुळे दुसऱ्या दिवसावर गेलेली. न्यूझीलंडने ठेवलेलं लक्ष्य होतं 240, पण खेळपट्टी आणि वातावरण गोलंदाजांना साथ देणारं होतं.

चार शतकांसह रोहित शर्मा भन्नाट फॉर्मात होता, परंतु न्यूझीलंडच्या तिखट माऱ्यासमोर टीम इंडियाची 24/4 अशी अवस्था झाली. एवढी पडझड होत असतानाही टीम इंडियाचा माजी 'कॅप्टन कूल' आणि वनडे क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक धोनी बॅटिंगला का येत नाहीये, अशा शंका चाहत्यांच्या मनात येत होत्या.

पडझड सुरूच राहिली. धोनीचा वारसदार म्हणून पाहिला जाणारा ऋषभ पंत आऊट आला, आणि अखेर धोनी त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये खेळायला उतरला. त्या क्षणी टीम इंडियाला 163 बॉलमध्ये 169 रन्स हव्या होत्या आणि टीम इंडियाची अवस्था होती 71/5.परिस्थिती अवघड होती पण धोनी पिचवर असल्याने न्यूझीलंडची टीमही सावधपणे खेळत होती. मॅच जिंकली तर वर्ल्ड कप फायनलचं तिकीट मिळणार,हरलो तर गाशा गुंडाळून घरी- असं थेट समीकरण होतं. न्यूझीलंडला 239 धावांचीच मजल मारता मारल्यावर टीम इंडियाचे चाहते खूश होते.

300 चेंडूत 239 म्हणजे आवाक्यातलं समीकरण होतं. मात्र न्यूझीलंडच्या बॉलर्सनी आपल्या इनिंग्जच्या अर्ध्या तासात सळो की पळो करून सोडलं. सगळी मदार धोनीवर होती.

इनिंग्जच्या सुरुवातीला सिंगल-डबल घेण्याची प्रथा धोनीने या सामन्यातही पाळली. न्यूझीलंडच्या बॉलर्सनी टिच्चून बॉलिंग करत दोघांना फार रन्स करण्यापासून रोखलं. सँटनरने हार्दिक पंड्याला माघारी धाडलं.हार्दिकच्या जागी आलेल्या रवींद्र जडेजाने प्रचंड आत्मविश्वासाने खेळायला सुरुवात केली. जडेजाच्या फटक्यांनी थंड पडलेल्या भारतीय चाहत्यांमध्ये जोश पसरला. एरव्ही अशा रन-चेसमध्ये सूत्रधाराची भूमिका घेणारा धोनी बॅकफूटला होता, आणि जडेजा दांडपट्यासारखे फटके खेळत होता.अगदी पटकन जडेजा-धोनीने 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. या जोडीने आव्हान टप्प्यात राहील याची काळजी घेतली. रनरेट वाढत होता पण धोनी पिचवर असल्याने न्यूझीलंडच्या गोटाक काळजीचं वातावरण होतं, त्यात जडेजा सहजतेने कुटत होता. त्यातूनच या दोघांनी 97 बॉलमध्ये भागीदारीची शंभरी गाठली.

भन्नाट सुटलेल्या जडेजाला ट्रेंट बोल्टने आऊट केलं आणि भारतीय चाहत्यांवरचं दडपण वाढलं. जडेजा आऊट झाला तेव्हा 13 बॉलमध्ये 32 रन्स हव्या होत्या. फिनिशर धोनीसाठी हे समीकरण सवयीचं होतं.

49व्या ओव्हरमध्ये धोनीने ठेवणीतला सिक्स लगावला. पुढचा बॉल डॉट ठरला. लॉकी फर्ग्युसनच्या तिसऱ्या बॉलवर धोनी नीटपणे बॉल टोलवू शकला नाही. बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. धोनीने दुसऱ्या रनसाठी धावायला सुरुवात केली. एरव्ही सहजी डाईव्ह लगावणाऱ्या धोनीने बॅटसह क्रीझमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्टिन गप्तीलच्या डायरेक्ट हिटने धोनीची इनिंग्ज संपुष्टात आणली.स्वत:वर नाराज होऊन परतणाऱ्या धोनीचा चेहरा लाखो लोकांनी पाहिला. लाडका माही परत मैदानावर कधी दिसणार हे मनात असल्याने ही धोनीची शेवटची मॅच तर नव्हे अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचकुली. त्या मॅचमध्ये धोनीने 72 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. यामध्ये एक फोर आणि एक सिक्स होता.

भात्यात एकापेक्षा एक फटके असणाऱ्या आणि उत्तुंग टोलेबाजी करू शकणाऱ्या धोनीला फक्त दोन बाऊंड्री शॉट मारता यावेत यातच क्रिकेटरसिकांना काय ते समजलं.

पुढच्या वर्ल्ड कपवेळी म्हणजेच 2023 वेळी धोनीचं वय 42. फिटनेस असला तरी चाळिशीनंतर धोनीला निवडसमिती संघात घेईल का, याविषयी शंका दिसते. त्यामुळे गेल्या वर्षीचा वर्ल्ड कप हा धोनीचा शेवटचा वर्ल्ड कप होता, अशी चाहत्यांची धारणा होती. वर्ल्ड कपनंतर धोनीने टीम इंडियाच्या निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं स्पष्ट झालं. या वर्षभराच्या काळात टीम इंडियाने 12 वनडे आणि 19 ट्वेन्टी-20 मॅचेस खेळल्या, मात्र यापैकी एकाही मॅचमध्ये धोनी नव्हता. 

लॉकडाऊन काळात रांचीच्या फार्महाऊसवर असलेला धोनी काही तासांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कॅम्पसाठी चेन्नईत दाखल झाला.

टेस्ट क्रिकेटमधून धक्कातंत्राने निवृत्ती घेतलेल्या धोनीने चेन्नईत दाखल होताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय इन्स्टाग्रामवर जाहीर केला. रनआऊटने सुरू झालेला प्रवास रनआऊटनेच संपला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)