You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राज ठाकरे आक्रमक, ‘घरी बसून काम’ करण्याच्या मुद्द्यावरून मनसेचा सर्व्हे
उद्धव ठाकरेंच्या विविध निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राज ठाकरेंनी आता पुन्हा एकदा थेट त्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केलाय.
जुलै महिन्यात ग्राहकांना आकारण्यात आलेल्या अवाजवी वीज बिलावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले होतं.
त्यानंतर आता लॉकडॉऊन कायम ठेवण्याला मनसेने विरोध केला. शिवाय, राज ठाकरेंनी अयोध्येतील राम मंदिराचं श्रेय नरेंद्र मोदींना देत त्यासाठी पत्रही लिहिलं होतं.
या आठवड्यात जिम चालकांनीही राज ठाकरे यांची भेट घेत सरकारविरोधात तक्रारी केल्या. त्यानंतर आता मनसेकडून सरकार विरोधात नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे. लॉकडॉऊन हवे की नको? या आशयाखाली मनसेने सर्वेक्षण सुरू केलं आहे.
सरकारविरोधात मनसेचं सर्वेक्षण
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सर्वेक्षणासाठी एक ऑनलाईन अर्ज प्रसिद्ध केलाय. या अर्जात जनतेला 9 प्रश्न विचारण्यात आलेत. यामध्ये प्रामुख्याने कोरोना काळात लॉकडॉऊनमध्ये सरकारने ज्या उपाययोजना केल्या त्याबाबत सामान्य नागरिक समाधानी आहेत का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय.
लॉकडॉऊन उठवला पाहीजे का? लॉकडॉऊनचा तुमच्या नोकरी, उद्योगधंद्यावर काय परिणाम झाला? यासाठी सरकारकडून मदत मिळाली का? सरकारने शिक्षणाबाबत योग्य निर्णय घेतले का? शालेय शुल्क धोरणाची अंमलबजावणी होतेय का? लोकल सेवा सुरू व्हायला हवी का? वीज देयकाबाबत तुम्ही समाधानी आहात का? कोरोना काळात योग्य वैद्यकीय मदत मिळाली का? असे प्रश्न विचारण्यात आलेत.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सरकारला जागं करण्यासाठी हे सर्वेक्षण आम्ही करत आहोत. लोकांच्या भावना काय आहेत या सरकारपर्यंत पोहोचायला हव्यात. कारण सरकार केवळ त्यांच्या भावनांनुसार निर्णय घेत आहे. खरं तर हे सरकारचे काम आहे. लॉकडॉऊन उठवला पाहिजे ही आमची भूमिका कायम आहे."
11 ऑगस्ट सकाळी सात वाजल्यापासून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. 36 तासात 21 हजार लोकांनी अर्ज भरल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलीय. सर्वेक्षणाचा निकाल आठवड्याभरात जाहीर केला जाणार आहे.
'उद्धव ठाकरेंनी घरात बसून कामकाज केले'
या सर्वेक्षणातला नवव्या क्रमांकाचा प्रश्न हा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर प्रश्न उपस्थित करणारा आहे. कोरोना संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात बसून कामकाज केलं असा आरोप या प्रश्नात करण्यात आलाय.
'या संपूर्ण काळात मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामाकाजाबद्दल आपण समाधानी आहात का?' असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
याविषयी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, " मुख्यमंत्री स्वत:च म्हणाले होते की ते घरातून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम करत आहेत. आता लोकांनी सांगावं त्यांच्या कामावर ते समाधानी आहेत का?"
किशोरी पेडणेकर यांचा मनसेला टोला
मनसेच्या आरोपांना उत्तर देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "WHO आमच्या कामावर समाधान व्यक्त करतं. तसंच प्रशासकीय अनुभव नसताना आणि कोरोनासारखं संकट असताना मुख्यमंत्र्यांचा कामकाजात पाचवा नंबर येणं. इतकं उत्तर त्यांच्यासाठी पुरेसं आहे."
मनसेकडून केलं जाणारे हे सर्वेक्षण राजकीय पक्ष म्हणून त्यांचं काम असल्यास त्यांनी करावे असंही पेडणेकर म्हणाल्या.
"स्टंट केल्याशिवाय ते कसे राहणार? त्यामुळे जे कधी कोव्हिड सेंटरलाही गेले नाहीत त्यांनी आम्हाला बोलू नये." असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)