You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वडिलांच्या संपत्तीवर लेकीचा समान हक्क, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये (Hindu Succession Act) 2005ची सुधारणा करण्यात आली त्यावेळी वडील किंवा मुलगी हयात असली वा नसली, तरीही त्या मुलीचा हिंदू संयुक्त कुटुंबातील (HUF) वडिलांच्या संपत्तीवर समान हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.
सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय. जस्टिस अरूण मिश्रा हे या खंडपीठाचे प्रमुख होते.
हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये 2005 साली सुधारणा करण्यात आली. यानुसार मुलींना पिढीजात संपत्तीवर समान हक्क देण्यात आला. पण ही कायदा अस्तित्त्वात येण्यापूर्वीच्या काळासाठीही हा कायदा लागू होतो का (Retrospective Effect) याविषयीच्या काही याचिका कोर्टात दाखल झाल्या होत्या. त्याविषयी सुप्रीम कोर्टाने आज हा निकाल सुनावला.
LiveLaw.in ने दिलेल्या माहितीनुसार हा निकाल जाहीर करताना जस्टिस मिश्रा म्हणाले, "मुलींना मुलग्यांप्रमाणेच समान हक्क देण्यात यावेत. मुली आयुष्यभर प्रेमळ लेकी राहतात. मुलीचे वडील हयात असोत वा नसोत, मुलगी आयुष्यभर समान उत्तराधिकारी असेल."
म्हणजेच ज्यांच्या वडीलांचं 2005 पूर्वीच निधन झालेलं आहे, अशी लेकींनाही आता वडिलांच्या संपत्तीवर अधिकार मिळणार आहे.
जस्टिस एस. अब्दुल नझीर आणि जस्टिस एम. आर. शाह हेदेखील या खंडपीठात होते.
ज्या प्रकरणांमध्ये वडिलांचं निधन हे 9 सप्टेंबर 2005 पूर्वी झालेलं आहे म्हणजेच कायद्यात सुधारणा होण्यापूर्वी झालेलं आहे, अशा प्रकरणांमध्ये कोर्टाद्वारे वेगवेगळे निकाल देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालामुळे या सगळ्या शंकांचं निवारण करण्यात आलं असून सगळ्या केसेससाठी हे लागू होणार आहे.
कुटुंबातल्या मुलीचं 2005 पूर्वी निधन झालं असेल, तरी देखील तिचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क असेल आणि या महिलेच्या मुलांचा आजोबांच्या संपत्तीवर हक्क असेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)